Monday, 31 August 2020

सहज सुचलं म्हणून..आरसा






     शाळेत दुसरी किंवा तिसरीत असतांना मराठीत एक धडा होता "आरसा रडला, आरसा हसला"  आणि चित्र पण छान होते आरशातले रडणारा आणि हसणारा चेहरा.

     प्रत्येकाने नीटनेटके रहावे असा साधा आणि सोपा बोध असला तरी खूप काही शिकवून गेला. 

     त्यावेळी फक्त आपण छान दात घासावे, केस विंचरावे, रोज अंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालावेत म्हणजे आरसा हसेल. इतका साधा विचार मनात असायचा. पुढे सवयीने करता करता ह्या गोष्टी अंगवळणी पडत गेल्या आणि आज जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. 

     आज जेव्हा माझी मुलं मला म्हणतात अगं काय सारखी मागे लागते आंघोळीच्या? एक दिवस नाही केली तर कोणता फरक पडतो? 

     पण ह्या आरशाने ही सवय लावली याला मी तरी काय करणार? हा आरसा आणि घरातील आधारवड यांनी संगनमताने हे बाळकडू पाजलेआहे.

     रोजची स्वच्छता,नीटनेटके पणाची सवय आता गरज होऊ लागली आहे. कोविड 19 चा प्रादुर्भाव जसजसा वाढतो आहे तसे तसे स्वच्छतेचे महत्व अधोरेखित होते आहे. 

     जाहिरातींमधून,आरोग्य विभागाकडून, शासनाकडून याचा अगदी अतिरेक होतो आहे. विशेष म्हणजे सगळी ही टेक्नोसॅवी पिढी भीतीने म्हणा किंवा एक सुरक्षा म्हणून याची अमंलबजावणी करते आहे.  

     लहानपणापासूनच हा आरसा आमचा सखा, मित्र, मार्गदर्शकही आहे. 

     आरशातले प्रतिबिंब खरे रूप दाखवित असतं. पाण्यातले प्रतिबिंब जरी काळे अस्पष्ट दिसत असले तरी आरशातले मात्र सत्य रुप दिसतं आणि त्यावेळी आपण सावध होतो. 

     आयुष्यात वाटेवर असे बरेच आरसे आपल्याला दिसतात. काही आपले खरे रूप दाखवतात तर काही आरसे समोरच्याचे पण खरे रूप दाखवतात. फक्त आपल्याला ते पाहता यायला हवे.

     सद्गुरू नावाचा आरसा मात्र खरेच मार्गदर्शक होतो. मनाच्या स्वच्छते बरोबरच हृदयाचे पण परिवर्तन घडवून आणतात. आणि हा भवसागर लीलया पार करण्यास सहाय्यक होतात असे मला वाटतं...

     

रसिका राजीव हिंगे

     

     


No comments:

Post a Comment