सुख दुःख......
काळ वेगात धावत असतो. सगळ्यात जास्त घाई वेळेला असते. वेळेला वेळच नसतो विचार करायला. क्षणभर काळ थांबला असे कधी होतं का? हो. एक निमिष काळ थांबतो, जेव्हा एखादा दुःखद अनुभव येणार असेल तेव्हा. कितीही म्हटले की सुख दुःख नाहीच कुठे, हे आभास आहे. काल्पनिक आहे तरी संसारात, या भवसागरात जगत असताना यांच्याशी सामना करावाच लागतो. सुख प्राप्त झाले की आनंदाच्या लाटा उसळतात. पण दुःख आले की मात्र या आनंद सागराचे पर्यवसन शोक सागरात होते. असे का? यावरून एकच सिद्ध होते की मानव किती गुरफटला आहे या मायेच्या बंधनात. सुख दुःख हे मानले तर आहे हे सगळं कळत असतं, पण वळत नाही. सामान्य जीव दुःखात होरपळून निघतोच आणि सुखात हुरळून जातो. एक लाट विरत नाही तर दुसरी लाट तिच्या पाठी असतेच तसेच दुःखाचे क्षण येत जातात. एका जखमेवर खपली धरत नाही तर दुसरी जखम तयार आहे. भळाभळा रक्त वाहतेच आहे. किती मलम पट्टी करावी, तरी जखम ठसठसते. डोळ्यातले अश्रू सुद्धा थिजून जातात. यालाच संसार सागर म्हणायचे का? केव्हापासून चे असेल प्रारब्ध, संचित कधी सांगता येत नाही. सत्कर्म करा हे बाळकडू घेतच लहानाचे मोठे झालो आम्ही. या सत्कर्माचे फळ मिळावे न कुठेतरी. मिळाले असेल तर दिसावे. पण ईश्वराचा नियमच वेगळा आहे. तो देतो पण दिसत नाही आणि कळत ही नाही. सूक्ष्म कर्म मग ते चांगले असो की वाईट त्याचे ते फळ देऊन तो मोकळा होतो. हेच ते संचित. ज्याचे प्रारब्ध भोगून झाले तो इथे राहूच शकत नाही. थांब पाहू पुढे नाहीच. उधारी नाहीच. जाणारा निघून जातो, पण त्याच्या पाठी असलेले त्यांचं आयुष्य एक निमिष थांबतच. काळ थांबला म्हणजे काय ते हेच. तो एकच क्षण असतो सगळं संपलं असे सांगणारा. पण पुढचा क्षण उभा आहे न समोर सांगायला, "सावर बयो, काळ पुन्हा पुढे सरकतो आहे." तो पुढे चालतच असतो, माझ्या साठी थांबला होता एक निमिष फक्त.....हा पण भास असेल कदाचित....
हीह
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment