रूढी आणि परंपरा
पहाटेचे अभ्यंगस्नान, तेलाचा दरवळ उटण्याचा सुगंध पदार्थांची रेलचेल, फटाक्यांची आतषबाजी अशी झाली दिवाळी साजरी चार दिवस परंपरेनुसार पारंपरिकपणे. सगळे कुळकुलाचार सांभाळत. लेकीचे माहेरपण करतांना स्वतःचे माहेर लक्षातच रहात नाही. जसे आईने केले तसेच पुढे ही परंपरा सुरू असते. रूढी मनात घर करून बसतात आणि त्यानुसार परंपरा पाळल्या जातात, मनात भीती घेऊन किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा दबाव! म्हणण्यापेक्षा धाक यामुळे असेल कदाचित.
काळानुरूप बदल होतात आणि ते अपेक्षित ही आहेत. आजच्या सारखाच उद्या कुठे असतो. नव्हे या क्षणासारखा पुढचा क्षण देखील नसतो. त्यामुळे ज्या रीतीभाती आहेत, रूढी आहेत त्या जपाव्यात पण शास्त्रात सांगितल्या नुसार जे योग्य आहे ते करावे. आपले शास्त्र इतके पुरातन आहे की त्यामध्ये जीवन जगताना जे आवश्यक आहे तेच सांगितले आहे. जशा चालू आहेत तशाच चालू ठेवाव्यात. कुणीतरी एखादा तर यातून कशी न काही उचलत असेलच. उगाच आपल्या संस्कृतीची टिंगल न करता ज्याला जे रुचेल,पचेल ते त्याने घ्यावे. म्हणून तरी या रूढी आणि परंपरा, रीतिभाती पुढे अशाच चालू राहाव्यात.
अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या परंपरा म्हणून पुढे चालविल्या जातात. एखादी त्यावेळेसच्या काळानुसार केल्या गेलीली गोष्ट तीच पुढे तशीच चालू राहते, त्यात बदल होत नाहीत. आता महालक्ष्मी हा सण. प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. भाव तोच असला तरी साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. सुरुवात जिथून झाली त्यावेळी जी परिस्थिती असेल, जे उपलब्ध असेल त्याचा उपयोग करून आपली भक्ती, श्रद्धा आपण जोपासत असतो. त्यावेळी महालक्ष्मी चे आवाहन करताना त्यादिवशी भाकरी आणि मेथीची भाजी असेल तोच नैवेद्य दाखवला. कारण अंबाबाई म्हणजे माहेरवाशीण घरी आली तर तिचे आगत स्वागत करायला हवे हा साधा भोळा भाव मनात. झाले तिथून सुरू झाले आमच्याकडे भाकरी आणि मेथीची भाजीच नैवेद्याला असते. मला थोडक्यात हेच सांगायचे आहे की जसे आणि जे उपलब्ध असेल त्याने सण साजरा करावा. त्यात काळानुसार घरातल्या कर्त्या स्त्री च्या म्हणण्यानुसार बदल घडत जातात आणि ह्याच परंपरा आहे असे मानल्या जातात. आज जर तुम्ही तुमच्या वेळेनुसार पंच पक्वान्न जर वाढले तर देवी खाणार नाही का? अहो ती तर जगन् माय आहे. स्वतःच्या लेकरावर ती रागे भरेल का कोपेल का? आधी कुलाचार म्हणजे काय? ते का करतात, ह्या कुलाचाराच्या, सणांच्या परंपरा का सुरू झाल्या याचे ज्ञान आपल्या पुढील पिढीला जर दिले गेले न तर आपल्यापेक्षाही ही पिढी चांगल्या रूढी आणि परंपरा जोपासतील यात तिळमात्र शंका नाही. कुलदेवतेचे स्मरण व्हावे, तिची आपल्यावर कृपा राहावी हीच एक माफक अपेक्षा आहेत आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या परंपरेच्या मागे. मग आपण ती कशी करतो यापेक्षा ती परंपरा पाळतो हे महत्वाचे आहे.
श्राद्ध पक्ष या बाबतीत पण तेच. आपल्या पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांचं स्मरण करणे. शास्त्रात सांगितले म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी अनुभवाच्या कसोटीवर शास्त्र नियम लिहिले आहेत. पिंडदान करायचे म्हणजे ज्यावेळेस ते गेले ते स्वतः इथे येत नाहीत तर पिंडदान करण्याच्या वेळी ते ज्या जन्मात असतात तिथून ते येतात अन् आपली सेवा पिंडदान स्वीकारतात. असे अगदी अधिकारी असलेल्या गुरुजींनी आम्हाला गोकर्ण महाबळेश्वर येथे सांगितले. शास्त्राला आव्हान देऊ नये असे असले तरी पिंडदान याला पर्याय अन्नदान नाही असेही ते गुरुजी म्हणाले. अन्नदान हे पुण्यकर्म निश्चित आहे. सत्कर्म आहे अन्नदान करणे. वेळ मिळत नाही ही सबब असली तरी एक पंधरावीस मिनिटांचे तर्पण केले तरी आपले पूर्वज संतुष्ट होतात. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतात. फक्त डोळसपणे ते पाहता आले तर परंपरा आणि रुढीचे ओझे वाटणार नाही. महत्वाचे म्हणजे का करायचे याचे ज्ञान व्हायला हवे. वयोमानानुसार किंवा त्यावेळच्या परिस्थितीनुसार एखादी क्रिया घडली तर तीच पुढे चालत येते. त्यामागचं शास्त्रीय कारण समजून घेतले तर नव्या रुपात जुन्याच रूढी आणि परंपरा आपल्या समोर येतील येतील येतीलच....
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment