खूप भूक लागली असेल तर ज्या तळमळीने अन्नाचा शोध घेतला जातो तेवढी तळमळ गुरूच्या प्राप्तीसाठी हवी असे असले तरी गुरू शोधावा लागत नाही गुरू भेटतो. तसंच अगदी किती पायपीट,कोणाकोणाच्या भेटी, सगळे प्रकार करून झाल्यावर अंतर्मनाने दिलेली सूचना आपोआप गुरुकडे खेचून घेऊन जाते हेच सत्य आहे. याची जाणीव,अनुभव संपूर्ण जगात पवित्र भारताची कीर्ती पसरवणाऱ्या पॉल ब्रन्टन यांचे
"A Search in Secret India" हया पुस्तकाचा पुष्पा ठक्कर यांनी केलेला अनुवाद वाचतांना मला आला. या पुस्तकात पॉल ब्रन्टन यांनी गुरुप्राप्ती साठी केलेले अनोखे कार्य याविषयी स्वतःचे अनुभव कथन केले आहे.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी ब्रन्टन यांनी पूर्वेचा विस्तृत प्रवास केला. पश्चिमेच्या लोकांना योग, ध्यानधारणा याविषयी कायमच अप्रूप वाटत आलं आहे.
सुरवातीला काही यूरोपीय प्रवासी भारतात येत असत आणि भारतीय फकीर यांचेंबद्दल विलक्षण काही गूढ विचार घेऊन जात. पण फकीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रहस्यमय दंतकथांमागे जे रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी, भारताच्या या योग शक्ती,अध्यात्मिक शक्ती बद्दल अभ्यास करण्याच्या हेतूने रहस्यमय भारताचा शोध घेण्यासाठी ब्रन्टन यांनी दीर्घ प्रवास केला
आतासारख्या प्रवासाच्या सुखसोयी त्यावेळी उपलब्ध नसतांना सुद्धा कधी बोटीने,कधी खेचरावर तर कधी वाटा पायी तुडवत, कधी उंटावर त्यांनी प्रवास केला आणि सोबत अवजड ट्रंकांचा सरंजाम असायचा. खाणेपिणे राहणे याबाबत कुठलाही ठावठिकाणा नाही कोणत्याही प्रकारचा कुठेही पत्रव्यवहार नाही अशा परिस्थितीत प्रवास सुरू केला. या प्रवासा दरम्यान आलेले अनुभव आणि हाती जे काही रहस्य लागलं याचं वर्णन म्हणजे हे पुस्तक होय.
झपाटल्यागत अध्यात्माच्या शोधात निघालेले ब्रन्टन यांना या प्रवासात बरेच अध्यात्मिक संप्रदायाचे, औपचारिक, अनौपचारिक असे लोक भेटले. काही खरेच याबाबतीत उच्च कोटीचे होते तर काही या नावाखाली व्यापार करून पैसे मिळवणारे पण भेटले. काही खोटारडे होते तर काही अधिकृत सिद्धी प्राप्त केलेले होते.
भारत प्राचीन विज्ञानाचं रहस्यमय भांडार आहे असं नेहमी बोलल्या जातं. त्याचा प्रत्यय हे पुस्तक वाचतांना जाणवलं.
ब्रन्टन यांच्या शोधाची सुरुवात युरोपमधील एका पुस्तकाच्या दुकाना पासून झाली. त्याचा मालक हा भारतीय
आहे. त्याच्या दुकानात जुने दुर्मिळ युगप्रवर्तक ग्रंथ होते ते हाताळतांना त्याच दुकानात भेटलेला पुन्हा एक भारतीयच.त्या तिघांचा संवादाचा विषय म्हणजे भारत पहिला देश आहे त्याने पुनर्जन्माच्या तत्वाचा स्वीकार केला. सुन्दर विवेचन केलं आहे इथे लेखकाने.
मुंबईच्या बंदरावर उतरल्यानंतर मॅजेस्टिक हॉटेल मध्ये भेटलेला जादूगार. जादूटोणा करणारा,अदृश्य लोकांबरोबर देवाण घेवाण करणारा नाईल नदीच्या देशातील प्रवासी इजिप्तचा जादूगार मोहम्मद बे. आत्मे आणि जिन्स यांच्या मदतीने समोरच्याच्या प्रश्नांची उत्तरे देणारा जादूगार हे अद्भुत आहे वाचायलाआणि इथूनच ब्रन्टन यांनी त्यांच्या या पुस्तक लिखाणाचा श्रीगणेशा केला.
मेहरबाबा मसिहा उद्धारकर्ता सतराव्या वर्षी दहावी पास झाल्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये दोन वर्ष अभ्यास पूर्ण केलेला अचानक एका अनाकलनीय वळणावर येतो कारण एका मुस्लिम फकीर स्त्री ने त्याच्या कपाळावर टेकवलेले ओठ. ते कसे या मार्गाकडे वळले, त्यांच्यातील झालेला बदल याबाबत लेखकाशी झालेला संवाद वाचून मती गुंग होऊन जाते आणि पुढे काय हे वाचायची उत्सुकता वाढते.
मद्रास मधील उपनगराच्या अडयार नदीतीरावर भेटलेले योगी ब्रामा. योगशास्त्रविषयी परिपूर्ण ज्ञान असलेले हे ब्रामा लेखकाला वेगवेगळी योगासनं करून दाखवतात ,माहिती देतात पण काही ठराविक च योगासने व त्याविषयी माहिती देऊ शकत असल्याच सांगतात कारण त्यांना त्यांच्या गुरुंची परवानगी नसते सगळं ज्ञान उघड करण्याचे. योगशास्त्रात काही आसने तर अशी आहेत की त्याबद्दल वाचतांना आपल्यासारखे सामान्यांना विश्वास ठेवणे कठीण आहे पण ते आजही आहेत आणि असे योगी फक्त भारतातच भेटतात. असे वाटतं ब्रामा म्हणजे मृत्युंजय योगी. असे हे गुप्त ज्ञान जर पुढच्या पिढीपर्यंत गेले नाही काही दिवसातच हे ज्ञान अदृश्य होईल की काय अशी खंत लेखकाला वाटते. काय आहे विशेष यांच्यामध्ये हे वाचतांना अंगावर काटा उभा राहतो आणि अध्यात्मिक क्षेत्राची नवीनच ओळख होते. ब्रन्टन यांची लिहिण्याची शैली अप्रतिम आहे याची इथे जाणीव होते.
यानंतर भेटतात मौनीबाबा. "कधीही न बोलणाऱ्या साधूचे निवासस्थान"अशीच पाटी त्यांच्या खोलीबाहेर होती. या मौनीबाबांशी बोलण्यासाठी त्यांची मुलाखत घेणासाठी
ब्रन्टन यांना मदत केली ती त्यांचा दुभाषी आणि अडयार तीरावरील तापसी म्हणजे ब्रामा.
जगद्गुरू शंकराचार्य. सहासष्टवे शंकराचार्य यांना भेटण्यासाठी केलेले प्रयत्न , त्यांच्याशी केलेला संवाद म्हणजे चालू घडामोडींवर. युद्ध,आणि सध्याची जगातली परिस्थिती. युद्ध थांबविण्यासाठी अध्यात्माचा आधार घेण्याबद्दल शंकराचार्य यांनी केलेली सूचना. हा संवाद तर इतका छान आहे की खरच आपल्यासमोर घडतंय हे सारं असं वाटतं.
ज्योतिर्गीरी अरुणाचल येथील "पवित्र लाल पर्वत" . विश्वातील एक अध्यात्मिक केंद्र बनावं म्हणून या पर्वताची प्रत्यक्ष देवांनी स्थापना केली आहे असा दावा इथली स्थनिक परंपरा करते. येथील महर्षींना भेटण्यास मनाच्या विरुद्ध लेखक इथे जाण्यास निघतात त्यावेळी लेखकास शंकराचार्य यांनीं दृष्टांत दिला. परंतु थोडे दिवस राहू असे ठरवून गेलेले इथेच खूप रमले. या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या मनाची उलथापालथ खूप छान शब्द बद्ध झाली आहे. व्यवसायाने पत्रकार असणारे पॉल यांची प्रतिभा खूप छान वळणे घेत वाचकाला खिळवून ठेवते
पुढेही बरेच जादूगार सत्पुरुष त्यांना भेटले पण त्यांना जे हवं होत ते गवसत नव्हते. बनारस च्या सुधेईबाबू ज्योतिषशास्त्रज्ञाने त्यांचे सांगितलेले अचूक भविष्य ऐकून ते खूप प्रभावित झाले. उत्तरेतील राधास्वामी संप्रदायाचे दयाळ बाग चे साहबाजी काळाची पावलं ओळखून ज्यांनी एक वसाहत स्वतःच्या शिष्यांसाठी वसवली होती स्वयं प्रगत होता यावे म्हणून. अशा बऱ्याच सिद्ध पुरुषांना भेटल्यावर त्यांना जो गुरू हवा होता तो भेटला नाही असे विचार मनात करीत असतांना आजारपण आलं आणि उदास होऊन परतीचा प्रवास सुरू केला त्यासाठी मुंबईला आले आणि अचानकपणे त्यांना त्यांच्या अंतर्मनाने साद घातली,त्यालाच पुष्टी मिळावी म्हणून की काय मद्रास हुन त्यांच्या मित्राचे आलेले पत्र आणि पुन्हा अरुणाचल कडे जाण्याची लागलेली ओढ, महर्षींच्या सहवासात स्व चा लागलेला शोध याचे वर्णन वाचतांना खरंच गुरुभेटीची तळमळ जाणवते. आपल्या डोळ्यासमोर सगळा परिसर उभा राहतो,त्याचा चेहरा ,मनाची होत असलेली घालमेल सगळं अनुभवत असल्याचा भास होतो. गुरुभेटीचे वर्णन अप्रतिम केले आहे.यामध्ये बुवाबाजी नाही तर खऱ्या गुरुचा शोध आहे विज्ञानाधिष्टीत अध्यात्मिक आहे. अध्यात्म म्हणजे तरी काय विज्ञान च आहे. याचा प्रत्यय येतोच येतो.
पॉल ब्रन्टन यांचे हे पुस्तक 1934 मध्ये प्रकाशित झाल्यावर काही काळातच वैश्विक पातळीवर रमण महर्षी व शंकराचार्य यांचे नाव अध्यात्मिक क्षेत्रात सर्वदूर पोहोचलं.
रसिका राजीव हिंगे
अकोला
8600047066
No comments:
Post a Comment