अवघे चराचर गुरू असे भासे मजसी
गुरू आहे एक तत्व ऐकावे या कथेसी
शोधण्यास गुरुसी न हिंडावे रानी वनी
सद्शिष्यासी शोधीतीसे गुरू क्षणोक्षणी
जन्मजन्मांतरीच्या भाग्याने गुरू लाभतो
पूर्वजांच्या पुण्याईने जीवनी गुरू भेटतो
गुरुपीठ परंपरा चालवी दत्तगुरु त्रिमुर्ती
चोवीस गुरू करुनी दे शिकवण जगती
गुरूवीण नसे ज्ञान नसे गुरूवीण शक्ती
गुरूवीण नाही मोक्ष नसे गुरूवीण भक्ती
भगवंताला नसे नाम देती त्यास भक्त
गुरुकृपेच्या बळावरी साधले हे फक्त
गुरुकृपेचा स्पर्श होता साधते साधन
गुरूवीण नाही सृष्टीवरी नर नारायण
घाली मायेची पाखर धरी कृपासावली
म्हणूनच म्हणती सारे गुरूसी माऊली
गुरुच असे सारथी चालविण्या जीवनरथ
साधून घ्यावी पर्वणी होई जीवन कृतार्थ
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment