पाऊसधारा बरसत आल्या
आसमंत ही गंधित झाला
या निसर्गरम्य प्रशांतवेळी
प्रीत तुझी मज गवसेल का?
हे सांग तुज उमजेल का?
नयनी आठव घन दाटले
पापणकाठी जरा थांबले
तुझीच सारी आठव माया
आज पुन्हा बरसेल का?
हे सांग तुज उमजेल का?
वाटुली पाहे तुझी सांजवेळ
तुजवीण उदासली कातरवेळ
साजशृंगार हा तुझ्याच साठी
परी कुणी मज सजवेल का?
हे सांग तुज उमजेल का?
बघताच तुला मन मोहरले
आनंदूनी गहिवर दाटले
तुझा हा आश्वासक आधार
सांग सांग मज हसवेल का?
हे सांग तुज उमजेल का?
ही प्रीत आहे माझी साजणा
तुला कसे काहीच कळेना
स्वप्नचित्रं रेखिलेले माझे
आता तरी तुज समजेल का?
हे सांग तुज उमजेल का?
रसिका राजीव हिंगे


No comments:
Post a Comment