रूप अनेक परी तू एकची
कसे ओळखू सांग मजसी
अंतरंगात तूच वसतो का
की भास अन तू आभासी
तुझे रूप कसे आहे? हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. तू कसा दिसतो, तुझी वेशभूषा कशी असेल, तू कसा प्रत्येकाच्या हाकेला साद देतोच असे आणि याहीपेक्षा जास्त प्रश्न मला पडले होते... पण हे मनाला भुरळ घालणारं निसर्गाचं रूप पाहिलं आणि तू कोण आहेस, कसा आहेस ते मी माझ्या मनानेच ठरवू लागले. अर्थात प्रत्येकाला हवे तसे तुझी मूर्ती डोळ्यासमोर ठेवून तुला पूजतात, सजवतात आणि भक्तिमय जगतात.
निळ्याशार नभाचे रूप घेऊन तू असा समोर येतोस ना तेव्हा कळते तुझी विशालता. तू किती उदार आहेस हे लक्षात यायला लागतं जेव्हा तू ही आभाळाची उबदार शाल घेऊन आमच्यावर मायेची पखरण करतोस. तुझ्या विशाल हृदयात आमचे सगळे अपराध साठवतो.
बघ ना कसा अगदी हिरव्यागार वृक्षाच्या रुपात उभा राहून माऊलींच्या ममतेने कुशीत घेतोस, सहस्र बाहू पसरलेल्या तुझ्या कृपासावलीत आश्रय मिळाला न की मानव जन्माला आल्याचे सार्थक झाले असे वाटते.
कधी डोंगर कपारीत तर कधी झुळझुळ वाहणाऱ्या निर्झरा सम अवखळ, अल्लड, बालिश, मोहक रुपडं वेड लावतं रे अक्षरशः. खळाळणारा पाण्याचा आवाज ऐकला न की वाटतं संगीतातले स्वर असेच निर्माण केलेस तू. सुरेल,लयबद्ध, ताल धरायला लावणारी समिंदराची लाट असो की शांत वाहणारी गंगा,कृष्णमाई असो या तुझ्या निर्मितीला नकळत दंडवत घातल्या जातो आणि हेही तुझेच रूप तर नसेल न असा प्रश्न ही मनाला पडतो.
कणाकणात, चराचरात तूच तू भरलेला आहेस. इतकेच नव्हे तर "ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः" म्हणजे प्रत्येक प्राणिमात्र तुझेच अंश आहेत हे तू गीतेत अर्जुनाला ठासून सांगितले आहे.
एवढं मात्र खरं आहे की निसर्गच म्हणजे तू, निसर्गाचाच एक भाग म्हणजे ही जीवसृष्टी आणि यात सामावलेला तू म्हणजेच परमात्मा आहेस, किती रूपं घेतोस! अशा विविध रुपात तू समोर येतोस तरीही आम्ही तुला ओळखू शकत नाही हा किती मोठा दैवदुर्विलास आहे. खरे आहे न?...... असे असले तरी तुझे प्रत्येक रूप हे विलोभनीय आहे, मनमोहक,मनभावन आहे....
©®रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment