सहज सुचलं म्हणून ..
संदीप खरे यांचे कवितेचा कोपरा यु ट्यूब वर ऐकत होते. त्यांनी त्यांची पौंगडावस्थेतील मुलांवर लिहिलेली कविता वाचली. त्यात त्या मुलाला आभाळभर प्रश्न पडतात पण ढगभर पण उत्तर मिळत नाही असे होते. कविता अप्रतिमच आहे. त्यांची सादर करण्याची पद्धत, कविता कशी सुचली वगैरे सांगत ते कविता सादर करत होते. पण माझं मन आभाळभर प्रश्नांच्या भोवती घुटमळत होते. किती सुंदर शब्द, आभाळभर प्रश्न!
जन्मानंतर कोहं पासून सुरू झालेली प्रश्न मालिका सतत भोवती पिंगा घालत असते. प्रत्येक क्षणी प्रश्न आणि प्रश्न. उत्तर शोधायला गेले तर मिळेलच याची शाश्वती नाही. असे म्हणतात आधी उत्तर तयार होतं आणि नंतर प्रश्न. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेच. मग का मिळत नाही आपल्याला. मुळात प्रश्न म्हणजे काय? तर ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, त्याबद्दल ज्ञान नाही म्हणजे त्या गोष्टीचे आकलन होत नाही त्यामुळे निर्माण होतात ते प्रश्न. म्हणजे त्याविषयी जिज्ञासा. पण काहीवेळेस बऱ्याच गोष्टी माहित असूनही प्रश्न निर्माण होतातच. एखाद दुसरा प्रश्न नाही तर असंख्य प्रश्न, म्हणजेच आभाळभर प्रश्न. उत्तर मात्र ढगभर पण सापडत नाही. असे कितीतरी अनुत्तरीत प्रश्न आहेत. किंबहुना त्याचं उत्तर असलं तरी ते मान्य नसतं किंवा शंकेखोर मन मान्य करत नाही. एखाद्याने खूप प्रश्न विचारले तर लगेच सगळे म्हणतात," किती चौकस बुध्दी आहे न! हो आहे पण सगळ्या प्रश्नांची नाही तरी किमान एखाद्या प्रश्नाचे तरी उत्तर मिळते का? समजा मिळाले तरी बरोबर उत्तर आहे की नाही आणि समाधान होते का?
तरणीताठी मुलं आत्महत्या करतात. कारण कधीच कळत नाही, कळलं तरी अगदी शुल्लक असतं. पण का असं वागावेसे वाटले, असं कोणतं आभाळ कोसळले होते, की आयुष्य संपवावे वाटलं. अशावेळी खरच आभाळभर प्रश्न पडतात ज्याचे उत्तर ढगभर ही कधीच मिळत नाही. अशा आणि याचसारख्या कितीतरी घटना घडतात. शाळेत पाचवी सहावी मध्ये शिकणारे मुलं मुली म्हणतात ती/तो माझा बी.एफ. आहे. आता मला वाटलं की बी.एफ.म्हणजे बेस्ट फ्रेंड. पण माझं ज्ञान किती अर्वाचीन(?) आहे हे तेव्हा कळलं जेव्हा हीच लहान लहान मुलं ओठांवर हात ठेऊन हसू दाबायचा प्रयत्न करून सांगत होती, बी. एफ. म्हणजे बॉय फ्रेंड. तेव्हा डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय नव्हता. यांच्या घरी माहित आहे का, मुलं बाहेर काय करतात?, कुणाशी बोलतात? कुठे जातात? अभ्यासाकडे लक्ष आहे की नाही? कुठे चालली आहे ही भारताची उदयास येणारी पिढी? अरे किती ही प्रश्न! पण उत्तर मिळत नाही.
शेवटी काय तर आयुष्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असलं तरीही ते मिळतच नाही. जे प्रश्न अनुत्तरीत राहतात त्यांना पूर्णविराम देऊन संपविले जातात स्वतः पुरेसे हेच खरं!
रसिका राजीव हिंगे
पुणे
.jpeg)
No comments:
Post a Comment