Tuesday, 29 March 2022

आवर सावर

 



     ऑफिस मधून  घाईघाईने घरी निघाली. चार दिवसांवर आलाय गुढीपाडवा. म्हणजे हाच शनिवार आणि रविवार आहे घर आवरायला. कसं होईल? असा विचार करतच घरात शिरले अन भराभर आज जास्तीत जास्त आवरून घेऊ असे ठरविले. आपल्या भारतीय संस्कृतीत सण आले की घर आवरण्याचे वारे वाहू लागतात. मुख्यत्वेकरून गुढीपाडवा, दिवाळी या सणांना तर विचारायलाच नको. घर स्वच्छ करण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली असते. 

     हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा असो की दिवाळी असो, संक्रांत, नवरात्र, घरी कोणी येणार असेल तर घर आवरले गेलेच पाहिजे. "एवढा मोठा सण वर्षांतुन एकदा येतो तर घर स्वच्छ करायला हवेच. शिवाय घरावरून वर्षांतून एकदा तरी हात फिरला पाहिजे त्याशिवाय कशी बरं घराची ओढ लागेल. घरातल्या लक्ष्मीचा हात जिथे जिथे फिरे तिथे लक्ष्मी वास करे." इति सासूबाई. सासूबाईचे घर आवरणे म्हणजे घरातली प्रत्येक वस्तू स्वच्छ व्हायला हवी.  स्वतः पुढे होऊन करायच्या. थकणे वगैरे प्रकार माहीतच नव्हता. "आताच तर घासले पाच सहा दिवसांपूर्वी हे चार डबे. पुन्हा का घासले?" असे विचारले तर  सगळेच छान चकचकीत दिसतात आहे मध्येच असे हे चांगले दिसत नाही." किंवा मौन उत्तर ठरलेले. त्यावेळी राग यायचा, पण आता मला ही सवय इतकी अंगवळणी पडली की मी पण असाच विचार करू लागले . माझेच मला कधी कधी आजकाल हसू येतं. घराचे संस्कार सासूबाई अशा पद्धतीने करत होत्या माझ्यावर. कधी रागावून, कधी मौन पाळून तर जास्त वेळा प्रेमाने, व्यवहाराची कास धरत.  माझी आई तर दर महिन्याला किराणा भरण्याआधी सगळे डबे घासून ठेवायची. स्वच्छ असले तरी.  एखाद्या डब्यात काही राहून गेले तर खराब नको व्हायला म्हणून सगळे डबे पाहायचे, रिकामे असलेले घासायचे. तेव्हा वाटायचे काय ही रिकामी कामं करते. पण आता त्याचे महत्व पटते आहे. संसारात रमण्याचा हा एक भाग असू शकतो असे वाटतं.  

     आजही घर आवरायला घेतलं की, जाऊ दे यावेळेस जास्त आवरू नाही . फक्त पुसपास करून घेऊ असे म्हणत म्हणत सगळंच चकचकीत केल्या जात. काही राहून नको जायला आवरायचे म्हणून रात्री जागून नाहीतर सकाळी लवकर उठून आवरले जातं अन मग मिळतं समाधान. खूप बरं वाटतं अशावेळी.

     घर आवरतांना त्या त्या वस्तूंशी जणू मूक संवाद सुरू असतो,  त्याच्याशी निगडित कडू गोड आठवणी जाग्या होतात. काही वेळेस पापणकाठ ओलावतात. अडगळ म्हणून वाटल्या तरी काही वस्तू फेकवत नाहीत. पुढच्या वेळेस  बघू असे होत होत घरात अडगळ साचत राहते. एकूण काय तर मन एकाग्र होतं अन पुन्हा भूतकाळातील आठवणी दंगा करायला लागतात. मनातला पसारा वाढत जातो. मन आवरायचे राहूनच जाते. 

     वेळेची मर्यादा असल्यामुळे घर आवरणे तर होऊन जातं पटकन, पण मन आवरणे कधी जमत नाही.  असे का व्हावे? दोन्ही ठिकाणी एकच क्रिया आवरण्याची,  तरी मन काही अडगळ कमी करू देत नाही.  सगळा पसारा सोबत घेऊन स्वच्छंद पणे उंडारत असतं दाही दिशांना.... 


©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment