एकच तत्व..
रोज सकाळी फिरायला (म्हणजे morning walk) सोबत माझी मैत्रीण असते. आजकाल सगळे जसे भेटले की हाय, हॅलो करतात तसे सकाळी तिची भेट झाली की मी गुरुदेव दत्त असे म्हणते आणि ती जय श्रीराम. तिने जय श्रीराम म्हटले की मी अगदी जणू आठवणीने गुरुदेव दत्त म्हणते. हळूहळू काही दिवसातच मी गुरुदेव दत्त म्हटले की ती पण गुरुदेव दत्त म्हणायला लागली. याची दखल घेतल्या गेली पण लक्षात यायला वेळ लागला. तिला हे लगेच कळले की जय श्रीराम म्हणा की गुरुदेव दत्त म्हणा शेवटी रूपं अनेक असली तरी तो परमात्मा एकच आहे. वेगवेगळ्या रूपात भक्तांच्या हाकेला साद घालण्यास तो पृथ्वीवर अवतार घेतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेच आहे न "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे" वास्तविक पाहता अवतरण म्हणजे खाली येणे, खालच्या पातळीवर उतरणे.
पण परमात्मा इतका दयाळू आहे हो त्याच्या भक्तांसाठी तो काहीही करायला तयार असतो. फक्त त्याच्या अनुसंधानात राहता आले पाहिजे. रागाने, लोभाने, तिरस्काराने, गमतीने किंवा विनोदाने कोणत्याही परिस्थितीत जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याचेच स्मरण केले तर तो दखल घेतोच घेतो नव्हे घ्यावीच लागते.
भक्त प्रल्हादाला किती यातना सहन कराव्या लागल्या पण त्याने नारायण नाम सोडले नाही. पर्वतावरून ढकलून दिले तरी पर्वत नारायण, खोल दरी नारायण, उकळत्या तेलात तळून काढले तरी तेल नारायण, विस्तव नारायण. एका नारायणा वाचून दुसरे काहीच माहिती नाही. त्याच्या साठी प्रगटले न विष्णू खांबातून. असा हा परमात्मा भक्तासाठी काहीही करू शकतो. तुम्ही गुरुदेव दत्त म्हणा की जय श्रीराम म्हणा किंवा अंबाबाईचा गजर करा, एकच तत्व सगळीकडे भरून उरलेले आहे. फक्त ओळखता आले पाहिजे. त्यासाठी एकच सतत अखंड भगवंताचे अनुसंधान ठेवावे लागेल. माझे सद्गुरू म्हणतात, नामाचे इतके गाठोडे करा की ते वजनदार झाले पाहिजे. आजकाल कोणत्याही कामासाठी मोल देऊन काम करून घेण्याची सवय आहे.पण हे नामाचे गाठोडे वजनदार झाले तरी हे इतके अनमोल आहे की त्याची कशाशीच तुलना करता येणार नाही शिवाय प्रत्यक्ष भगवंत सोबत असेल, सद्गुरू सोबत असतील यात शंका नाही. सद्गुरू सोबत आहेत म्हणजे सगळेच मार्ग, वाटा सुकर, सुलभ होतात.
एकच तत्व सगळीकडे आहे याची जाणीव झाली की सगळेच सोपे होऊन जाते. जाणीव होणे गरजेचे आहे. जाणीव होण्यासाठी श्रीगुरु चरणी लीन व्हावे, त्यांना सेवावे, भजावे, त्यांचे सारे ऐकावे. अखंड नाम आपोआप घेतल्या जाईल....
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment