"अगं, वेडबीड लागलंय का तुला? डोकं ठिकाणावर आहे का?, कुष्ठ रोग्यांची सेवा करायला जाते म्हणे बाबा आमट्यांच्या आश्रमात."
",किती लोक आहेत ग तिथे. सगळेच करतात सेवा. त्यांचाही वाली असावा न कोणीतरी!"
"सगळं खरं आहे. पण सेवा करणे म्हणजे साधी गोष्ट नाही ग. वेड लागलं की जमतं हे सगळं. वेड लागले पाहिजे म्हणजे त्याचा ध्यास घ्यावा लागतो. वेळ जात नाही म्हणून मी सेवा करते हे म्हणजे मूर्ख पणाचे लक्षण आहे. कळलं!
मी बारावीत असताना घरात घडलेला हा संवाद. तेव्हाचं वय म्हणजे काय पुस्तक वाचलं अन् गेले भारावून. सोप्पं वाटत होत त्यावेळी. आपल्याला ही सगळे चांगलं म्हणतील, किती गुणाची ग असे म्हणतील हेच पुस्तकातले वाचलेले अंगी भिनलेले. मनात प्रसिद्धीचे मांडे करत बसली,अन् स्वप्नाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होते. आता कळतंय वेड लागणं म्हणजे स्वतः च्या इच्छा आकांक्षा वर पाणी सोडणे. पूर्णपणे जी गोष्ट करायची आहे त्याचाच ध्यास घेणे. त्या कार्याला वाहून घेणे. झोका जितका उंच जातो तितके उंच त्या कार्याविषयीचे वेड हवे, अन् ज्या वेगात खाली येतो तसे प्रसिध्दी पासून लांब रहाता आले पाहिजे. तरच ते वेड खरे.
गोपीना कृष्णाचे वेड होते म्हणजे त्या त्याच्यात सामावल्या होत्या. एका कान्हा शिवाय त्यांना काहीच दिसत नव्हतं. राधा तर बासरीचे सुर कानी आले की धावत निघायची कालिंदिच्या तीरावर. धावताना तिचा शेला झाडा झुडपात अडकतोय याचे ही भान नसायचे तिला. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन म्हणतात ते हेच. कबीर म्हणतात
कबिरा-कबिरा क्यूं कहे, जा जमुना के तीर।
एक गोपी के प्रेम में बह गये कोटि कबीर॥
याला म्हणतात भक्तीचे वेड. निर्गुण निराकाराचे सगुण साकार रुपात वेड लागले म्हणजे भक्तीचे बीज अंतरंगात रुजले असे म्हणावे लागेल.
देश स्वतंत्र व्हावा, म्हणून अहोरात्र इंग्रजांशी लढा देणारे क्रांतिकारक वेडे होते. स्वतः चा जीव तळहातावर घेऊन लढत होते. देशभक्तीचे वेड लागले होते. कोणत्याही परिस्थितीत इंग्रज सरकारच्या कारनाम्यास बळी पडायचे नाही हे ठरवूनच वागत असत. जीव गेला तरी बेहत्तर पण हार मानायची नाही. सावरकरांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली तेव्हा न डगमगता म्हणाले होते, हे सरकार तोपर्यंत टिकेल तरी का? कसलं धाडस हो हे. आपल्याच भारताचे सुपुत्र. वेड लागले होते स्वातंत्र्याचे म्हणून आजही ते अजरामर आहेत. तुम मुझे खून दो, मै तुम्ही आझादी दुंगा असे म्हणत नाठाळ इंग्रज सरकारच्या विरुद्ध आवाज उठविणारे सुभाष बाबू, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे भर न्यायालयात जाब विचारणारे लोकमान्य टिळक ही सामान्य व्यक्तिमत्वे असामान्य झाली कारण ते ध्येयवेडे होते.
सर्व सामान्य माणसाला जगताना कितीतरी संघर्ष करावा लागतो. वेड पांघरून पेडगावला जाणारे महाभाग असतातच ठायी ठायी. खोट्या आशेवर ठेवणारे हे खऱ्या अर्थाने वेडे असतात. यांच्या या वागण्यामुळे साधा सज्जन माणूस भरडला जातो. होरपळून निघतो.
म्हणूनच चंद्रशेखर यांना ही चारोळी लिहविशी वाटली असेल...
इथे वेडे असण्याचे
खूप फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment