Tuesday, 18 August 2020

मातृदिना निमित्ताने


 


तुला स्मरतांना आज

बालपण आठवे ग

तुझी मूर्त पुढे येई

आई मला आकळे ग


तुझे संस्कारांचे देणे

तेव्हा नव्हते कळत

येई प्रचिती मजला

आज प्रत्येक क्षणात

तुझे बोलणे वागणे

आज आठवे सारे ग

तुझी मूर्त पुढे येई

आई  मला आकळे ग


आई झाले असतांना

कसे जगावे जीवनी

तूच आहेस आदर्श

दुजा नसे ग कोणी

मीच मजला सांगते

तुझी थोरवी काय ग

तुझी मूर्त पुढे येई

आई मला आकळे ग


तुझे वाचन संस्कार

घडवीत गेले मला

तुझ्या प्रतिभेचा वसा

पुढे चालवू दे मला

सारे करिती वाहवा

कौतुकास तू नसे ग

तुझी मूर्त पुढे येई

आई मला आकळे ग


तुला स्मरतांना आज

बालपण आठवे ग

तुझी मूर्त पुढे येई

आई मला आकळे ग


रसिका राजीव हिंगे




No comments:

Post a Comment