शॉपीजन कथा स्पर्धा
स्वातंत्र्य व्यक्तिमत्वाचे
घनदाट रानातून रमा झपाझप पावलं उचलत चालली होती. काळे सावळे मेघ आभाळात गोळा झाले होते. गार वारा सुटला होता. झाडांची सळसळ मनात भय निर्माण करत होती. पाऊस केव्हाही कोसळायला लागेल असे वाटत होते. भराभर चालू की पळत जाऊ रमाला कळत नव्हते. तिच्या विचारांच्या चक्रात ती चालत होती. तिला मधूनच असे वाटत होते की कुणीतरी तिचा पाठलाग करतं आहे. दोन तीन वेळा तिने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण दिसलं कोणीच नाही. जंगली जनावर वगैरे असेल का? या विचाराने तिचे सर्वांग थरथरले. भीतीमुळे भराभर पावलं पण टाकू शकत नव्हती. तरीही जीव मुठीत घेऊन जमेल तसे ती पळत सुटली आणि तिने घर गाठले. घरात येताच आईच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. रमाचा घाबरलेला आणि घामाने डबडबलेला चेहरा पाहून लक्ष्मीच्या मनात धस्स झालं.
" रमा, काय झालं? तू का इतकी घाबरलीस? कोणी काही बोलले का? का जातेस रानातून? तू आणि तुझे बाबा का ऐकत नाहीत हेच कळत नाही मला!"
यावर रमा काहीच बोलली नाही. पण तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. कोण असेल पाठलाग करणारे की खरंच एखादा चित्ता!... ती पुन्हा शहारली भीतीने. बाबा पण असेच तर जातात रानातून, त्यांनाही असाच अनुभव येत असेल का? पण कधी बोलले नाहीत बाबा याबाबत! बाबा म्हणतात तसे असेल का काही? आपल्या कार्यामध्ये कोणी विघ्न आणण्याचा प्रयत्न तर करत नसेल न? काही झालं तरी आता घाबरायचे नाही. बाबा करतात तसंच करायचं.
रमाला शांत पाहून लक्ष्मीचा जीव कासावीस होत होता. तिला तिचे पूर्वीचे दिवस आठवत होते. असेच व्हायचे जेव्हा विष्णुपंत रानावनात हिंडायचे, डोंगराळ भागात शिकवायला जायचे तेव्हा विष्णुपंत घाबरत नव्हते तरी त्रास होतच होता.
विष्णूपंत हे एक हुशार आणि मेहनती व्यक्तिमत्त्व. लहानपणापासूनच हुशार असलेल्या विष्णुपंतांचे आईवडील शेतकरी. घरी भरपूर जमीनजुमला असलेले जमीनदार.घरात समृद्धी आणि संस्कार हातात हात घालून होते. अशा सुसंस्कारित घरात विष्णुपंत लहानाचे मोठे झाले. सुशिक्षित आणि सुसंस्कृत विष्णुपंतांना तहसीलदार व्हायचे होते. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तेथील ग्रामातील सुधारणा करण्यासाठी, जमेल तसे खेडोपाडी जाऊन जनजागृती करायची होती. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा देऊन ह्या क्षेत्रात प्रवेश केला. आणि सुरू झाले विष्णूपंतांचे नोकरीच्या माध्यमातून समाजकार्य. प्रामाणिकपणे ते ज्या तालुक्यात बदलून जात तिथे काम करत होते. ऑफिसच्या व्यतिरिक्त इतर वेळेत गावागावात फिरून ग्रामस्थांना लिहिता वाचता येत नसेल तर त्यांना रात्रीच्या वेळी शिकवत असत. समोर आलेल्या अडचणी स्वतःच कशा प्रकारे सोडवाव्यात, स्वावलंबी व्हावे, याबाबत गावकऱ्यांशी गप्पांच्या ओघात बरंच काही सांगत होते. मनमिळाऊ स्वभाव आणि मदतीला तत्पर असलेले विष्णुपंत प्रत्येक गावात लोकप्रिय झाले. या लोकप्रियतेमुळे वधुपित्यांची जणू रांगच होती घरी त्यांच्या साठी. बी.ए. झालेली सालस लक्ष्मीची त्यांनी निवड केली आणि विष्णुपंत कुलकर्णी चा संसार सुरू झाला.
वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होत गेल्या अन त्यांच्यापाठी लक्ष्मी फिरत होती. कधीही कोणतीच तक्रार न करता ती विष्णुपंताचे नोकरी साधून सुरू असलेले समाजकार्य अनुभवत होती. विष्णुपंतांच्या कार्याला आणि संसाराला ही छान बहर आला होता. त्यांच्या संसारवेलीवर लक्ष्मीचेच प्रतिरूप घेऊन रमा अवतार घेती झाली. त्यामुळे लक्ष्मी घरात पूर्णपणे अडकली होती. तरीही अडल्या नडल्याला मदत करतच होती. पण घरावर तुळशीपत्र ठेऊन कार्य करणे तिला पटत नव्हते. कितीदा तरी ती विष्णुपंतांना याविषयी बोलत असे. पण विष्णुपंत कधी लक्ष देत नव्हते तिच्या बोलण्याकडे, किंबहूना तिला समजवयाचे की,
" लक्ष्मी, ही अडाणी लोकं आहेत. यांना स्वतःच भलं कशात आहे ते पण कळत नाही ग! आपला देश स्वतंत्र जाऊन इतकी वर्षे झाली, तरीही ही माणसं गुलाम असल्यासारखीच जगतात. स्वातंत्र्याचा खरा अर्थ यांना कळलाच नाही."
"अहो, पण घर आहे,संसार आहे तुमचा. तिकडे पण लक्ष नको का द्यायला? दुसऱ्याचे संसार सांभाळतांना स्वतःचा वाऱ्यावर का सोडायचा?"
"तसं काही होणार नाही लक्ष्मी. त्यांच्यातली जाणीव जागी करायची आहे. ते पण आपल्यासारखंच जगले पाहिजेत, असं नाही का तुला वाटत?"
लक्ष्मीला हे सगळं कळत होतं, पण वळत नव्हतं. विष्णुपंत तहसीलदार असल्यामुळे कायमच तालुक्याला राहावे लागत असे. त्यामुळे आजूबाजूच्या गावाशी संपर्क येतच होता. गावातील परिस्थिती पाहिली की तिच्याही पापणकाठी अश्रू गोळा व्हायचे. सरकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत नाहीत म्हणण्यापेक्षा तळागाळातील लोकं त्या स्वीकारत नाहीत असे म्हणावे लागेल. कारण तेवढं ज्ञान, समज त्यांना नाही. विशेष म्हणजे माहीत करून घ्यायचे पण नसतं. यासाठीच विष्णुपंत प्रयत्नरत होते. त्यांच्या कार्यात आडकाठी आणणारे बरेच असले तरी त्यांना मदत करणारेही होतेच.
रमा लहान होती तोपर्यंत कुठेही बदली झाली तरी काही विशेष जाणवले नाही. पण रमा मोठी होत होती. सतत खेडोपाडी फिरत असल्यामुळे लक्ष्मी समोर रमाच्या शिक्षणांचा प्रश्न आवासून उभा होता. तालुक्यातील शाळांमध्ये तिचे माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पण पुढील शिक्षणासाठी रमाला शहरात वसतिगृहात ठेवणे गरजेचे होते. रमा शिक्षणाच्या निमित्ताने शहरात वसतिगृहात राहू लागली. गावातली जगण्याची शैली आणि शहरातील जगणे यामध्ये बराच फरक रमाला जाणवला. हा बदल स्वीकारत रमा शिक्षणातील एकेक शिखर सर करतच होती. तिला तिच्या बाबांसारखेच कार्य करायचे होते. खूप हुशार नसली तरी प्रथम श्रेणीमध्ये रमा दरवर्षी उत्तीर्ण होत होती. बघता बघता पत्रकारिता हा विषय घेऊन तिचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. पण रमाला गावात राहणे जास्त आवडायचे. लहानपणापासून खेडोपाडी राहिल्याने असेल कदाचित.
विष्णुपंतासोबत आदिवासी पाड्यांमध्ये रमा फिरत होती. लहान असताना तिला त्यांच्याशी बोलायला, खेळायला आवडायचे. पण आता मोठी झाली आणि शिक्षणामुळे त्यांच्या अडचणी, त्यांचे अज्ञान, परंपरा आणि त्याविषयी असलेली अंधश्रद्धा पाहून यांच्यासाठी काहीतरी करावे असे वाटत असे. पण काय आणि कसे करावे याबाबत तिला मार्ग दिसत नव्हता. तिची धडपड सुरू होती, पण सहजासहजी कोणी हे मान्य करेल असे नव्हते. तिला सोबत हवी होती. तिचे बाबा असायचे पण नोकरी करून जास्त वेळ देऊ शकत नव्हते. या आदिवासी लोकांचे इतके पक्के विचार होते की ते बदलणे किंवा त्यांना काही सांगणे कठीण होते. पूर्ण पणे त्यांच्यामध्येच राहून बदलता आले तर शक्य होईल. आई परवानगी देत नव्हती जास्त वेळ बाहेर राहण्याची. कारण एकतर सगळा डोंगराळ भाग होता आणि गावात पोहोचायचे म्हणजे रानातून जावे लागत असे. घनदाट रान नव्हते तरी जंगली श्वापदे होतीच. दिवसा काही त्रास नव्हता पण थोडा जरी अंधार झाला तर भीती होतीच.
गावात त्यांचा म्होरक्या भिकू याचा मुलगा जगन्नाथ तालुक्यातील शाळेत जायचा हट्ट करत होता. पण घरातील आजी आजोबा आणि आईवडील तसेच गावातील सगळेच वृद्ध नाही म्हणत. शिक्षणामुळे मुलं बिघडतात, घरापासून, आईबापापासून लांब राहतात. परंपरावादी असतात हे आदिवासी. शिवाय रोज रानातून जाणे येणे करावे लागेल. जगू अजून लहान आहे. जंगली प्राण्यांशी लढू नाही शकणार. अशा कितीतरी गोष्टी होत्या त्यामुळे तेथील लोक शिक्षण घेत नव्हते. पण जगूला रमा सारखे शिकायचे होते. ती जशी गोष्टी वाचून दाखवायची तसे त्याला वाचायचे होते. जगू सारखा रमाला म्हणायचा,"ताई,मला शाळेत जायचे आहे, नाहीतर तू शिकव." रमाला कळत नव्हतं काय करावं.
रमा तिच्या बाबांशी बोलली याबाबत. विष्णुपंत म्हणाले, "मला माहीत आहे हे आदिवासी किती कट्टर आहेत ते. रमा, जीवाला धोका पण निर्माण होऊ शकतो. तरीही तू त्यांना तिथेच गावात शिकवायचे. घाबरू नको. मी तिथेच गावात असतो दिवसभर. मला बाहेर जावे लागले तर मात्र तू येऊच नको तिकडे. बघू काहीतरी मार्ग सापडेल. जगू दोन पावलं चालत आला आहे न, आपण चार पावलं चालत त्यांच्यापर्यंत जायचे." बाबांच्या या शब्दांनी रमाला धीर आला.
रमा रोजच्या प्रमाणेच गावात बाबांबरोबर जात होती. पण ज्यावेळी गावातले पुरुष शिकारीसाठी किंवा इंधन गोळा करण्यासाठी रानात जायचे त्यावेळी रमा जगूला शिकवू लागली. हळूहळू बाराखडी, छोटे छोटे शब्द जगूला सरावाने वाचता यायला लागले. जगुबरोबर गावातली पण चारपाच मुलं यायला लागली. त्यांच्यात शिकण्याची गोडी निर्माण झाली. समजायला लागल्या काही गोष्टी. त्यामुळे जगुच्या वागण्याबोलण्यात फरक जाणवायला लागला. भिकूच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. पण तो शांत होता. वेड आहे, थोडे दिवस चालेल अन बंद होईल.
रमा रोजच यायला लागली गावात. विष्णुपंत बाहेर असले तरी ती येतच होती. जेव्हा एखादा चांगल्या कार्यासाठी पाऊल उचलतो तेव्हा त्याचे पाय ओढणारे, त्याला मागे खेचणारेही असतातच. तसेच रमाच्या बाबतीत घडत होते. ज्यांना काहीच करायचे नसते अन दुसऱ्यालाही करू द्यायचे नसते असाच होता राणा. राणा म्हणजे गावातील भंटोल या सदरात मोडणारा होता. व्यसनांच्या आहारी गेलेला राणा रमाला अजिबात आवडत नव्हता. तरी तिने तिची शाळा घेणे सुरूच ठेवले. राणा काही न काही खुरापती काढतच होता. गावातील लोकांना रमा आणि विष्णुपंत यांच्या विरोधात भडकवीत होता. जगुच्या वडिलांना म्हणजे भिकूला हे कळत होतं. पण मुलाच्या प्रगतीकडे, त्याचे बदललेले व्यक्तिमत्व याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही हे अडाणी भिकूच्या लक्षात आले होते. राणाचा बंदोबस्त करावाच लागेल नाहीतर तो गावाच्या प्रगतीच्या आड येईल हे ओळखून होता भिकू.
तिचे बाबा बाहेर गावी असल्यामुळे आठ दहा दिवस झाले रमा एकटीच येत होती. रानातून येतांना तिला रोज जाणवे, की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. पण दिसत कोणीच नव्हतं. असं किती दिवस चालणार आहे. याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. रोजच्याप्रमाणे रमा निघाली, तिने भिकू आणि त्याच्या सोबत दोघे यांना तिच्यापासून थोड्या दूर अंतरावर मागे यायला सांगितले. सवयीप्रमाणे ती रानातून भराभर चालायला लागली, पण तिला पुन्हा जाणवलं तिचा पाठलाग होतो आहे. ती थांबली, अन मोठ्या आवाजात म्हणाली," जो कोणी असेल त्याने पुढे यावे, उगाच भेकडासारखा लपून का राहतो? असेल हिंमत तर ये पुढे!" पण कोणीच समोर आले नाही. फक्त पाण्यातून चालण्याचा आवाज आला. पावसामुळे रानात पाणी साचलेले होते. रमाने अंदाज घेतला, भिकू आहे पाठीमागे, ती पुन्हा भराभर चालायला लागली. थोडे पुढे जात नाहीतर झाडीतून राणा आला समोर, रमा किंचित घाबरली, जवळून राणाला कधी पहायचा प्रसंग आला नव्हता. "का पाठलाग करतोस रोज माझा? सरळ बोल तुला काय बोलायचे आहे ते."
" रमा, तू आमच्या गावात येऊ नको. तुला दगा फटका होण्याची भीती आहे. गावातील वृध्द म्हातारे यांना पटत नाही तू गावातील मुलांना शिकवतेस ते." राणा चे शुद्ध आणि नम्र बोलणे ऐकून रमा अवाक झाली. तिला कळेना हा कसा काय असा वेगळाच आहे. "राणा, मला आधी सांग तू स्वतः तर चांगला शिकलेला वाटतोय तुझ्या बोलण्यावरून. पण मग मला का सांगतो आहेस शिकवू नकोस म्हणून."
"रमा, मला लहानपणापासूनच शिकण्याची आवड होती. मी माझ्या आबा सोबत तालुक्याला जायचो तेव्हा तेथील शाळा पाहिली की, मला पण शिकावेसे वाटे. पण आबा नाही म्हणायचे. कोप होईल आपल्यावर, गावात वाळीत टाकतील आपल्या घराला, जगणं कठीण होईल वगैरे भीती घालून मला चूप करायचे. एकदा खूप राग आला मला घरातल्या सगळ्यांचा. मी रागातच घर सोडले आणि भटकत राहिलो वाट मिळेल तिकडे. घरापासून खूप लांब जायचे होते मला. घरातून गेलो तेव्हा 8 वर्षाचा होतो मी. नशिबाने साथ दिली अन एका सद्गृहस्थाच्या मदतीने माझी शाळा सुरू झाली. पांडुरंगशास्त्री भेटले नसते तर मी पदवीधर झालो नसतो, कदाचित एखाद्या गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या असतो आज." बोलता बोलता राणा शांत बसला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. रमा पण भारावून गेली होती राणाची कथा ऐकून. भिकू पण अवाक झाला. भिकूचेही पापणकाठ ओलावले.
"आरं पन राना, तू आम्हांसनी सांगतल न्हायी तू शिकेल आहे बुक म्हून!" भिकू कडे राणा फक्त पहात होता. कारण त्याच्याविषयी गावात कोणीच चांगलं बोलत नव्हतं.
"बोल की रं राना! सगळे वंगाळ धंदे करतुया. कामून करतं हे समदं?"
"काय बोलू भिकू दादा सांग न. गावात राहिल्यावर यापरिस वेगळं काय होणार? तुझ्यासारखे नाही रे सगळे गावात! शिवाय आबांनी स्वतःची शपथ घातली मला, तू शिकून आलास हे गावात सांगशील तर बघ. मी खूप चिडलो, पण काही उपयोग झाला नाही."
" रमाने गावात येऊन शाळा सुरू केली ते मला खूप आवडले. आपण ही तिला मदत करावी असे वाटत होते. पण गावातली चावडीवरची चर्चा ऐकली अन रोज रमाचा पाठलाग करत होतो. कारण कधीही तिला दगा फटका होण्याची शक्यता आहे."
" हे बघ राणा, असं काहीही होणार नाही. जे चांगलं काम करतात त्यांना नेहमीच मदतीचा, सहकार्याचा हात मिळतो. तू सुद्धा माझ्यासोबत सहभागी हो. भिकू आहे आपल्यासोबत आणि गावातली बरेच लोकं आता विरोध करत नाहीत. तू अजिबात घाबरू नको."
रमा घरी आली आणि तिने तिच्या बाबांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. विष्णुपंतांना आश्चर्याचा धक्काच बसला ऐकून. किती ही अंधश्रद्धा, आणि अज्ञान! यावर काहीतरी मार्ग शोधावा लागेलच. दुसऱ्या दिवशी विष्णुपंतांनी गावातली पंचायत बोलावली. सगळ्यांसमोर विष्णुपंतांनी राणा च्या शिक्षणाचा गौप्यस्फोट केला. ऐकल्याबरोबर सगळेच राणाला वाटेल ते बोलू लागले. पण विष्णुपंतांनी परिस्थिती पाहून रमा आणि राणा ला पंचायती समोर बोलायला सांगितले. पण कोणीच ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. सगळा गोंधळ पाहून पंचायत उठून गेली.
राणा आणि रमा रोज घरोघरी जाऊन त्यांना शिक्षणाचे फायदे, त्यामुळे आपल्यात कसा बदल होईल, गावातील बदल, सुधारणा होत जातील, आपली आर्थिक परिस्थिती बदलेल, शांतपणे सगळं नीट सांगत होते. राणाचे बोलणे ऐकून गावकऱ्यां मध्ये हळूहळू बदल जाणवायला लागला. शाळेत येणाऱ्या मुलांची आणि मुलींची पण संख्या वाढली.
विष्णुपंतांना स्वतःच्या मुलीचा खूप अभिमान वाटला. विष्णुपंतांच्या मदतीने राणा आणि रमा दोघांनी मिळून गावातील लोकांमध्ये विचारांची जागृती केली. त्यांची विचार करण्याची संकुचित प्रवृत्ती बदलली. त्यांच्यात विचार स्वातंत्र्य निर्माण केलं. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी डोंगराळ भागात, तळागाळातील लोकांमध्ये विचाराचे स्वातंत्र्य, जगण्याचे स्वातंत्र्य नाही, ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे.
गावात शाळा सुरू झाली. फक्त शिकार करणारी तरुण मुलं वेगवेगळी कामं करण्यास उद्युक्त झाली, रोजगार निर्माण करणारे छोटे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी सरकारी मदत मिळवून देणे यासाठी रमा, राणा आणि विष्णुपंत कार्यरत होते. गावाचा विकास व्हावा हा ध्यास जणू सगळ्यांनीच घेतला होता.
अंधश्रद्धा आणि बुरसटलेल्या विचारांच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना परावृत्त करून त्यांच्यात जगण्याचे स्वातंत्र्य निर्माण झाल्याचे पाहून विष्णुपंत, लक्ष्मी, रमा आणि राणा सगळेच आनंदित होते. राणा स्वतः खूप समाधानी होता, कारण तो त्याच्या गावाचा विकास घडवून आणण्यात सहभागी झाला होता.
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment