दारावरची बेल वाजली. मालतीबाई नी दार उघडलं समोर पोलीस उभे पाहून त्यांचे सर्वांग थरथरू लागलं. "विजयराव देशमुख आहेत का घरी?"
" हो, आहेत. काय काम होतं?" थरथरत मालतीबाई कशा बशा बोलल्या.
"त्यांनाच भेटायचे आहे. आत येऊ का?"
"अ, हो या ऽऽ नं."
तोपर्यंत विजयराव बाहेर आले, कोण आहे ते पहायला. दारात आयपीएस भरत दराडे यांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. "या आत या सर" असे म्हणत त्यांना विजयराव घरात घेऊन आलेत.
विजयराव आणि मालतीबाई बैठकीत त्यांच्या समोरच बसले होते. आयपीएस दराडे बैठकीत सभोवार नजर फिरवत सोफ्यावर स्थानापन्न झाले.
घर छान सजविले होते. कुठे भपका नाही की पाश्चात्य संस्कृती चे प्रदर्शन नाही. टीव्ही,सोफा, एसी असलेलं साधं चार खोल्यांचा घर होत. उच्च मध्यमवर्गीय घर जसं असतं तसंच. विजयरावांकडे पाहून वाटलं एक सेवानिवृत्त सुखी आयुष्य जगत असलेले समाधानी व्यक्तिमत्त्व. सारं बघता बघता मालतीबाई कडे नजर जाताच भरत दराडे यांचे डोळे पाणावले. अश्रू च्या अंधुकशा प्रकाशात त्यांच्यासमोर सिनेमातील खेळाप्रमाणे सारा भूतकाळ तरळून गेला. पंचवीस वर्षांपूर्वी चा तो दिवस त्याच्या डोळ्यासमोर आला.
संसाराचा गाडा नीट चालावा म्हणून मालतीबाई शाळेत नोकरी करत होत्या. विजयराव बँकेत असले तरी खूप पगार नव्हता. नोकरी लागल्याबरोबर लगेच मालतीबाई शी प्रेम विवाह केला असल्यामुळे आधीची काहीच शिल्लक नव्हती. शिवाय पदरात दोन गोंडस मुलं होती. त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी मालतीबाई ना नोकरी करणे गरजेचे होते.
मालतीबाई ची सवय होती रोज संध्याकाळी शाळेतून घरी येतांना त्या वाटेतल्या गजानन महाराजांच्या मंदिरात न चुकता जात असत.
एके दिवशी त्या मंदिरात आल्या तर त्यांच्या समोर एक सात आठ वर्षाच्या छोटा मुलगा उभा राहून
"आई हार घे ना, बाबासाठी, आज गुरुवार आहे, महाग नाही फक्त पाच रुपये."
मालतीबाई नि विचार न करता पाच रुपयाचा हार घेतला आणि त्या मंदिरात गेल्या. दर्शन घेऊन बाहेर आल्या आणि नेहमी प्रमाणे चप्पल घालून निघाल्या तर पुन्हा तो समोर आला.
" आई आज तुम्ही हार घेतला न बघा माझ्या धंद्याचीच बोहनी झाली हो. आठवड्यापासून इथे फुलं विकतो आहे पण कोणी घेई ना. खूप उपकार झाले तुमचे."
"बरं बरं रोज घेईल मी हार" असे म्हणून मालतीबाई घराकडे झपझप चालू लागल्या. यानंतर त्यांचा रोजचाच क्रम झाला, याचेकडून हार घ्यायचा अन दर्शन घेऊन त्याच्याशी थोडं जुजबी बोलून त्या घरी येत. हळूहळू ओळख वाढत गेली.
"काय रे नाव काय तुझं?"
"राजू"
" कुठे राहतो?, आईबाबा काय करतात तुझे?"
" मी समोरच्या घरात राहतो. मावशी कडे. मावशी म्हणजे आईची शाळेतली मैत्रीण आहे. तिच्याकडे सगळी कामे करतो. अन संध्याकाळी इथे फुलं विकतो."
त्याची कर्म कहाणी ऐकून मालतीबाई ना खूप वाईट वाटायचे. इतका गोड मुलगा का त्याच्या वाट्याला असे कष्ट यावे. खेळायचे, बागडायचे दिवस त्याचे अन तो व्यवहार शिकतो आहे. खरंच काय असेल बरं त्याचं प्रारब्ध.
घरी आल्यावर एकदा जेवतांना मुलांना त्या सांगत होत्या. "बाहेर किती वाईट परिस्थिती आहे. शिक्षणासाठी काय काय करावं लागतं. तुम्हाला मिळतं आहे तर तुम्ही मेहनत करा आणि यशाची शिखरे गाठा जी तुम्हाला खुणावत आहेत." असे रोज काहींना काही मालतीबाई मुलांना सांगून त्यांना प्रोत्साहित करत होत्या.
आज राजू खूपच उदास दिसत होता. त्याचे डोळे सारखे भरून येत होते.काय करावे काहीच त्याला सुचत नव्हते. तेवढ्यात मालती बाई मंदिरात पोहचल्या. त्याच्याकडे पाहताच आज काहीतरी झालं आहे हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. दर्शन झाल्यावर त्या राजूजवळ आल्या, "काय रे काय झालं आज? का असा दिसतोस? रडला का?"
"आई, मावशी म्हणते आता पुढं काही शिकू नको, एवढे पैसे नाहीत आमच्याजवळ"
"पण मला शिकायचे आहे,कसेही करून मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. सरफरोश सिनेमामध्ये जसा अमिरखान होतो तसे ."
"तू कुठे बघितला सरफरोश?"
"मावशीची मुलं बघत होती तेव्हा पाहिला टीव्हीवर. आई तुम्ही करू शकता काही माझ्यासाठी. म्हणजे मावशीला सांगा न मला पुढे शिकू दे."
"ठीक आहे बघू आपण ."
असे म्हणून मालतीबाई विजयरावांना याविषयी सांगतात,पण विजयरावांना असे काही आवडत नव्हते. त्यांचे म्हणणे एवढेच होते की "असे कितीतरी प्रत्येक मंदिरासमोर असतात, फुटपाथवर असतात त्यांना काय प्रत्येकाला तू मदत करीत फिरशील का?" पण मालतीबाई ना काही हे पटेना. राजू चा रडवेला चेहरा सारखा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता.
त्यांचं शिक्षकी मन त्यांना शांत बसू देत नव्हतं. कसंही करून राजुला मदत करायची पण कशी हे सुचत नाही. शेवटी शिक्षकच खरा मार्ग दाखवितो ये सत्य आहे. त्यांनी राजुला जवाहर नवोदय विद्यालय दिल्ली ची परीक्षा द्यायला सांगितले. त्या परीक्षेची फी,पुस्तके सारा खर्च मालतीबाई करत होत्या. विजयरावांचा विरोध पत्करून. राजू ने त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. राजू नवोदय विद्यालयाची परीक्षा पास झाला आणि पाचवीपासून राजू नवोदय विद्यालयात दाखल झाला. त्याचे स्टेट बँकेत मालतीबाई नी खाते उघडले आणि दरमहा त्याच्या खात्यात पैसे जमा करू लागल्या.
राजुचे शिक्षण सुरू झाले. दरवर्षी पहिल्या तीन क्रमांकात त्याचा क्रमांक येत होता. पाचवीपासून राजू बाहेरगावी असल्यामुळे कधी त्याची भेट होत नव्हती. त्याच्या शाळेत मुख्याध्यापकामार्फत त्यांची चौकशी मालतीबाई करत असत. त्याच्या अवांतर खर्चाचा सगळा भार एक पालक म्हणून मालतीबाई नी उचलला होता.याबाबत विजयराव आणि त्यांचे कधीच एकमत झाले नाही. तरीही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले.
मालतीबाई आणि विजयराव दोघेही आता सेवानिवृत्त झाले. त्यांची दोन्ही मुलं शिक्षण पूर्ण करून नुकतीच नोकरीला लागली होती.
एक दिवस अचानक राजुचा फोन आला,"आई आता मला पैसे पाठवू नको,माझे शिक्षण पूर्ण झाले आहे मी नोकरीला लागलो आहे. लवकरच भेटू आपण."
राजू च्या आवाजातील आत्मविश्वास,मार्दव ऐकून मालतीबाईचे पापणकाठ पाणावलेत. आपण योग्य निर्णय घेतल्याने त्या सुखावल्या. कधी एकदा राजुला भेटते असे झाले त्यांना. किती मोठा झाला असेल न आता, ओळखायला येईल की नाही आपल्याला या विचारात त्या रमू लागल्या. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचीही जपवणूक करता आली याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
"मालती, हे आयपीएस भरत दराडे. नव्याने रुजू झाले आहेत इथे. कालच माझी एका कार्यक्रमात यांची ओळख झाली." विजयरावांच्या आवाजाने आयपीएस भरत दराडे भानावर आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून विजयराव चपापले.
"काका माझी ओळख काय करून देता या माऊलीला! हिच्या खंबीर आधाराने मी आजचा दिवस पाहतो आहे. ही माऊली नसती तर मी कुठेतरी हमाली करत असतो आज."
आई मी राजू तुला हार विकणारा राजू..... "
राजुचे शब्द ऐकले आणि मालतीबाई नी डोळयातल्या आनंदाश्रू ना वाट करून दिली.....
©️रसिका राजीव हिंगे
#Adhar#sobat#rasraj#shikshn#ips#


खुप सुंदर कथा
ReplyDeleteखुप सुंदर कथा
ReplyDelete,👌👌
ReplyDeleteहेलावणारी कथा, आधाराचा हात पुढे करणारी धन्यच व संधीचे सोनं करण्यासाठी झटणाराही कौतुकास पात्र.
ReplyDeleteछान कथा 👌👍
ReplyDeleteKhupch Sunder
ReplyDelete