शांत प्रशांत सागरतीर. रात्रीची निरव शांतता. नितळ स्तब्ध पाणी आणि त्यावर तरंगणारी नाव. इतकी शांतता की पाण्यावर हवेने उठलेले तरंग सुद्धा शांततेचा भंग करतात का असे वाटावे. जणू सुख दुःखाच्या पल्याड शांत जीवनासारखे
चंद्राच्या शीतल प्रकाशात न्हाऊन निघालेला परिसर जणू खुणावतो आहे चल नाव तयार आहे, हातात हात घालून सागराच्या पाण्यावर तरंगून येवू. आजपर्यंत किनाऱ्यावर बसून सागराची गाज फक्त ऐकली आता अनुभवू.
रात्रीच्या काळ्या अंधारात पाणी काळसर झाले असले तरी चंद्रप्रकाशामुळे निळ्या नावेचे प्रतिबिंब पाण्यात स्पष्ट दिसते आहे जणू कितीही अंधार असला तरी कुठूनतरी प्रकाशाचा कवडसा येतो आणि सगळंच उजळून टाकतो तसंच.भरतीच्या वेळी सागरात आधी नाव हेलकावेच घेते पण हळूहळू संथ होत जाणाऱ्या ओहोटीच्या पाण्यावर तरंगायला लागते कुठेतरी स्थिरता यावी तशी.
या नावेत बसलेले सगळेच प्रवासी एक ध्येय घेऊन किंवा एका निश्चित ठिकाण ठरवून आलेत. ज्या दिशेने जावयाचे आहे त्याच नावेत बसले की किनारा सहज गाठता येतो. जणू जीवनाचे ध्येय ठरविले की यशोशिखर लीलया गाठता येतं तसेच.
ही नाव, सागर , चंद्रप्रकाश सगळंच जीवनाशी कसं जोडल्या जातं आहे. का ही जीवननौका आहे भवसागरात स्थिरावलेली. कृतार्थतेच्या आनंदसागरात स्थिर झालेल्या योगियाच्या जीवनासारखी...
रसिका राजीव हिंगे

👌👍
ReplyDeleteशब्द वर्णन इतके छान कि ती शांतता अनुभवासि वाटते.
ReplyDeleteखूप सुंदर....
ReplyDeleteसुंदर! एका निर्मळ निसर्गचित्राची अनुभूती!
ReplyDeleteChan
ReplyDelete