अथर्वशीर्षाचा भावानुवाद(सुधाकरी अभंग रचना)
ओंकार स्वरूपा नमन गणेशा
तुज गणाधीशा गणपती।
तूच तत्वमसि सृष्टीचा निर्माता
पालन करता संहारक।
तूच अविनाशी हे आत्मस्वरूपा
हे ब्रह्मस्वरूपा गजानन।
रक्ष रक्ष परमेशा वक्ता श्रोता दाता
अध्ययन कर्ता वेदांताचे।
गुरू सानिध्यात जे जे उपासक
रक्षसि साधक प्रेमभरे।
दशदिशांतरी रक्ष आसमंती
हे मंगलमूर्ती सर्वव्यापी।
आनंद निधान शब्द सामर्थ्य तू
चैतन्यमय तू वक्रतुंडा।
तू सत् चित् आनंदा तूच ब्रह्माकार
अद्वैताचे सार शंभुसुता।
ज्ञानरुप देवा विज्ञानाधिष्ठित
हृदयाधिष्ठित बुद्धिदाता।
विश्वाची उत्पत्ती, करी स्थिती लया
पुनःनिर्मावया तुझ्या ठायी।
पंचभुतात्मका सौंदर्य वसते
मधुरता असे चौ वाणींची।
त्रिगुणांचा स्वामी सत्व रज तम
देह स्थूल सूक्ष्म कारण तू।
भूत वर्तमान भविष्याचा वेध
अवस्थांचा बोध तीनही तू।
सृष्टी मुलाधारा शक्ती प्रदायका
तू योगिध्यायका सिद्धेश्वरा।
चतुरानन तू तू सृष्टीपालक
सृष्टी संहारक त्रिदेवा तू।
त्रिभुवनधीशा वायू प्राणदाता
हे अग्नी प्रदाता तेजोनिधी।
तू शीतल चंद्र स्वर्ग पृथ्वी रक्ष
तूच अंतरिक्ष ओमकारा।
अंती अनुस्वार ग् कार प्रथम
अकार मध्यम विद्या मंत्र।
प्रणव उच्चार वर्णाचे संधान
संधि संमीलन संहितेचे।
गणेश विद्या ही गणेशाची प्राप्ती
मंत्र अनुभूती एकाक्षरी।
गणक दाता हा निचृद्गायत्रीच्छंद
गणेश देवता मंत्राची या।
गणेश गायत्री वक्रतुंड ध्यान
भक्तीचे संधान द्यावे आता।
वरदमुद्रा ती भग्नदंत।
रक्त ध्वजांकित मूषक वाहन
तेज रक्तवर्ण लंबोदर।
चतुर्भुज देवा ज्याचे शूर्पकर्ण
वस्त्रे रक्तवर्ण एकदंता।
उटी सर्वांगासी ती रक्तचंदनी
तांबडया फुलांनी भक्त ध्याती।
भक्तांवर दृष्टी निरंतर कृपा
ऐसा देवबाप्पा विश्वकर्ता।
प्रकृति पुरुष यांच्याही पुढती
जो जो कोणी ध्याती श्रेष्ठ योगी।
देवांच्या तू देवा व्रातगण पती
शिवगण पती नमो नमो।
ऐसा लंबोदर असे विघ्नहर्ता
शिवशक्ती सुता पूजीला मी।
इच्छा वरदाता देव श्रीगणेश
वंदिला भावेश सिद्धेश्वर।
अथर्वशीर्षाचा भक्तीचा सोपान
चढण्याचा यत्न म्या केला हो।
मनी जे जे आले बाप्पाने कथिले
श्रीगुरू वदले हेच भाव।
ऐका श्रोतेगण आता फलश्रुती
सांगे गणपती स्तोत्राची या।
अथर्वशीर्षाचे करी अध्ययन
ते ते भाग्यवान जगती या।
विघ्नाची न बाधा पंचपाप मुक्ती
ऐसी आहे शक्ती स्तोत्राची या।
संध्या समयासी करा याचा जप
दिसातील पाप नाश पावे।
दिनजन्मावेळी करावे पठण
पापाचे क्षालन रात्रीचे या।
पठण त्रिवार चारी पुरुषार्थ
धर्म काम अर्थ मोक्ष प्राप्ती।
अथर्वशीर्षासी नसे श्रद्धा भाव
तयासी ही ठेव देऊ नये।
गणेशाची ठेव जरी अज्ञानाने
देई जो मोहाने पापी होय।
जे सहस्त्रवेळा करी आवर्तने
होतसे भक्तीने इच्छापूर्ती।
अथर्वशीर्षाने करी अभिषेक
ऐसे प्रमाणक वक्ता वाग्मी।
अथर्वण बोले चतुर्थी निर्जली
जपे मंत्रावळी विद्यावान।
स्तोत्रास जपती जाणे ब्रह्ममाया
होई तो निर्भया भय नसे।
कुबेरासम तो होई धनवान
हवन पूजन दुर्वांकुरे।
साळीच्या लाह्यांनी करिती हवन
धावे गजानन सर्वगामी।
इच्छित फळ ते लाभती सर्वत्र
मोदक सहस्त्र हवनासी।
अष्ट ब्राह्मणांसी करी उपदेश
जैसा व्योमकेश तेजस्विता।
जे ग्रहणकाळी जप नदीकाठी
रमती मंत्रपाठी सिद्धमंत्र।
जपता हा मंत्र मूर्तीच्या जवळ
एक लक्ष वेळ दोषमुक्त।
नाश पावे पाप राही ना निःशेष
पावती संतोष सर्वत्रही।
महात्म्य पाठाचे लाभे कृतार्थता
आणि सर्वज्ञता पाठकर्त्या।
उपनिषद श्रुती श्रीगणेश प्राप्ती
धन्यता पावती स्तोत्राने या।
अथर्वशीर्षाचा गणेश प्रसाद
हा भावानुवाद पूर्ण होई।
सद्गुरू नाथा घालूनिया साद
हा गुणानुवाद कथियेला।
त्रिवार क्षमा ती करावी आपण
चुकले प्रमाण श्रोतेजन।
रसिका राजीव हिंगे



No comments:
Post a Comment