शब्दांचाचून कळले सारे
कसे कळेना तुला पाहता भावबंध हे जुळून आले
या हृदयीचे त्या हृदयासी शब्दावाचुन सारे कळले ll धृ ll
शीतल वारा अवतीभवती तव प्रीतीचे गात तराणे
कडेकपारी डोंगरमाथा सांगत फिरतो तुझे बहाणे
कशी सावरू लाज बावरी वदनावरती गुलाब फुलले
या हृदयीचे त्या हृदयासी शब्दावाचुन सारे कळले ll 1 ll
निरोप द्याया कुणास सांगू गवाक्षात मग कपोत दिसला
राजहंस तो येई पुढती पाठवू मेघ जलद भारला
आकळेना ग काय जाहले मन वेडे का पुढे धावले
या हृदयीचे त्या हृदयासी शब्दावाचुन सारे कळले ll 2 ll
राधा झाले जीवन गोकुळ जणू भासतो कृष्णसखा मज
वरमाला ही अधीर झाली हळूच बोले सावधान मज
तुझ्यासवे मी चालत आले सप्तपदीची शुभद पावले
या हृदयीचे त्या हृदयासी शब्दावाचुन सारे कळले ll 3 ll
सौभाग्याचा चुडा शोभतो मेंदी भरल्या हातावरती
शकुनाची गे हळद लागली उजळून निघे गोरी कांती
संभ्रम कैसा मनी दाटला उंबऱ्यावरी मी अडखळले
या हृदयीचे त्या हृदयासी शब्दावाचुन सारे कळले ll 4 ll
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment