शुभ्र फुले रेखित रचिला चांद तू जुईचा
म्हणालीस, "चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा !"
कॉलेजमध्ये असल्यापासूनच अरुण दाते यांच्या गाण्यांची आवड होती. अगदी अभ्यास करतांना सुद्धा गाणे ऐकत असे. ह्या ओळी ऐकल्या की डोळ्यासमोर चित्र उभे राहायचे. फुले वेचताना मीच स्वतःला पहायची. त्याचा चंद्र मीच रेखत होते. जुईची फुले कशी दिसतात ते पाहिले नव्हते. पण चंद्रोत्सव म्हणजे पांढरी फुलं आहेत एवढेच कळले. त्यावेळी काही आता सारखे मोबाईल अन् गुगल बाबा नव्हते पटकन इमेज पाहू कशी आहे ते. असो. पण लग्न झाल्यानंतर माझ्या अंगणात जुईची वेल होती. पूर्ण गच्चीवर चढवलेली, पावसाळ्यात संध्याकाळी शुभ्र झालेली, आणि मंद गंधाने अंगण भारलेले. फुल खूपच नाजूक पाच पाकळ्यांचे. पण मोहवणारे. संध्याकाळी शाळेतून आले की गच्चीवर जाऊन पदरात जुईच्या कळ्या तोडून आणायची. सासूबाई गजरे करायच्या. सगळं घर मंद सुवासाने दरवळायचे. देवाजवळ लावलेला दिवा अन् घरात मंद धुंद सुगंध. प्रसन्न वातावरण असायचे. यावेळी कोणी आले तर या गंधाचे कौतुक केल्याशिवाय राहत नसे. जाताना हातात एखादा गजरा असायचाच. मी तर खूप माळायची गजरे. कळी उमलण्या आधी गजरा अगदी छोटासा असायचा. मी म्हणायची पण, अजून मोठा करा. म्हणजे मला लावता येईल. पण कळ्या उमलल्यावर शुभ्र फुले इतकी गोड दिसतात की हातात घेऊन मोरपिसा सारखे अलगद गालावरून फिरवून घ्यावे. छान मंदधुंद गंध.
माझं आयुष्य ही या जुईच्या फुलासारखे गंधाळलेले होते. येणारा प्रत्येक दिवस अन् सांज माझी मोहरलेली असायची. येईल त्याला मी गंध गजऱ्याच्या रूपाने आणि माझ्या स्वभावानुसार देतच होते. रोज नवीन रुप घेऊन येणारा सुगंध मला मोहवत होता. याचा अर्थ संघर्ष नव्हता असे नाही. पण माझे घर माझ्यासोबत होते. त्यामुळे धग कमी जाणवली त्यावेळी. एकाच देठातून निघतात कोणत्याही फुलांच्या पाकळ्या. जुईच्या फुलांच्या पाकळ्या नाजूक असल्या तरी समर्पण करण्यात कुठेच कुचराई करत नाहीत. माझ्या घरात पण असेच सगळेच समर्पण करण्यात तरबेज होते. मग ते कोणतेही क्षेत्र असो. तसे बाळकडू आम्हाला लहानपणीच मिळाले आहे.
जुई नाजूक आणि गंधित आहे. नाजूक असल्यामुळे असेल किंवा निसर्ग नियम आणि तिचे संचित, प्रारब्ध असेल पण ती लवकर कोमेजून जाते. सकाळी संध्याकाळ सारखा तिचा माज? हो माजच रहात नाही. निर्माल्य स्वरूप घेते हळूहळू ती. समर्पणाचा दरवळ संपला की संपले सगळे. माझ्या आयुष्याशी किती जुळलेली आहे ही जुई. सुगंधाचे दान देऊन झाले की, संपले सगळे. माझे आयुष्य ही असेच लवकर कोमेजून गेले. सुखाच्या हिंदोळ्यावर उंच झोके घेताना मला कधी असे वाटलेच नाही मी पडणार आहे. त्यावेळी माझ्या आयुष्याची वेल जुई सारखीच आधाराने जगत होती. पण जुईचे फुल वेलीपासून वेगळे झाले की लवकर कोमेजते, पण कुठल्यातरी आधाराने वेलीवरच असले की बराच वेळ टवटवीत राहते. मात्र आधार गेला की सगळचं संपतं. उरतो तो फक्त निर्माल्याकडे जाणारा प्रवास..... असं असलं तरी हा प्रवास सुखदायी कसा होईल याचाच विचार हे फुल कोमेजतांना करत असावं. कारण पुन्हा संध्याकाळी उमलायचे आहे. त्या तयारी साठी पुन्हा कळीचे रुप धारण करतं. मी कोमेजली तरी माझा उपयोग कोणासाठी किती होईल याचाच विचार मी करत आहे. आपला मार्ग आपण शोधायचा हा निसर्गाने घालून दिलेला पायंडा ही जूईची वेल आत्मसात करते. साधी फांदी लावली तरी जागा मिळेल तिथून बहरत वर येतेच येते. तसेच असावे आयुष्य हा आत्मबोध मला जुईने करून दिला. देत रहा आणि आनंद मिळवून सुखरूप हो हा संदेश जणू जुई सगळ्यांना देत आहे...
निसर्गाचे रूप सुंदर समर्पणाचे भाव
सुगंधाचे दान देणे हेच जगण्याचे नाव
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment