एक पुरुष स्त्री मनाचे इतके बारीक सारीक कंगोरे कसे उलगडून लिहू शकतो हा प्रश्न वैभव धनावडे लिखित "गोष्ट तुझी माझी" हा कथा संग्रह वाचतांना जाणवले. नोकरी करणाऱ्या स्त्री चे मन असो की गृहिणी म्हणून घरी कामात स्वतः ला गुंतवून घेणारी स्त्री असो तिचे मन जवळून अनुभवले असे वाटले.
अश्विनी या पात्राभोवती फिरणाऱ्या विविध प्रश्नांचा उहापोह या कथा संग्रहात केलेला आहे. नवीन लग्न होऊन आलेली अश्विनी स्वतः घरात बदल घडविण्याच्या प्रयत्न करते. ठिणगी पेट घेण्याच्या आधी समंजस पती सावरून घेतो. एकमेकांना सावरून सुखाचा संसाराचे प्रात्यक्षिक दाखवून देते तर "कल करे सो आज, आज करे सो अब" या न्यायाने जे करायचे ते आताच कर, उद्याचा काय भरवसा? नंतर मनाला जी बोचणी लागून राहते ती आयुष्यभर त्रासदायक ठरते, आयुष्य कुरतडत राहते. सहवासात आलेल्या प्रत्येक मुलाचे अंतरंग ओळखून वागावे, कोणावर केव्हा आणि किती विश्वास ठेवावा हे अंतरंग मधील मेघना सहज सांगून जाते. आयुष्य हे चित्रपट आहे. आपल्याशी कोण कसे वागते यापेक्षा आपण कोणाशी कसे वागावे? गैरसमज न करून घेता समोरच्याकडे आपण एक पाऊल टाकले तर तो आनंदाने आपल्याकडे दहा पावले चालत येतो. चित्रपट ही कथा घर दोघांचे आहे, एकाने पसरवले तर दुसऱ्याने आवरावे हा धडा शिकवून जाते.
सच्ची मैत्रीण वेगळ्याच धाटणीची, स्वतः स्वतः कडे लक्ष देणे गरजेचे आहे हेच अश्विनी सांगते. आयुष्याच्या वळणावर केव्हा कशी आणि कोणत्या गुणाला किंवा गोष्टीला तिलांजली द्यावी लागेल हे सांगता येत नाही. आहे त्या परिस्थितीत सुधारणा करून पुढे चालत जाणे अपरिहार्य ठरते. तिलांजली या कथेतून अश्विनी ला हेच सांगायचे आहे. झुलता पूल ही कथा म्हणजे स्त्री हीच घराचा आधार आहे, घराचा तोल सांभाळणे म्हणजेच पर्यायाने आपली माणसे जपणे. आयुष्य जगायचे तर राज मार्गाने. म्हणजे सुखाची झोप मिळते, स्वास्थ ही चांगले रहाते स्वतचे अन् देशाचे पण. रागावून, मारून मुटकून मुलांना वळण लावता येत नाही तर वेळ प्रसंगी त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्या मनाचा थांग काढावा लागतो. तर कधी स्वतःची ओळख स्वतः च मुलांना करून देऊन वळण लावणे किती गरजेचे आहे हे अनलॉक आणि पंखा बंद या कथेतील नायिका सहज सांगून जाते. तुळस कथा वाचताना नकळत पापणकाठ ओलावतात. आपण समाजात राहतो तर समाजाचे देणे लागतो ही कथा समाज भान शिकवते. काहीही चूक नसताना एखादी स्त्री सतत झगडत असते. माचिस ची गणितज्ञ नायिका कुणाला किती किंमत द्यावी हे सम आणि व्यस्त प्रमाणात शिकवून जाते. वळण असो की प्रेशर कुकर आणि रिंग असो काहीतरी दृष्टांत देऊन च नायिका तिचे मन उलगडत जाते. काय गमावले यापेक्षा काय आणि किती लाभले हे महत्वाचे आहे. कुलूप ची नायिका याचं विचाराच्या भोवऱ्यात सापडते. स्पर्धेत टिकायचे असेल तर दुबळेपणा असून उपयोगाचा नाही हे किती मोठं तत्वज्ञान हरिणी या कथेत गवसले. कितीही संकटे आली खचून न जाता त्याचा सामना करायचा. हिट मी म्हणत उभे राहायचे. आयुष्यातील सगळी वळणे स्त्री पेलू शकते. तिला आधार मिळो अथवा ना मिळो. समुद्र या कथेत तर स्त्री मनाचे सखोल विश्लेषण केले आहे.
काहीतरी छान वाचावे असा हा कथासंग्रह वाचनीय आहे. वळण ही कथा विशेष भावली. कारण आयुष्यात बरीच वळणं येतात, काही सुखकर तर काही क्लेशदायक. प्रत्येक वळणावर घेतलेला निर्णय हा महत्त्वाचा ठरतो....
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment