निखळ ,निर्व्याज हास्य, चेहऱ्यावरचे निरागस भाव असलेली ही बाला कुठे असेल बरे. मनात सगळी ठिकाण आणून पाहिली. कुठे शोधू हिला. ही भेटेपर्यंत चैन पडणार नाही जीवाला.
आणि ती भेटली मला. कमळाच्या तळ्याकाठी. भराभर तळ्यातून कमळं आणून कमलमाला तयार करीत होती. चटकन फुले घेतली की लगेच माळ तयार.
तिला सहज विचारलं," मला देशील का ग दोन तीन कमळं तोडून? तळ्यातून फुले तोडायची मला भीती वाटते ग. माझ्या आराध्याला कमलपुष्पे खूप आवडतात. त्यांच्या चरणी अर्पण करायची आहेत ग"
तिने पाहिलं माझ्याकडे आणि इतकं गोड हसली की मी मलाच विसरून गेले. काय नव्हतं त्या हास्यात? निरागस, निखळ, निर्व्याज सौंदर्य म्हणतात ते हेच का? खळाळून हसताना तिचे कमलदलासारखे नयन थोडे निमुळते झाले होते, दात शुभ्र कुंदकळ्यांसारखे चमकत होते, चेहऱ्यावरचे भाव निरागस, पटकन तिला कुशीत घ्यावे असे वाटले.
कुठेही स्पर्धा नाही, कोणाविषयी आकस नाही, मनात शांत तरल भाव, स्वतःच्या कामात गर्क असलेली ही खरं अध्यात्म जगत होती. स्वतःजवळ जे आहे ते देत होती. किती किती शिकवून गेली ती मला क्षणात.
माझं मन तिच्या भोवतीच फिरत होत. तिने लगेच मला तीन कमळं आणून दिली. तिच्या हाताचा ओला गंध या कमलदलापेक्षा जास्त गंधित भासला. कमळापेक्षा तिचे सौंदय जास्त गुलाबी वाटले. दोघांची ही निर्मिती करणारा तर तो एकच न. तरी का असा भास व्हावा हे न उलगडणारे कोडे घेऊनच मी परतले.
कमलाक्षी कमलनयना अशीच दिसत असेल नाही का? यापेक्षा काय ती सुंदर असणार. असं मला वाटतं...
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment