किती ही सोज्वळता! घरंदाज, खानदानी सौंदर्य ग तुझं. कोणता देव ग तुझ्या निर्मितीस कारण.सावकाश विचार करत घडवले आहे तुला.
मुखकमल पाहताच महालक्ष्मी चा भास होतो. तुझे नयन म्हणजे जणू कमळाची पाकळी भासावी असे, शांत भाव साठले आहेत नयनात. चाफेकळी सम असलेल्या नासिकेत मोती डुलतो आहे. त्या मोत्याला पण तुझ्या नासिकेत शांत विसावेसे वाटले हे त्या मोत्याचे भाग्य आहे की त्याच्यामुळे तुझ्या नासिकेचे सौंदर्य वाढले आहे हे तो देवच जाणे.
केशसंभार! काळोखालाही संभ्रम पडावा स्वतःच्या रंगाचा आणि रेशमाला ही हेवा वाटावा तुझ्या तलम मऊशार कुंतलाचा.
कर्णफुले ही मुग्ध झालीत बघ तुझ्यासारखीच. कानात झुलायचीच विसरलीत बहुधा.
कंठातील सौभाग्याचे मंगळसूत्र तुझ्या शालीनतेत, सौंदर्यात भर घालते आहे. सुवर्ण अलंकार झळाळतात आहे गळ्यात की तुझ्या मनभावन साजणाच्या प्रीतीचे तेज तुझ्या सर्वांगावर भारले आहे!
असेच असावे. तुझ्या मुखकमलावरील मुग्ध हास्य, तुझ्या नयनात साठलेले प्रीतीचे भाव पाहून तरी असेच वाटते आहे की तू खूप वेळ प्रतीक्षा केल्यानंतर तुझा साजण तुझ्या पुढ्यात उभा आहे, तुझ्या देहबोलीतून तू त्याचे स्वागत करते आहे हाच तो घरंदाज ठेवा,दिखाऊपणा नसलेला! खरे आहे न ?
रसराज
No comments:
Post a Comment