किती तुझी घालमेल
मना बसावे सुखात
मला मिळतो विसावा
तुज मिळे का एकांत
किती किती विचारांची
गर्दी तुझ्या आत आत
सैरभैर होता होता
तुज मिळे का एकांत
एका क्षणी इथे तर
निघे दुसऱ्या पळत
रानोमाळ भटकतो
तुला नकोच एकांत
कुठे कुठे हिंडवितो
सारे मला रे अज्ञात
स्थान एक नसे तुला
कसा मिळेल एकांत
क्षितीजाच्या पल्याड रे
नदीकाठी शांत शांत
माझ्या मना जाऊ चल
तिथे असेल एकांत
स्थिरचित्त होण्यासाठी
गुरूपद हे प्रशांत
तिथे तुझ्या उनाडक्या
कसा लाभेल एकांत
माझे मना ऐक जरा
क्षण मिळू दे निवांत
भासे गरज तुलाही
तेव्हा लाभेल एकांत
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment