चित्र ललित
"अरे किती दिवसांनी भेटलीस ग"
तूच खरी माझी मैत्रीण होतीस,आजही आहेस खरे तर पण या संकुचित वृत्तीच्या ,कोत्या मनाच्या समाजबांधवांना आपली मैत्री रुजली नाही,पटली नाही. एक स्त्री आणि पुरुष अशी निखळ मैत्री असते हेच खरे या समाजाला कळत नाही की कळून मान्य करायचे नाही, हेच मला कळलं नाही ग. निरपेक्ष भावनेने केलेले प्रेम म्हणजे मैत्री मग ती कोणाचीही असो. मैत्रीत स्त्री पुरुष असा भेदभाव असू नये असे वाटते.
वास्तविक पाहता अश्या मैत्रीचा या समाजाने अनुभव घेतला आहे. आणि यास मान्य ही केले आहे. द्रौपदी आणि कृष्णाची मैत्री. तिचा तो खरंच सखा होता, कृष्णसखा. तसा तर तो सगळयांचा सखा होता,आजही आहे,उद्याही असेल. अशी निखळ मैत्री कुठे पहायला मिळणार नाही. कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता मित्रत्वाचे नात्याने द्रौपदी ची मैत्री फुलली होती, फळली होती, कुणाला ती आक्षेपार्ह ही वाटली नाही. आजही असेच आहे. केव्हाही त्याला मनापासून साद घातली की त्याचा प्रतिसाद असतोच असतो. कृष्णसखा! त्यानेच हा पायंडा पाडला, तरीही आज समाजात कोणाला स्त्री पुरुष यांच्यामध्ये निखळ मैत्री असू शकते यावर विश्वास बसत नाही की विश्वास ठेवायचा नाही हे कळत नाही.
आता असे वाटायला लागले आहे की कृष्णसख्याने पुन्हा अवतार घ्यावा आणि पुन्हा एकदा त्याने सगळ्यांशीच मैत्री करावी.
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment