Sunday, 3 April 2022

गर्दी

    हिंदू नववर्षाच्या वासंतिक शुभेच्छा

   


      काय झालंय? असं का वाटतंय सारखं आजूबाजूला खूप गर्दी आहे! कशाची गर्दी वाढली इतकी? असा प्रश्न मनात येतो न येतो तोच पहाट वारा कानात शीळ घालायला लागला.  "अगं तुला माहीतच नाही का, कळलं कसं नाही तुला? ही गर्दी आहे सुगंधाची. बघ न!  शिशिराचे पैंजण नादवत हा वसंत आला अन सगळीकडे बघ ह्या गंधाने इतकी गर्दी केलीय.

      रात्रभर जागून ह्या चांदण्या  सगळ्या चराचरात गंध भरत फिरतात आणि अगं हा पूर्वेचा केशरिया उधळत आलेला रविराज, त्याच्या सोनसळी किरणात न्हात असलेल्या सृष्टीवर हळुवार चांदण्यांनी भरलेल्या अत्तराची कुपी लवंडून देतो, म्हणून इतकी गर्दी वाढलीय.

     पाहिलंस का कोवळ्या कोवळ्या झाडांच्या पालवीचा ओलसर गंध, मध्येच कडुलिंबाचा कडूसर पण आरोग्यदायी वास, आंब्याच्या मोहराचा गोडसर सुगंध, तुला आलाय का गंध दाट हिरव्या पानांच्या मागे लपलेल्या कैरीचा!  

      शुभ्र धवल मोगरा तर नुसता दरवळतो आहे. याच्यामुळेच जास्त गर्दी झाली बरं. अन त्याच्यासोबत तो निशिगंध, पांढरा चाफा यांचा परिमल पण गर्दी करतोच आहे. यांच्यातून वाट काढीत तो उभा असतोच न हळदुल्या बहावा, लाल भडक गुलमोहर आणि पळस. या सगळ्या सुगंधाच्या गर्दीतही हे स्वतःच्या रंगाची गर्दी करीत उभे आहेतच.

     अरे पहाटेस तूच  पसरवतो सगळीकडे हा गंध अन सारखा मला सांगतो आहेस ही गर्दी सगळी सुगंधाने दरवळली आहे, या गर्दीला तूच जास्त कारणीभूत आहेस.,  कळलं!  तू उंडारला नाही म्हणजे ही गंधित गर्दी होणार नाही असे नाही, पण तू असा सैरावैरा  धावत असतो या गर्दीत त्यामुळे अजूनच वाढते ही गर्दी.

     पण असू दे ही गर्दी आवडते सगळ्याना. यामुळे प्रसन्न सकाळ होते, नवी उभारी देणारी आहे ही गर्दी, हवीहवीशी आहे. सगळी सृष्टी आनंदात बहरत असते या सुगंधाच्या गर्दीमुळे. ही गंधित गर्दी म्हणजे परमात्म्याने सृष्टीला दिलेले आंदण आहे, खरे आहे न!  मग होऊ दे गर्दी अन दरवळू दे सारी सृष्टी.....

     अन अशीच गंधाळलेली गर्दी असलेला वसंत प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ दे अन नात्यांच्या सुगंधाची गर्दी जीवनभर दरवळू दे, सद्गुरुंच्या कृपाछायेचा परिमळू तर दरवळतो आहेच.......


रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment