नक्षत्रवेल आणि शॉपीजेन ललित लेख स्पर्धा
रुणझुणती शब्दनाद
शब्द जन्मास येता
वैखरीचे उच्चारण
रुणझुणत नादत
आले होऊनि गाणं
"अग तो रडतच नाही ग! बाळ जन्मल्या बरोबर लगेच रडतो न ग?" बाळाचा आवाज नाही आला. सगळेच स्तब्ध, का नाही बाळ रडत? सगळे हतबल निसर्गापुढे. थोड्याच वेळात अथक प्रयत्नांती बाळाचा रडण्याचा आवाज आला अन जणू किमया व्हावी असे सगळ्यांचे चेहरे आनंदातिशयाने उजळले. काय बरं किमया झाली? अहो टॅह्या ऽऽऽ टॅह्या ऽऽऽ तालबद्ध शब्दांचा नाद उमटला त्या इवल्या ओठातून. सप्तसुर आले हो ऐकायला. सारा भवताल आनंदला त्या शब्द नादाने.
जन्मापासून असा हा शब्द आपल्या आयुष्यात नादत, निनादत असतो.
शब्द शब्दांची साखळी
ऐसी मग जोडत येते
जन्मताच शब्दनाद
अभिवादन त्यास असते
शब्द सतत रुणझुणत असतात आजूबाजूला. श्रीगणेशा होतो बोली भाषेतून. घरात बोलण्यातून या शब्दांची ओळख व्हायला लागते आपल्याला. आणि जुळू लागते नाळ या शब्दांसोबत.
उबदार गोधडी सारखे हळुवार शब्द नादत येतात आजीने सांगितलेल्या गोष्टीतून. तर कधी " मी तर ससुल गडी वाघोबाचे कानच तोडी" असे लयबद्ध गीत गात आजीसंगे, आई सवे ताल धरत शब्द भेटतात.
पाटीवर श्रीगणेशा गिरवीत या शब्दांचे लेखन माधुर्य जाणवायला लागतं. आणि मग होते शब्द सरींची बरसात. ही बरसात कधी नर्तन करते तर कधी उगाच आळसावते. कधी सुरेल गीत होऊन गुणगुणते तर कधी निःशब्द करते. शब्द च ते असे वागणार म्हणण्यापेक्षा जसं वागवलं तसे वागतात.
मनाचे मनाशी नाते जोडले की उमटतात शब्दस्वर संवाद साधायला. नाते अधिक दृढ करायला. शब्दच ताल धरत मने सांधत जातात. माणुसकी जपायला शब्द अनावर पणे येतात म्हणून तर जग रहाटी सुरू आहे.
या शब्दांच्या नादमाधुर्यात एकदा विसावले की कळायला लागते आपल्या साहित्य सारस्वतांनी जपलेली शब्दसंपदा. ज्ञानेश्वर माऊली भेटते कर्माचा सिद्धांत सांगणारी ज्ञानेश्वरी घेऊन. तर तुकारामाचे अभंग सचैल स्नान घालतात.गोवऱ्या थापतांना थपथप ताल धरत शब्द सूर धरायला लागतात आणि अजरामर अभंग निर्मिती होते. कबीर शेले विणतांना हातमागाचा रुणझुण नाद शब्द निर्मिती करतात आणि कबीर नकळतपणे दोहे लिहतात. हळूहळू संतांची मांदियाळी च शब्दफेर घेऊन रास खेळायला लावते अवतीभवती. सारंच नादमय होऊन जातं.
या बाळबोध वळणावरून पुढे भेटतात शब्दप्रभु कुसुमाग्रज प्रेम कर भिल्लासारखं, कणा या कवितेतून लढण्याची शक्ती देणारे, पृथ्वीचे प्रेमगीत म्हणजे प्रत्येकालाच मंत्रमुग्ध करणारे शब्द घेऊन, तर मंगेश पाडगांवकर शब्दांचेच सामर्थ्य सांगतात,चिऊताईसाठी गाणं म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान च सांगितले पाडगांकरांनी, शांता शेळके "जाईन विचारत रानफुला, भेटेल तिथे ग सजण मला" असे म्हणत मनावर मोरपीस फिरवत धुंद स्वप्नात रंगून जायला भाग पाडतात. आधुनिक वाल्मिकी म्हणजे गदिमा रामायणासारखे सुश्राव्य काव्यातून शब्दांशी गट्टी करायला शिकवतात. कितीतरी मराठी शब्द प्रचलित करणारे सच्चे सारस्वत लेखणी मोडा आणि शस्त्र हाती घ्या सांगणारे सावरकर ह्यांनी शब्दांचा अनाहत नाद ऐकायला शिकवले. गोनिदा सारखे गड किल्यांचा इतिहास शब्दबद्ध करत वीरश्री गायला लावतात.
किती आहेत हे सगळे शब्दांचे ईश्वर जे ठायी ठायी भेटतात आणि या शब्दांच्या संगे प्रवास करत सारं आयुष्य सुरेल नादमय होत जातं आणि कळायला लागतं या शब्दसख्या च्या नादमय संवादाने आयुष्य किती सुंदर आहे ते.
शब्दांनी शिकविला संवाद शब्दांनी ऐकविला नाद
शब्दांनी थांबविला वाद शब्दांनी मिटविला प्रवाद
शब्द झाले माझा आधार शब्द झाले माझे विचार
शब्द हेच झाले आचार शब्द ऐसे झाले साकार
या मला भेटलेल्या रुणझुणत्या शब्द नादाने माझे आयुष्य खरेच खूप सुंदर नादमय झाले आहे.....
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment