कसे सावरू मला...
सगळ्या गोष्टी जुळून यायला योग यावा लागतो हेच खरं आहे. आजकाल राधिकाचे चित्त काही थाऱ्यावर रहात नव्हते. मोठा मुलगा भावेशचे लग्न झाले, मुंबई सारख्या ठिकाणी घर झाले याचा आनंद होताच तिला. सून भाग्यश्री पण खूपच समंजस होती. पण लहान मुलगा राजेशची तिला काळजी वाटायची.
माधव आणि राधिकाने नोकरी करून कष्ट उपसत मुंबईत आपला संसार रेटून धरला होता. काटकसर करत मुलांचे शिक्षण करून घर ही घेतले होते. वनरूम किचन असले तरी डोंबिवली सारख्या शहरात होते. शिवाय भावेशला घर घेण्यास मदत ही केली होती. राजेश साधा, हरहुन्नरी मुलगा होता. शिक्षणात खूप पुढे गेला नाही पण कंपनी मध्ये नोकरी करत होता. भावेश च्या मानाने त्याची मिळकत कमी होती तरी त्याला पुरेशी होती. माधव आणि राधिका दोघेही सेवानिवृत झाले होते. राजेश साठी मुली सांगून यायला लागल्या. राधिकाच्या भावाच्या ओळखीने एक मुलगी सांगून आली. नात्यातीलच होती. मुलगी सगळ्यांना आवडली. राजेशने पण आपली पसंती सांगितली. राधिकाला जुळवून घेण्याचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले होते. सोय जाणतो तो सोयरा या न्यायाने एकमेकांची साथ देत दोन्ही कुटुंबांनी लग्न चांगले करण्यावर भर दिला. दोन्ही घराणी सुशिक्षित आणि सुसंस्कृत होती.
राधिका उत्साहाने लग्नाच्या तयारीला लागली. जसे भावेशचे केले तसेच राजेशचे पण सगळं व्यवस्थित करायचे यावर तिचा जोर होता. यावेळी मदतीचा एक हात तिच्या सोबत होता. तिची सून भाग्यश्री. कपडा खरेदी, दागिने, देणेघेणे सगळं अगदी साग्रसंगीत केले राधिकाने. घराला लग्न घराचे स्वरूप आले. पाहुणे यायला सुरुवात झाली. देवदेवक, ग्रहयज्ञ उत्साहात पार पडले. अन् वरात निघाली मुलीच्या गावाकडे. जाताना पण सगळ्याच्या उत्साहाला उधाण आले होते. दोन दिवसांचे लग्न धूमधडाक्यात झाले. राधिका फारच आनंदात होती. माधवला सगळं व्यवस्थित पार पडलं याचं समाधान होत. वरात घरी आली. लक्ष्मीपूजन झालं. राधिकाने नव्या सुनेचे नाव राजश्री ठेवले. इति कर्तव्यतेचे समाधान राधिका आणि माधव अनुभवत होते. अन् नियती कोपऱ्यात बसून खदाखदा हसत होती.
लग्नाच्या दोन दिवसांनीच राधिका तिची नणंद कुसुमावती कडे कार्यक्रम होता म्हणून गेली. वास्तविक पाहता लग्नाचा पसारा तसाच होता शिवाय दगदग पण खूप झाली होती. पण आपले घर लहान आहे. राजेश राजश्री जरा जवळ येतील,ओळख वाढेल या हेतूने ती नणंदेकडे गेली.
इकडे पहिल्याच रात्री राजेश्रीने आपले गुण उधळायला सुरुवात केली. "मला हात लावायचा नाही, मी सांगते तेव्हढे ऐक".
"अरे असे काय झाले. देवा ब्राह्मणांना साक्षी ठेवून आपलं लग्न झाले आहे. हा काय नवा गेम".
"माहित नाही"
राजेशला वाटले नवीन आहे. आपली माणसं सोडून आली आहे, घाबरली असेल होईल तिला या घराची सवय. असा विचार करून राजेश म्हणाला ठीक आहे. समंजस आणि सहनशील व्यक्तींचीच परीक्षा ईश्वर घेतो की काय न कळे. सकाळी उठल्याबरोबर राजेश ने स्वतःचे आवरले अन् तो ऑफिस ला जायला निघाला तेवढ्यात भावेश आणि भाग्यश्री आले. "हे काय राजेश, लग्न होऊन चार दिवस झाले नाही तर तू ऑफिस ला निघालास! नको जाऊ, आज आम्ही दोघांनी पण सुट्टी काढली आहे. मस्त कुठेतरी जाऊ या. आजचा पूर्ण दिवस बाहेर एन्जॉय करू." भाग्यश्री पण म्हणाली, चल राजश्री आपण जाऊ या मस्त बाहेर. अग हेच दिवस असतात एन्जॉय करायचे." पण राजश्री काहीच बोलली नाही. मला यायचे नाही एवढेच ती म्हणाली अन् आत चालली गेली. राजेश म्हणाला, "भाऊ राहू दे, तुम्ही दोघे जा. मी जातो आज ऑफिसला". काय झाले काही कळले नाही पण भाग्यश्री पण घरी चल म्हणाली अन् ते घरी गेले. माधव भावेश कडेच होता. "काय झालं! तुम्ही आज दिवसभर बाहेर जाणार होता न." भावेश काहीच बोलला नाही. शाळेची वेळ होत आली म्हणून दोघांनी लवकर आवरले अन् गेले ही शाळेत. माधवला काही कळेना काय झालं ते. पण त्याने जास्त विचार न करता स्वतः चे रूटीन सुरू ठेवले.
संध्याकाळी राजेश उशिराच घरी आला. राजश्रीने काहीच केले नव्हते. सकाळी स्वतः पुरेसे स्विगी वरून मागवले आणि नुसती बसून होती खोली मध्ये. राजेशने सगळे तिचे ताल तांबोरे पाहिले अन् खूप चिडला मनातल्या मनात. कुठेतरी पाणी मुरते आहे असे राजेशला वाटले. त्याने बाहेरून जेवण मागवले अन् दोघेही जेवली. राजश्रीचे जेवणात पण लक्ष नव्हते. राजेशच्या नजरेतून हे सुटले नाही. शांतपणे राजेश तिला म्हणाला, "काय अडचण काय आहे तुझी? अशी का वागते आहेस. तुला कोणी काही बोलले का? आपलं चार दिवसांपूर्वी लग्न झाले आहे असे वाटतच नाही."
"मला तुझ्याशी लग्न करायचेच नव्हते". अगदी चिडून राजश्री बोलत होती. आता मात्र राजेशच्या पायाखालची जमीन सरकली. हे कोणतं संकट माझ्या समोर आले. त्याचा त्याच्यावर विश्वास बसेना, हे असं माझ्या आयुष्यात घडेल याची कल्पना सुद्धा मी करू शकत नाही. मनातून खूप चिडला राजेश. तरीही शांत राहून त्याने विचारले,"हे तू आधीच का नाही सांगितले? सगळं पुढचं टाळणे शक्य झालं असतं".
"आईबाबा नाही म्हणाले, त्यामुळे मला काही बोलता आले नाही."
"अग पण मला तरी सांगायचे, मी काहीही कारण सांगून हा सगळा प्रकार थांबवला असता."
"किती प्रश्न विचारतो आहेस? मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते अन् आता इथे राहायचे पण नाही. मी चालली आहे आज. मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. विषय संपला."
"विषय संपला काय ? तुझ्या अशा वागण्यामुळे माझ्या आयुष्याचे किती नुकसान झाले आहे याची कल्पना तरी आहे का तुला? अन् आईबाबा नाही म्हणाले म्हणून बोलली नाही म्हणतेस तर आता घरी गेल्यावर काय तुला दिवे ओवळणार आहेत का? थोडा तर विचार करायचा ना असे मुर्खासारखे वागण्या आधी."
"हे बघ राजेश, तुला मला बोलण्याचा काही अधिकार नाही. दुसरी गोष्ट मी आईकडे जाणारच नाही, मी अनिल कडे जाणार आहे. माझं प्रेम आहे त्याच्यावर. आम्ही दोघे लग्न करणार आहे."
"तू इथून कुठेही जाणार नाहीस, आई घरी येईपर्यत. नंतर घेऊ निर्णय."
"तुझ्या अटी घालणं बंद कर. तुझी आई कोण लागून गेली मला अडवायला? मी जाणार म्हणजे जाणार. तू जास्त जबरदस्ती केली तर मी पोलीस तक्रार करेल, लग्न होऊन चार दिवस झाले नाही तर हा मला मारझोड करतो आहे वगैरे. नाहीतर काही बर वाईट करून घेईल मग बस जन्मभर तुरुंगात."
राजेशला काही कळेना. डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. त्याने आधी बाबांना फोन करून घरी बोलावले. माधव घरी आला. सगळा प्रकार त्याला राजेशने सांगितला. माधवने राजश्रीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकेना. उलट माधवचा अपमान करायला लागली. शेवटी माधवने राधिकाला सगळं कळविले आणि राजश्रीला तिच्या वडिलांकडे सोडून देतो असे सांगितले. तिला एकटीला पाठवणे धोक्याचे होते. कारण उद्या तिचे वडील म्हणाले माझी मुलगी मी तुमच्याकडे दिली होती. असे म्हंटले तर! जबाबदारी आपली आहे असे ठरवून माधव निघाला तिला घरी सोडायला. राजश्रीने खूप आकांड तांडव केले. मी एकटीच जाते, तुम्ही कशाला येता. येऊ नका. पण माधवने तिचे काहीच ऐकले नाही अन् तिला तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले. तिथे गेल्यावर सविस्तर राजश्रीच्या वडिलांना कल्पना दिली. गहिवरल्या स्वरात माधवने त्यांना विचारले," तुम्हास माहित होते तरी माझ्या मुलाची फसवणूक का केली. आधीच का नाही सांगितले? पोलीस तक्रारीच्या आणि जीवाचे बरेवाईट करण्याच्या धमक्या तुमची मुलगी माझ्या मुलाला देते. काय कारण तो सज्जन आहे म्हणून की तुमच्या मुलीला काही कळत नाही म्हणून?"
राजश्री चे बाबा काहीच बोलू शकले नाहीत. त्यांचा समज खोटा ठरला होता. स्वतः च्या मुलीचे गुण,स्वभाव सगळे माहित असताना ही ती सुधारेल या खोट्या आशेवर त्यांनी एका सद्गुणी मुलाच्या आयुष्याचा खेलखंडोबा केला होता.
जगात कितीही चांगले वागले तरी अशा अति शहाण्या मुलींच्या वागण्यामुळे चांगली मुले फसवल्या जातात, आयुष्यातून सगळा आनंद निघून जातो. पुन्हा उभारी धरणे कठीण आहे. काहीही कारण नसताना राजेश वर घटस्फोटाचा शिक्का लागला ही किती मोठी हानी आहे त्याच्या आयुष्याची. त्या क्षणी एकच विचार होता त्याच्या मनात कसे सावरू मला..
मुलींना एकच सांगावेसे वाटते आपण समाजात राहतो तर समाजाचे देणे लागतो. उगाच पाश्चिमात्य चे अनुकरण करून सगळ्यांची आयुष्य पणाला लावू नका. तुमचीच सारासार बुध्दी जागृत ठेवा तरच या जगात तरणोपाय आहे हेच निर्विवाद सत्य आहे सत्य आहे...
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment