आज कितीतरी दिवसांनी राघव लवकर घरी निघाला होता. काहींना काही कारण निघून त्याला ऑफिस मधून निघायला वेळ व्हायचाच. आज सगळीच कामं लवकर आणि मनाजोगती झालीत आणि मीटिंग पण कमी होत्या त्यामुळे कधी नव्हे तो खूश होऊन घरी निघाला. ड्रायव्हर गाडी घेऊन आला तसे त्याने आज मीच ड्रायव्हिंग करणार आहे तू पण जा घरी लवकर असे सांगून तो गाडी घेऊन निघाला. शीळ वाजवत शांतपणे राघव गाडी चालवत होता. सिग्नल वर गाडी थांबली अन् त्याच्या गाडीसमोर एक छोटासा मुलगा "गजरे घ्या साहेब, ताजे हायेत, तीस ला दोन देतो." त्याच्या चेहऱ्यावरचे भाव इतके केविलवाणे होते की, सगळी टोपली विकत घ्यावी असे राघवला वाटले. पण त्याने भावना आवरल्या अन् गरज नसतांनाही दोन गजरे विकत घेतले. तेवढ्यात सिग्नल सुटला अन् राघव पण पुढे निघाला. पण त्याचं मन मात्र मागेच राहिले. त्या गजरे विकणाऱ्या मुलाच्या केविलवाण्या नजरेत. त्याच्यामध्ये तो स्वतः ला पहात होता. विचारांच्या आवर्तनात तो खूप मागे गेला, तिथे त्याचे सुकोमल बाल्य कोमेजत होते. एकेक आठवणींचा कप्पा अलगद उघडत गेला अन् राघव त्यात गुरफटत गेला.
लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरविल्यामुळे राघव अवघ्या आठव्या वर्षी पोरका झाला. काका काकू कडे काही दिवस राघव होता.पण त्यांनी त्याच्या वडिलांची जमीन स्वतः च्या नावावर करून घेतली. राघवला काकू खूपच त्रास देत होती.धड जेवण पण मिळत नसे. शाळेत जातो म्हणाला तर "तुझा बाप वरून येऊन फी भरेल का? काही शाळा नको. बस घरी अन् काम कर शेतातले अन् घरचेही." असे बोलून राघवला मारहाण पण करीत होते. काकू घरच्या फुलांचे गजरे करून राघवला विकण्यासाठी तालुक्याच्या गावी पाठवत होती. या कामाचा राघवला खूप त्रास होत होता. त्याला शिकायचे होते. एक दिवस असाच राघव गजरे विकायला तालुक्याच्या गावी आला. लहानग्या राघवच्या मनात असंख्य विचार येत होते. मला शिकायचे आहे. इथे राहिलो तर मला शिकता येणार नाही. इथून जायला हवे. पण कुठे? कोण सांभाळणार आपल्याला! असे उलट सुलट विचार करत राघव गजरे विकत होता. सांज व्हायला आली. पोटात कावळे ओरडत होते. पण त्याचे मन वेगळाच निश्चय करीत होते. सगळे गजरे विकले गेले. राघव निघाला पण आज राघवने काकुच्या घराच्या विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली. पाय जिथे नेतील तिथे, वाट फुटेल तिथे हा आठ नऊ वर्षांचा बालक चालत राहिला. अंधार होता चारी बाजूने. पण मन पक्के होते. आईने शिकवलेली रामरक्षा म्हणत चालत राहिला. पोटात अन्नाचा कण नाही. निश्चय बळ देत होता चालण्याचे. कुठपर्यंत चालत आला याचेही भान नव्हते त्याला.
पाखरांचा कलरव ऐकू आला तसा त्याला थोडा धीर आला. आता पहाट झाली. म्हणजे उजाडेल. अंधार नाहीसा होईल. तो एका इमारती जवळ उभा राहिला. रात्रभर चालल्याने दमला होता. पाणी कुठे मिळेल का या आशेने तो इकडेतिकडे पहात होता. पण काही दिसेना. पक्षी घरट्या बाहेर पडले चारा पाणी शोधायला. अन् राघव उभा होता आपले नशीब आजमावत.
"कोण रे बाळ तू? काय हवे तुला?" या आवाजाने राघव दचकला. "काही नको काका, सहज उभा होतो इथे."
"दमलेला दिसतोस. कुठून आलास? कोणी बरोबर आहे का?" या प्रश्नांनी राघवचे डोळे भरून आले. तो थरथर कापायला लागला. काय बोलावे त्याला काही कळत नव्हते. अनुभवी कुलकर्णी काकांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. हा नक्कीच एकटा आहे. मनात खूप स्वप्न घेऊन धावतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला जवळ घेतले. पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला. तसा राघव ओक्साबोक्शी रडायला लागला. काकांनी त्याला रडू दिले. त्याच्याकडून हळूहळू सगळी माहिती काढून घेतली. राघव पण थोडा शांत झाला. काका त्याला आत घेऊन गेले. आधी गरम दूध दिले अन् थोड्या वेळातच गरम नाश्ता दिला. उपाशी पोर अधाशासारखे सगळं खात होता. काका फिरून आले. राघवला जवळ बोलावले.
"हे बघ बाळा, हे माझे घर असले तरी इथे तुझ्यासारखी बरीच अनाथ मुले आहेत. मला त्यांना अनाथ म्हणायचे नाही, कारण सगळी एकत्र आल्यामुळे आपण सगळेच सनाथ झालो की नाही?"
छोट्या राघवला काही कळत नव्हते. तो फक्त त्यांच्याकडे आणि आजूबाजूच्या मुलांकडे आळीपाळीने पहात होता. तेव्हा काकांच्या लक्षात आले की हा फारच लहान आहे.याला वळण लावायला वेळ लागेल. काका म्हणाले, "तुला इथे राहायला मिळेल पण आपली सगळी कामं म्हणजे जेवण सुद्धा तुला तुझं बनवून घ्यावे लागेल. काही दिवस कुणाची मदत लागली तर घे, पण नंतर तुलाच तुझे सगळे करायचे आहे हे मान्य असेल तर तू इथे रहा."
राघवला अतिशय आनंद झाला. तो लगेच म्हणाला, "काका, मला सगळं मान्य आहे. फक्त मला शाळेत जाण्याची, शिकण्याची परवानगी द्या. मला खूप शिकायचे आहे."
"ते तर करावेच लागेल, शाळेत जावे लागेल. पहिल्या वर्षाची फी मी भरेन पण पुढे तुला तुझे सगळे पहावे लागेल."
राघवने शाळेसाठी काकांच्या सगळ्या अटी मान्य केल्या. अन् सुरू झाला राघवचा यशोशिखराकडे जाण्याचा प्रवास. मिळेल ते काम करून, शाळेचा अभ्यास करून राघव यशाची एकेक पायरी चढत गेला. कुलकर्णी काका त्याचा हा प्रवास पहात होते, अनुभवत होते. मनातून त्यांना खूप समाधान मिळत होते. कारण विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे शहरात त्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या हाल अपेष्टा सोसल्या त्याच या अनाथ मुलांना सोसाव्या लागू नये म्हणून काका प्रयत्नशील होते. स्वतः चा मार्ग स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांनी मुलांना दिले होते, ते ही स्वबळावर. काकांच्या घरात जी मुले होती ती सगळी शिकून मोठी झाली होती. प्रत्येकाने स्वतः च्या जीवन रथाचे सारथ्य स्वतः केले होते, करतात आहे. राघव ने स्वतः च्या बळावर बिझिनेस अडमिनिस्ट्रेशन या विषयात पदवी प्राप्त केली आणि पुढे एमबीए करून वित्त विभागात उच्च पदावर कार्यरत झाला. पहिला पगार राघवला मिळाला तेव्हा काकांना पुन्हा एकदा आनंद झाला. राघवचा पगार झाला म्हणून नाही तर आपली निवड चुकली नाही. राघवने स्वतः त्याच्या जीवन रथाचे लगाम यशस्वी पणाने पेलले होते, त्याचा मार्ग त्याने स्वतः शोधला होता.
हॉर्न चा आवाज आल्यामुळे राघव भानावर आला. तो घरी पोहचला होता. पण विचारांच्या तंद्रीत कार मधून उतरून घरात जावे लक्षात आले नाही. कल्याणी ऑफिस मधून घरी आली तर राघवला कार मध्येच बसलेले पाहून तिने जोरात तिच्या बाईकचा हॉर्न वाजवून त्याला जणू पुन्हा वर्तमानात घेऊन आली....
रसिका राजीव हिंगे
.jpeg)
No comments:
Post a Comment