rasraj#सप्तपदी#विवाह संस्कार#
विवाह संस्कार! गृहस्थाश्रम स्वीकारण्याची पहिली पायरी. अत्यंत पवित्र असलेला हा संस्कार दोन मनांना जोडणारा, दोन घराणी एकत्र बांधणारा, सोयरा निर्माण करणारा. सोयरा याचा अर्थ एकमेकांची सोय जाणतो तो. अनेक शास्त्रशुद्ध विधी असलेल्या ह्या संस्कारातील सप्तपदी हा एक विधी.
सप्तपदी हे रोज चालते
तुझ्यासवे ते, शत जन्मीचे हो, माझे नाते
सप्तपदी चालणे म्हणजे एक यज्ञ आहे. आपल्या जोडीदाराबरोबर सात पावलं म्हणजे आयुष्यभर चालायचे म्हणजे एकमेकांचे गुणदोष स्विकारून निर्दोष वृत्तीने, कोणताही विकल्प मनात न ठेवता केलेली वाटचाल म्हणजे सप्तपदी. फक्त अग्नीभोवती सात फेरे घेणे म्हणजे सप्तपदी नव्हे. अग्नीला साक्षी ठेवून, जी सात पावलं चालली जातात त्याला अर्थपूर्ण असा शास्त्रीय आधार आहे, त्या मंत्रांमध्ये शक्ती,सामर्थ्य आहे. विवाहानंतर येणाऱ्या जबाबदारीची, कर्तव्याची जाणीव आहे. गृहस्थाश्रम स्वीकारण्याची एक प्रकारे ही संमती आहे. शास्त्रानुसार सप्तपदी चालताना जी वचनं एकमेकांनी द्यायची घ्यायची आहे ती खरेच आचरणात आणली तर आयुष्य सुखाचं होईलच शिवाय मनुष्य जन्माचे सार्थक होईल. समाधान लाभेल.
प्रत्येक पाऊल समजून उमजून उचलायचे आहे हा विचार सप्तपदी देते. जोडीदाराच्या हातात हात देऊन केलेली ही वाटचाल म्हणजे प्रत्येक क्षणी, सुख दुःखात मी तुझ्याबरोबर आहे याची ग्वाही आहे. एकमेकांना आधार,सहाय्य करावे या जाणिवेतून जीवनाची यशस्वी वाटचाल करायची आहे.
पहिले पाऊल शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. तुझे माझे नाते हे काम टिकणारे राहो. सुख दुःखाचे डोंगर उभे राहिले तरी सारासार विचार करून सहनशीलतेने कायम तू माझ्यासोबत रहा. क्षुल्लक कारणावरून वाद नको व्हायला. असे हे निरंतर कायम टिकणारे नाते निर्माण व्हावे.
दुसरे पाऊल हे विश्वासाचे आहे. नाते तेव्हाच टिकेल जेव्हा एकमेकावर दृढ विश्वास असेल. विश्वासाने हात हातात दिलेला आहेस तर त्याचे सार्थक करण्याची जबाबदारी दोघांची आहे. एकमेकांचे बळ, शक्ती वाढवीत आयुष्य जगायचे आहे.
तिसरे पाऊल दृढ परिचय. एकदा विश्वास टाकला की मनातले सगळे संकल्प विकल्प यांचा निरास होऊन ओळख वाढत जाते. Made for each other असेच वाटायला लागते. प्रेम आणि विश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचे आहे.
चौथे पाऊल प्रतिसाद. साद घातली की प्रतिसाद मिळावा. सुख देणारी, कुटुंब व्यवस्था सांभाळणारी तू हो. जीवनात अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरे शोधायची म्हणजे सोबत तू असशील तर सहज शक्य होईल.
पाचवे पाऊल सन्मान. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ, याचे उत्तर शोधूच नये. आपापल्या कर्तृत्वाने अहंकार न करता याचे उत्तर देता आले तरच एकमेकांचे होता येते, एकमेकांचा सन्मान केल्या जातो. सन्मान म्हणजे रोज पायघड्या घालाव्या असे नाही. पण अपमान होईल असेही वागू नये.
सहावे पाऊल महत्वाकांक्षा. सन्मान करतांना मोठेपणाची हाव मनात नसावी. मी मी माझे माझे अशी वृत्ती असेल तर संसार सुखाचा कसा होईल?. कुणी कोणाची सेवा करावी हा प्रश्नच नको निर्माण व्हायला. एकमेकांप्रती आदर ठेवला की मोठेपणाचा हव्यास आपोआप गळून पडतो.
सातवे पाऊल आत्मसमर्पण. इथे आत्मसमर्पण म्हणजे शरणागती नव्हे. हा एक पैलू असला तरी दोघांनी मिळून सामर्थ्य, धैर्य, संपत्ती यासाठी ईश्वराला प्रार्थना करायची आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्नशील असावे. तसेच सकारात्मक विचारांची कास धरली तर उत्तम संतती प्राप्त होईल. निष्ठा, एकत्रता, सख्य असेल तर संसार सुखाचा होईल.
अर्थात संसार म्हटला की भांड्याला भांडे लागणारच पण त्याचा आवाज दिवाणखान्यात येता कामा नये. सप्तपदी कडे फक्त एक इव्हेंट म्हणून न पाहता त्यातील मंत्राचा प्रभाव किती खोलवर आहे, सुखावह आहे आयुष्य जगण्यासाठी हे पाहिले तर खरेच संसार छान होईल. उठसुठ घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे ते कमी होईल हे निश्चित. मित्रत्वाची भावना असेल तर नात्यामध्ये परिपक्वता येते. या संसाराच्या सहप्रवासात कधी कोणी सारथ्य करावे तर कधी कोणी रथी व्हावे. कधी नमते घ्यावे तर कधी पडते घ्यावे. तरच संसाराच्या सारीपटावर मनासारखे दान पडेल अन् सौख्याचे क्षण अनुभवता येतील...हे निर्विवाद सत्य आहे..
©️®️रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment