Friday, 10 April 2020

सहज सुचलं म्हणून.. प्रार्थना

"हिच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे"
शाळेतले विद्यार्थी हात जोडून ही प्रार्थना म्हणत होते आणि माझं मन ह्या प्रार्थनेभोवती फिरत होत.
किती सुंदर प्रार्थना आहे. भक्तिभाव आणि आर्तता आहे.  ही प्रार्थना करावीशी  वाटते म्हणजे कुठेतरी आत आपण मान्य करतो आहोत की  आपण माणसाशी माणसासारखं वागत नाही, माणूस म्हणून जन्माला आलो आहे  तर माणूस म्हणून जगत नाही.
याला कारणं ही वेगवेगळी आहेत. बदललेली जीवनशैली, फक्त स्वतःचाच विचार करण्याची संकुचित वृत्ती, मी समाजात राहतो म्हणजे समाजाचे काही देणं लागतो ही भावनाच लोप पावत  चालली आहे. मी आणि फक्त मी यामध्ये "तुम्ही" किंवा "तू" नाही.  मग "आपण सगळे" दूरच राहिलो नाही का?   आणि सगळ्यात म्हणजे जीवघेणी स्पर्धा.  स्पर्धा असावी त्याशिवाय जगण्याला अर्थ राहणार नाही. स्पर्धा ही निकोप असावी. हरण्यात सुद्धा जगण्याइतका आनंद हवा तरच खेळ रंगतो.
तंत्रज्ञान जितकी मोठी झेप घेईल तितका माणूस यंत्रवत होत जाईल. यंत्राला कुठे भावना,प्रेम,माया असते सगळंच औपचारिक. रोबोट कसा सांगितलेलं, त्याला फीड केलेलं काम फटाफट करतो तसं माणसाचं झालं आहे. रोबोट चा शोध लावता लावता माणूस स्वतः रोबोट केव्हा झाला कळलं नाही.  मग घरात,आजूबाजूला माणसं आहेत हेही विसरू लागलो, प्रगतीच्या आड येणारी माणसं सरळ वृद्धाश्रमात पाठवली जातात.
हे असं किती दिवस चालू राहणार आणि याने काय साध्य होणार आहे. चौऱ्यांशी लक्ष योनी फिरुन आल्यावर माणसाचा जन्म मिळतो अस म्हणतात. मग माणूस म्हणून जन्मला आहेस तर वाग न माणसासारखं. स्वतः शी तरी माणसासारखं वागावं.
शत्रूशी सुद्धा माणुसकीने वागणारा आपला देश. आपल्या देशाची संस्कृती माणुसकीवर उभी आहे. पण हे सगळं विसरुन पाश्चिमात्य आणि पौर्वात्याच  अनुकरण करून स्वतःबरोबर देशाचंही नुकसान होत आहे. ज्यांचे आपण अनुकरण करत आहोत ते आपल्याच बळावर विकसित झाले आणि आपण मात्र अजूनही विकसनशील च आहोत.
म्हणून ही प्रार्थना आहे जगन्नाथा जवळ की देवा आता तरी डोळे उघडू दे आणि माणसाशी माणसासम वागण्याची बुद्धी आम्हाला सगळ्यांना दे.
रसिका
(सहज सुचलं म्हणून)

No comments:

Post a Comment