" काय ग! काय झालं? अस्वस्थ का आहेस एवढी? "
"सुचतंच नाही ग काही. सारखी घालमेल होते आहे. मन कुठेच का स्थिर होत नाही. वाईट विचारच जास्त येतात माझ्या मनात."
"एक सांगू का? तुझ्या डोक्यात आणि मनातही जो विचारांचा भडका उडाला आहे न तो आधी शांत कर.नाही नाही ते विचार करत बसते, कोण काय म्हणेल, कोणाला आवडलं नाही तर, माझ्या बद्दल त्यांच्या मनात गैरसमज तर नाही होणार न, असे आणि यासारखे किती बावळटपणा सारखे प्रश्न घेऊन फिरत असतेस. त्यामुळे हे सगळं. कळलं?"
"अग पण कितीही आवरले तरी तेच ते सारखं मनात येत राहतं आणि अस्वस्थ व्हायला होतं. नामस्मरण सुद्धा सध्या नीट होत नाहीये."
"हे बघ, आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर नव्हे प्रत्येक वेळी कोणी न कोणी आपल्याला जज करतच असत. म्हणून काय तू जगणं सोडून देते आहेस का? झालं गेलं गंगेला मिळालं असा विचार जोपर्यंत करत नाहीस तो पर्यंत ही विचारांची अडगळ तुला त्रास देतच राहील. आता फेकून दे मनातील, डोक्यातील अति साचलेली, कुजलेली विचारांची अडगळ अन बंद कर मनाची कवाडे. याशिवाय मन प्रसन्न होणार नाही"
असे उपदेशाचे डोस पाजून माझी मैत्रीण निघून गेली घरी. पण खरंच असं होतं का मनातली ही अडगळ दूर करण्यात कोणी यशस्वी झाले असेल? ओढाळ बैलासारखे मन पुन्हा पुन्हा तेच तेच खूप दिवसांपासून साचलेले विचार करत असतं बऱ्याचवेळा. नवीन विचारांची भर पडते तसे जुन्या गोष्टी नको का निघायला सरळ. असा काहीतरी फंडा मिळाला पाहिजे. साठत जातं, आतल्या आत. काढून टाकू म्हटले तरी काढता येत नाही.जसे काही सोन्याचे ,हिऱ्याचे दागिने आहेत पिढ्यानपिढ्या जपून ठेवायला.
घरातील अडगळ तरी एखाद्या वेळी अट्टहासाने काढली जाते, पण मनातील अडगळ मात्र कायम आपल्या सोबत असते सखीसारखी. हो सखीच. सखीचे विचार पटले नाही, तिची एखादी गोष्ट खटकली तरी आपण मैत्री तोडत नाही, क्षणभर अबोला होईल पण खरी सखी सोबतच असते. नाही का?
मनातल्या विचारांची अडगळ खरंच कमी करायची असेल, बाहेर अगदी फेकून द्यायची असेल तर नामस्मरण हाच एकमेव उपाय आहे यावर. सद्गुरू चरणी सगळं समर्पित करून फक्त नामस्मरण केले की एखाद्या वेळी शक्य होईल या अडगळीच्या तावडीतून सुटणे. अन्यथा जे आहे ते असेच सुरू राहील....
©रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment