Saturday, 13 March 2021

सांजवेळ

 



निळ्याशार आभाळात सांज फुलून आली

लाजरी सांजवेळ चंद्रकळा लेऊनी आली


     दूर पश्चिम क्षितिजावर सांज खुलून आली आहे. पूर्ण आभाळभर केशरिया शिंपडलेला आहे जणू. उगवतीपासून निघालेला दिवस मावळतीला भेटतो आणि सारा आसमंत गंधाळतो केशराने. पश्चिम घाटावर संध्येच्या गाली अशी गुलाबी लालसर छटा दिसू लागते.

     आकाशात  सांज  का खुलते? सुर्यदेवाने निरोप देतांना जाता जाता तिच्या गालावर हळूच टिचकी देऊन सूर्यदेव गेले म्हणून लज्जेची ही लाली आहे की चंद्राची येण्याची वेळ झाली आहे,त्याची वाट बघतांना त्याच्या आठवणीत मोहरून आलेली अभिसारिका आहे. 

     कृष्णधवल ढगांचे पुंजके म्हणजे कृष्ण सखा असेल का हा, म्हणून ही सांज लाज बावरी राधा होऊन येते. 

     कातरवेळ. तरीही सुगंधित. जाई जुई, रातराणी बहरलेल्या, दुरून शांत ऐकू येणारी सागराची गाज हुरहूरत्या मनाला अधिकच व्याकुळ करणारी,  सतत दाराकडे लक्ष वेधणारी, सांजवत लावतांना ही दारात पावलांचे आभास होतात आहे असे वाटावे इतकी तरल ही सांज. प्रीतीचा साज लेऊन धुंद पदन्यास करीत  नृत्याविष्कार करणारी, प्रियकराला मोहित करणारी कामिनी म्हणजे सांज. तशीच विरहणीची सखी.

    तिन्हीसांज. घराघरातुन येणारे शुभंकरोती चे स्वर संस्काराचे बीज पेरणारी सांज,गोधन घराकडे परतत असताना धुळीने धूसर झालेला परिसर, घुंगराचा नादमय आवाज, वासरांचे गोठ्यात हंबरणे, पाखरांची घरट्याकडे  परतण्याची वेळ, पिलांच्या आठवाने व्याकुळ झालेल्या पाखरांची किलबिल सारच  मनाला वेड लावणारं.

    निसर्गाचे हे रूप, ही सांजवेळी म्हणजे निर्मिकाची अद्भुत निर्मिती आहे.....


रसिका राजीव हिंगे

    

     

     

No comments:

Post a Comment