चित्रकाव्य
सांज पहाटेचा हात धरून निघाली आहे की पहाटेने सांजेचे बोट धरले आहे. कोण कोणाचा आधार?
दिवसभराच्या श्रमाने थकलेली सांज काठी सह पहाटे कडून आधाराची अपेक्षा करते आहे की पहाट नव्याने चालायला सांजेचे बोट धरते आहे?
आयुष्याच्या संध्याकाळी कोणाचा तरी आधार हवा असतो. त्यांचे अनुभवाचे बोल ऐकायला सक्षम कान हवे असतात. आणि आयुष्याची सुरवातच या आधार वडाचे बोट धरून केली जाते.
असे हे परस्पर पूरक आहेत याची जाण ज्याला असते किंवा जाणीव होते त्याचे आयुष्य सुंदर आहे.
पहाट सांगे सांजेस
स्वप्नातला गाव
किती सुंदर हा
यास काय नाव?
सुंदर उत्तर
सांज सांगतसे
जीवन आहे हे
तुला भासतसे
चला चला पाहू
थोडे वेगळाले
या वाटेवरचे
हे खाचखळगे
नवे काही नाही
अनुभव बोले
जे जुनेच आहे
नव्याने सांगणे
गोल फिरणारे
कालचक्र आहे
कुठे सुरुवात
कुठे अंत आहे
घे ही संस्कृतीची
भरली शिदोरी
तुजसी देतांना
हर्ष मनांतरी
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment