आली पहाट सजून
वाट काढीत भुवर
पांढुरक्या धुक्यातली
काळी सावळी सुंदर
रविराजास घेण्यासाठी अरुणाचा रथ निघाला. त्याच्या शुभ्र अश्र्वांच्या पायाचा टप टप आवाज लांबून ऐकू येऊ लागला अन् रोहिणीने पदर सावरत चंद्राच्या गळ्यातील आपले चांदण्यांचे हात काढले. दाट काळ्याभोर कुंतली माळलेला नक्षत्रांचा कोमेजलेला गजरा तिच्या धुंदीचा कैफ सांगत होता. रजनीने तिच्या नयनात घातलेली काजळरेखा पुसट होऊन तिच्या प्रीतीचे गोड संकेत देत होती. तिच्या पायातील मेघ रुपी पैंजण तिची लटकी लगबग पाहून उगाचच छमछमत होते. एकेक चांदणी दवबिंदूचे रुप घेऊन सृष्टीवर पांढुरक्या धुक्यातून वाट काढत विसावत होती. आळसावलेल्या निशा सवे पहाटेच्या प्रहरी पहारा करणारा शुक्रतारा पण निघाला. हळूहळू सप्तर्षी पण पहाटेच्या नित्यकर्म स्नानादी उरकण्यास आकाश गंगेकडे निघालेत. लगेच उषाराणीची लगबग सुरू झाली रविराजाच्या स्वागताची. केशराचे सडे शिंपीत सारा आसमंत सुगंधित केला. पारिजातकाच्या मनगंध पायघड्या अंथरल्या, जाईजुई, चमेलीच्या सुगंधित अत्तराचे कारंजे थुई थुई करत सृष्टीला मोहवित होते.
रविराज आपल्या सहस्र सोनसळी बाहुंनी सृष्टीला कवेत घेण्यासाठी पूर्व क्षितिजी डेरेदाखल झाला. दाट पांढुरक्या धुक्याच्या पदरा आडून येणाऱ्या उबदार किरणांचा स्पर्श होताच सावळी धरा मोहरली, शहारली, अन् तिच्या आरक्त झालेल्या कपोलांची लज्जेची लाली पूर्व क्षितिजावर केशरिया उधळत होती. दवबिंदूचा चंदेरी साज लेवून कुंद कळ्यांचे गजरे माळलेल्या सृष्टीच्या या आनंदात सारे विहंग कलरव करीत सामील झाले. सृष्टीनेही शुभ्र बगळ्यांची माळ रविराजास अर्पण केली.
पहाटेच्या धुक्यातील मंद गारव्यात गोठ्यातील गोधनाचा हंबर, राऊळात भूपाळीचे सुस्वर गायन, गृहिणींचे जात्यावर धान्य दळतांना गायलेल्या सुरेल ओव्या सारेच चराचरात चैतन्य फुलवीत होते.
अन् रविराज धुक्याचा पदर सारून सृष्टीला चैतन्याचे आंदण प्रदान करत तिच्या प्रीतीच्या हिंदोळ्यावर झुलत पूर्वेकडून पश्चिमेकडे ओंकाराच्या सुरेल नादात धुंद चालत होता संध्येला केशरियाचे दान देण्यासाठी....
रसिका राजीव हिंगे
#rasraj#पहाट #धुके#सारूनी पदर#
.jpeg)
No comments:
Post a Comment