बाप्पा.....
"येतो ग बयो मी."
"अरे कोण कुजबुजले कानात?" ओह बाप्पा बोलतोय.
निघालास तू! हो जावे लागेल म्हणतोय. ठीक आहे. तुला म्हणून सांगते बाप्पा, तुला काय सांगते! सगळं तुला माहीत असतं. तरी सांगते, ऐक. श्रावणाच्या सरी येतात. उन पावसाचा खेळ खेळत. घननीळ सावळ्या, जांभुळल्या मेघांच्या संगतीने त्या सरींमध्ये चिंब भिजताना सृष्टीच्या मोहक रुपात सारे जगत वेडावून जाते. श्रावण सरींचा आनंद लुटायला लागले की लगेच भादवा घेऊन तू वेशीवर उभा दिसतो. मग मात्र साऱ्यांचे भान हरपतं. तुझ्या तयारीसाठी तुझ्या भक्तांसवे सृष्टी ही सज्ज होते. तुझ्या साठी काय काय करू न किती करू असे प्रत्येकाचेच आहे बरं का. तू येतो वाजत गाजत. ढोल ताशांच्या गजरात.कधी कधी निसर्ग सुद्धा मेघांच्या मृदंगाने तुझे स्वागत करतो. फक्त आनंद आणि आनंद. सकाळ संध्याकाळची तुझी आरती करण्याची सवय होते न होते तर तू आज लगेच माझ्या कानाशी कुजबुजला, येतो ग बयो.
तसा तू चराचरात भरलेला आहे. तू नाही अशी जागाच नाही. तरी तुझी जाण्याची वेळ आली की दाटून येतं बघ. कितीही कळत असलं की तू आहेच, समर्थ रामदास स्वामी कळकळीने सांगतात रीता ठाव या राघवेवीण नाही, दिसे घनदाट हरी भरलेला माऊली पण सांगते आहे. पण खरंच सांगू तुला, तुझे सगुण रूप पहायची सवय असलेल्या माझ्या सारख्या सामान्यांना हे पचनी पडत नाही. ज्याला जसे भावेल, जसे आवडेल त्या रुपात सजवायला फार आवडतं तुझ्या भक्तांना. तू पण निमूटपणे सगळे सोपस्कार करून घेतो. मजा वाटते न तुला. तुझ्याच फॅक्टरी मध्ये तयार झालेल्या वेगवेगळ्या मानव रूपाला बघतांना. हौशे, गवशे, कुणी तुझ्यावर प्रेम करणारे, कुणी तुला आजमावत असतं तर कुणी तुझी परीक्षा घेत असतं. तुझ्या उत्सवात सगळ्यांना बिनधास्त प्रवेश असतो. राग नाही येत का रे तुला? कुणी कसाही असू दे तू त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतोच. तीनही गुणांच्या पल्याड असलेला तू, काळाची सत्ता तुझ्यावर चालत नाही असा तू , तूच ब्रह्म आहेस, तूच कर्ता तूच धर्ता आणि हर्ता ही तूच. उत्पत्ती, स्थिती, लय सगळं सगळं तूच तू. मग आता मला सांग सगळं तूच आहेस तर हे लीला वैभव कशासाठी रे. तुझी स्थापना, तुझी आरती, तुझे विसर्जन हे सगळे कशासाठी बाप्पा. तुझ्या अनुसंधानात राहण्याचा हा एक मार्ग आहे हे सांगतो आहेस न तू. मान्य आहे. तू आलास की जातो पण. पुन्हा येण्याचे वचन देऊन. वर्षभर तू येणार तू येणार असे म्हणत सतत तुझ्या नामात सारे असतात. तुला जे करायचे ते तू करतो. तुझे नाम सतत घ्यावे म्हणूनच तुझा हा अट्टाहास असतो. जे तुझे नाम घेतात त्यांनाही जे हवे ते देतोस अन् जे तुला आजमावत असतात, तुझा तिरस्कार करतात, त्यांनाही देतोस. रामावतारात रावणाचा उद्धार केलास आणि पूर्णावतार कृष्णाच्या रुपात कंसाचा उद्धार केलास. अजब तुझी माया. माझ्यासारख्या अज्ञानी भक्ताला काही कळत नाही हे खरं आहे तरी पण बाप्पा, तुझी माया आवर आता, अन् कळू दे मला तू आणि मी एकच आहे.... एवढंच सांगायचे आहे.....
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment