सहज सुचलं म्हणून....
व्यथा
व्यथा वेदनेचे जणू सार आहे
मनाचा मनातील हा भार आहे
व्यथा! सारं जीवन व्यापून उरलेली ही व्यथा. संसारात जगतांना असा एकही जीव नसेल ज्याला व्यथा किंवा दुःख नाही. कारण जगण्याचं मुळच दुःख आहे.
जन्माला येण्यापूर्वी सोहम् सोहम् म्हणणारा जीव जन्म झाल्याबरोबर कोहम् कोहम् म्हणायला लागतो आणि सुरुवात होते दुःखाला पर्यायाने व्यथेला.
जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत 'पाहिजे, हवं आहे' यासाठी धडपडणारा जीव मिळालं नाही की व्यथित होतो.
व्यथेचे पण बरेच प्रकार आहेत. ब्रह्मदेवाने हे जग निर्माण केलं. त्याचं संगोपन व्हावं, सृष्टीचं सृजन व्हावं म्हणून प्रयन्तरत असलेले निसर्गप्रेमी मनासारखे घडलं तर आनंदी होतात पण जर यश मिळाले नाही तर मनात कुठेतरी व्यथित होतात आणि या व्यथेच्या मग कथा होतात.
प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असलेला श्रीकृष्ण यादवांचे परस्परातील भांडणे पाहून व्यथित झाला. ईश्वर असला तरी मानवाचे रुपात होता त्यामुळे सगळे भोग आलेच की पर्यायाने. गांधारीचे शंभर पुत्र मारले गेले म्हणून दुःखाने, व्यथित अंतःकरणाने कृष्णाला शाप दिला यादवी नष्ट होण्याचा. म्हणजे काय तर व्यथेतून व्यथा निर्माण होते आणि जीव दुःख भोगत असतो. वास्तविक पाहता गांधारी ही पुत्रप्रेमाने व्यथित होऊन शाप देती झाली, कोणताही सारासार विचार न करता कारण तेव्हा फक्त तिला तिचे पुत्र महत्वाचे वाटले.
भीष्म पितामह यांची व्यथा वेगळीच. धृतराष्ट्राचे पुत्रप्रेम आणि दुर्योधनाने माजविलेल्या अराजकता यामुळे ते दुःखी होत होते,कुरूंचे सिंहासन सांभाळण्याची घेतलेली जबाबदारी नीट पार पाडणे खुप कठीण झाले होते. मनातील व्यथा विदुराने पण भोगली आहे. द्रौपदी च्या तर व्यथेची कथा म्हणजेच महाभारत.
एक मात्र खरे की व्यथेच्या जेव्हा कथा होतात तेव्हा त्या सृजनात्मक ठरतात. ज्ञानेश्वरांच्या मनात भक्तांविषयी कळकळ होती, माझ्या सामान्य माणसाला ही गीता नाही कळली तर त्यांचे कसे होईल, ही व्यथा त्यांना होती.त्यातूनच ज्ञानेश्वरीची माऊलींनी निर्मिती केली असावी. व्यास महर्षींनी स्वतःचा उदो उदो व्हावा म्हणून नाही साहित्य निर्मिती केली. हे ज्ञान पुढच्या पिढीला नाही कळले तर अशी व्यथा त्यांच्या मनात निर्माण झाली असावी म्हणून न भूतो न भविष्याती अशी साहित्य निर्मिती झाली.
जगण्याचे मूळ कारण जरी दुःख, व्यथा असेल तरी काहीवेळेस ही व्यथा सृजनात्मक तरते असे मला वाटतं...
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment