अल्लडशा पाऊस धारा
विरुनी गेल्या वाऱ्यावर
हरित झाली सृष्टी सारी
वसंत उभा उंबरठ्यावर
ठायी ठायी शिशिराची पानगळ सरली अन सळसळत्या पानांचे पैंजण लेऊन, जणू हिरव्या पाचूने सालंकृत होऊन सृष्टीचे रूप बहरले. कोवळे कोवळे गुलाबीसर पानांचे देठ कोवळी सुगंधित हिरवाई लेऊन उभे ठाकले, वसंतांच्या स्वागतास. ही हिरवाई शुभकारक, मनमोहक, आकर्षक आणि सृजनात्मक.
निसर्ग चक्र फिरत राहतं आणि ठराविक वेळी बदल होत राहतात, हेच ऋतू. ऋतूंचे बहरणे म्हणजे हा एक महोत्सव असतो. प्रतिक्षण सृष्टीचे सृजन सुरू असले तरी वसंत ऋतू आला की सृष्टी ही नवयौवना नववधू भासते.
भिरभिरणारा वारा शीळ वाजवत नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या हिरव्या पानांशी उगाच सलगी करण्याचा प्रयत्न करतो तर राम प्रहरी सोनसळी सूर्य किरणे पानांना कवेत घेऊ पाहतात की ही हिरवाईच रविराजाला बिलगु पहाते काही कळत नाही. सृष्टीचे हे मनमोहक रुप पाहण्यासाठी रविराजाचा रथ पूर्वक्षितिजावर पहाटेस लवकर येण्याची घाई करतो. तसे पाहिले तर प्रत्येक ऋतूत सृष्टी ही मोहकच आहे तरीही वसंतातील हे मनभावन सृष्टीचे रूप वेड लावणारे आहे.
पाचूच्या रत्नासम भासणारे हिरवे तोरण सृष्टीने दारी बांधले आहे, हिरव्या पानांमधून लाल ज्योतीसम दिसणारे पळस, पांगारा, गुलमोहर म्हणजे चाफा,मोगरा, निशिगंध या फुलांच्या अत्तराचे दिवे लावले आहेत की काय असे भासावे. सारा आसमंत गंधाने दरवळतो आहे.
आंब्याच्या हिरव्या पानात आणि पिवळ्या मोहरात लपलेली एखादी छोटीशी कैरी हिरवीकंच पैठणी ल्यायलेल्या नवगर्भार सृष्टीचे डोहाळे पुरविण्यास आपल्या अस्तित्वाची दखल देत झाडावरच झोके बांधते अन कोकीळ सृष्टीचे मन रिझवण्यासाठी दाट आमराईत लपून गीत गायन करतो.
ह्या नवयौवना नववधूचे पाचूच्या रत्नांसम हिरवाईने नटलेले हे रूप म्हणजेच वसंत ऋतू.
©®रसिका राजीव हिंगे
~2.jpeg)
.jpeg)
छान सुंदर अप्रतिम तुझ्या लेखणीची कमाल
ReplyDeleteखुपच सुंदर. 👌👌🙏
ReplyDeleteखुपच सुंदर वर्णन 👌👌🙏
ReplyDelete