ऐश्वर्या! नावाप्रमाणेच ऐश्वर्य संपन्न. सौंदर्या बरोबरच बुध्दीचेही ऐश्वर्य लाभलेली. मेडीकल सायन्सला प्रवेश घेऊन स्त्रीरोग तज्ञ व्हायचे होते तिला. चारुता आणि सुबोधला आपल्या मुलीचे गुण पाहून खूप अभिमान वाटायचा. दोघेही आय. टी.कंपनी मध्ये नोकरीला होते. सतत घराबाहेर असल्यामुळे ऐश्वर्या आजी आजोबांच्या सहवासात लहानाची मोठी होत होती. चारुता आणि सुबोध दोघेही ऐश्वर्यासाठी वेळ देत होतेच. क्वालिटी टाइम देणे गरजेचे आहे हे दोघांनाही लहानपापासूनच बाळकडू मिळाले होते जणू.
ऐश्वर्या एमबीबीएस झाली. आता पुढे तिला गायनिक म्हणजे स्त्रीरोग तज्ञ होण्यासाठी मास्टर डिग्री घेणे गरजेचे होते. NEET PG ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि केजे सोमय्या वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र मुंबई येथे तिला प्रवेश मिळाला.
सगळं सुरळीत चालले असले की नियती कुठेतरी खदाखदा हसत पुढे येतेच,असे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या आयुष्यात सगळचं चांगलं कसं बरे असेल! ऐश्वर्या याला अपवाद कशी राहणार.
कॉलेजमधून हॉस्टेलवर घाईने जाताना एका भरधाव जाणाऱ्या कारचा तिला धक्का लागला अन् ती खाली पडली. क्षणभर तिला कळालेच नाही काय झाले नेमके. तिचा पाय दुखावला होता. तिला उठता पण येत नव्हते. मित्र मैत्रिणीच्या साहाय्याने ती दवाखान्यात पोचली. तिच्या पायाला प्लास्टर लागले. सगळा अभ्यास पूर्ण झालेला असूनही तिला सेमीस्टर परीक्षा देता आली नाही.
शनिवार असल्याने चारुता आणि सुबोध घरीच होते. दुपारी जेवण झाल्यावर गप्पा करत असताना ऐश्वर्याचा मोबाईल वाजला.
"हॅलो, कोण बोलतेय?"
" नमस्कार, मी ज्ञानेश बोलतोय. माझ्या कारचा धक्का लागून तुम्ही खाली पडलात अन् तुम्हाला प्लास्टर लागले. क्षमा करा मला. माझ्यामुळे तुम्हाला परीक्षा पण देता आली नाही,याचे मला फार वाईट वाटते आहे."
त्याला मध्येच तोडत ऐश्वर्या म्हणाली,"कोण आहात तुम्ही? माझा नंबर कसा मिळाला तुम्हाला. अन् क्षमा कसली मागता आहात!
"ते महत्वाचे नाही, मला भेटायचे आहे तुम्हाला."
"मी भेटू इच्छित नाही तुम्हाला. अन् मला पुन्हा फोन पण करू नका."
असे म्हणून तिने फोन बंद केला.
"अगं असं काय करतेस ऐश्वर्या! त्याला काय म्हणायचे ते तर ऐकून घे."
"आई, कशाला उगाच. कोण कुठला तो. त्याचवेळेस का नाही त्याने क्षमा मागितली? तेव्हा नुसता ठोंब्यासारखा उभा होता. ऐश्वर्या खूप चिडली होती. ऐश्वर्या चिडली होती तरीही तिला आत कुठेतरी त्याला भेटायची इच्छा होत होती.
दारावरची बेल वाजली. चारुताने दार उघडले अन् समोर श्री डोंगरे यांना पाहून तिला आश्चर्य वाटले. डोंगरे सहा महिन्यांपूर्वीच तिच्या कंपनीत जॉईन झाले होते. मेहनती असलेले डोंगरे सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असत. फक्त त्यांचा रागाचा पारा एकदम चढत असे.
"या डोंगरेजी. अचानक येणं केलंय काही विशेष."
"अरे मला हे माहीतच नव्हते की आपण इथे राहता. मी तर ऐश्वर्याला भेटायला आलो आहे. ऐश्वर्या....."
"माझी मुलगी. तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.त्यामुळे ती इथेच आहे सध्या."
"माहित आहे मला"
"म्हणजे, तुम्ही ओळखता तिला."
"नाही."
चारुताच्या काहीच लक्षात येत नव्हते. आश्चर्य आणि भीती यांचे द्वंद्व सुरू झाले तिच्या मनात. तिने त्यांना बसायला सांगितले अन् ती ऐश्वर्याला विचारायला धावली. " कोण आले आहे ग आई?"
"माझ्या ऑफिस मधील डोंगरे तुला भेटायला आले आहेत."
"तू सांगितले का ऑफिसमध्ये माझ्या अपघाताबद्दल?"
"नाही ग, यांना कसे कळले देव जाणे बाई."
चारुता भराभर तिचा बेड आवरू लागली. तोपर्यंत सुबोध आला होता ऑफिस मधून. तो तिथेच डोंगरे यांचेशी बोलत बसला होता. तिने सुबोधला ओळख करून दिली. ऐश्वर्याला भेटायला आल्याचे सांगितले. त्यावर सुबोध इतका सहज बोलला की त्यांची फार जुनी ओळख असावी.
" हो माहित आहे मला. त्यांचा फोन आला होता. पण हे नव्हते माहित की हे तुझ्या कंपनीत आहे."
"फोन आला होता म्हणजे, तुम्ही ओळखता का यांना?"
"नाही, आजच ओळख झाली."
चारुताचे डोके गरगरायला लागले. तिला कशाचाच काही थांग लागत नव्हता. चहा झाल्यावर डोंगरे सुबोध बरोबर ऐश्वर्याच्या खोलीत गेले तिला भेटायला. डोंगरेना पाहिले अन् जन्मजन्मांतरीची ओळख असावी असे ऐश्वर्याला जाणवले.
"मी ज्ञानेश डोंगरे. व्यक्तीगत तुमची क्षमा मागायला आलो आहे इथे."
आता उलगडा झाला चारुताला. डोंगरे म्हणजे कोण. ऐश्वर्या काय प्रतिक्रिया देते यावर तिघांचेही लक्ष होते. पण ती काहीच बोलली नाही. स्वतः च्या विचारात गुरफटल्या सारखी वाटली. चारुता बोलायचे म्हणून म्हणाली, "पोहे करते चालेल न?"
"चालेल, काहीही चालेल."ज्ञानेश ऐश्वर्याकडे पहात बोलत होता. जणू तिला तो वाचत होता. अन् ऐश्वर्या! त्याच्याकडे न बघता त्याला अनुभवत होती, सुखद मार्ग गवसत होता.
नयन बोलले मम हृदयाशी
सांगून गेले गूज मनीचे
अशीच अवस्था झाली होती दोघांचीही. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या तरी निमित्त हवे भेटायला. वाईटातून चांगले निघते म्हणतात ते असे. जगायला असाच एखादा भावक्षण पुरेसा असतो. खरे आणि निर्मळ प्रेम असेच असते अबोल, भावरम्य, गंधित आणि उत्कट. याची जाणीव ऐश्वर्याला झाली. सुबोध आणि चारुता आजी आजोबांच्या साक्षीने आपल्या लेकीची सुखाची वाट आनंदाश्रुनी शिंपीत होते, ज्ञानेश आणि ऐश्वर्या हा भाळलेला सुगंधित क्षण धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होते....
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment