आज कोजागिरी पुनव. आकाशात शांत शीतल शरदाचं चांदणं बहरलं आहे. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दुधाळ प्रकाशाचं शिंपण करत सृष्टीवर शीतलतेच दान करतो आहे. चंद्र हा स्वयं प्रकाशित नाही. सूर्याकडून प्राप्त झालेल्या प्रकाशाने चंद्र शीतलता दान करतो. केवढे हे औदार्य. या ईश्वरी शक्ती फक्त आणि फक्त देत राहतात. देणे ह्या संस्कृतीचा पाया आहे असे आपण म्हणतो ते याच कारणास्तव.
आज या विज्ञान युग म्हणणाऱ्या जगात वावरतांना प्रकर्षाने जाणवतं की आपले पूर्वज वेडे नव्हते,अंधश्रद्धाळू तर नाहीच नाही. श्रद्धा ही अंध कधीच नसते. अश्रद्ध म्हणता येईल एखादेवेळी. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून साजरा केला जातो. शरदाआच्या चांदण्यात कोजागिरीला रात्रीच्या चंद्र प्रकाशात आटवलेल्या दुधाचं जे महत्व, चव आहे , त्याच्या साक्षीने एकत्र येऊन नात्याचा होत असलेला उत्सव तसेच या चंद्र प्रकाशामुळे आरोग्याचे जे आंदण मिळतं ते अलौकिक आहे यात शंका नाही. तेव्हा हा पुनवेचा चंद्र पहावा,अनुभवावा आणि जगावा....
याच कोजागिरीच्या दिवशी गोपींनी आपल्या पायाची धूळ त्यांच्या कान्हा साठी पाठवली होती. आजारी असल्याची लीला करणाऱ्या श्रीकृष्णा साठी. रात्रभर रास खेळल्या कृष्णाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन. शबरी माहित नाही असा एकही भारतीय नसेल. निस्सीम भक्त श्रीरामाची. गुरूच्या शब्दावर विश्वास ठेऊन अविरत श्रीरामाची वाट पाहणाऱ्या शबरीचा जन्म याच दिवशी. गोपी किंवा शबरी नामाचे महत्त्व सांगतात आहे जणू. अखंड अनुसंधान परमात्म्याशी. श्रीकृष्णाशी आणि श्रीरामाशी एकरूप होऊन गेलेल्या. कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी रात्री फिरते कोजाग्रती विचारत. जागे आहात का याचा अर्थ नरदेह कशासाठी मिळाला आहे याचे भान आहे न! जागा हो. चौऱ्यांशी लक्ष योनी फिरल्यानंतर तुझे पाप पुण्य समसमान झाले अन् तुला हा नर देह मिळाला आहे त्याचे सार्थक करून घे. यासाठीच ती फिरत असावी, सगळ्यांना जागे करण्यासाठी....
रसिका राजीव हिंगे
.jpeg)
No comments:
Post a Comment