पाऊस सरसर आला आणि धरतीला चिंब भिजवून गेला. धरेवर कुठे तळी साचली तर कुठे पाणी वाहून गेलं. जिथे तळी साचली त्या तळ्यात बालपण येतं खेळायला. लहान लहान सगळे सवंगडी जमून वहीची पाने भराभर फाडून नावा तयार करायच्या किंवा कोणाकडून तरी करून घ्यायच्या. आई बाबा तर हक्काचे असतात अशा कामांसाठी. कागदाच्या नावा करून पाण्यात सोडायच्या आणि त्याच्या हेलकाव्याकडे पहात रहायचे एवढंच. त्या हेलकावण्याचा अर्थ सुद्धा कळत नसतो या अल्लड वयात, ही निरागसता फक्त आणि फक्त हास्याच्या आणि आनंदाच्या किनाऱ्यावर उभे राहून लक्ष ठेवून असते माझी नाव कितीवेळ तरंगते याकडे.
वारा झालासे उनाड
पावसाचे हे थैमान
तळी विहिरी भरल्या
बागडले बालपण
नावा घेती हेलकावे
साचलेल्या पाण्यातून
झाले उतावीळ बाल्य
दिसे प्रतिबिंबातून
भवसागरात आपली नाव कशी सोडायची आणि हा सागर पार कसा करायचा याचे हे प्रात्यक्षिक असेल कदाचित. सोबत कसेही सवंगडी असले तरी पार तर व्हावे लागेलच न. सवंगडी बदलले तरी भाव तोच आहे किती वेळ माझी नाव तरंगेल? एखादया वेळेस असाच एखादा उनाड ढग वाऱ्याबरोबर येऊन नाव भिजवत असेल आणि ....एका क्षणात होत्याच नव्हतं होत असेल नाही का?
पण ज्यावेळी आपल्या नावेचे सुकाणू गुरुरायाच्या हातात असतात तेंव्हा मात्र हा भवसागर लीलया पार होतो, पठण, श्रवण, मनन, चिंतन आणि नामस्मरण याच्या बळावर साधना वाढत जाते आणि नावेचे सुकाणू आपल्या आराध्याकडून आपल्या गुरुकडे सोपविले जातात.
इथे नाव भिजण्याची शक्यता नसतेच आणि हेलकावे पण नाही असं मला वाटतं....
रसिका

No comments:
Post a Comment