खेळ प्रारब्धाचा
बंधन कैसे तुजला आले लावू नकोस बोल कोणता
अश्रू येती पापणकाठी किती रोखुनी धरशील अता llधृll
इथे न चाले सत्ता अपुली प्रारब्धाचा भोग असे हा
ईश्वराधीन आहे सगळे फळ कर्माचे नियम नित्य हा
आनंदाने स्विकार सगळे आवर सावर माये ममता
अश्रू येती पापणकाठी किती रोखुनी धरशील अता ll1ll
कोण आहेस कुठून आली कवण गावा सांगशील का?
संचिताचेच देणे सगळे मनाचे खेळ खेळतेस का?
नर जन्माचे सार्थक व्हाया जाण अविद्या नि अज्ञानता
अश्रू येती पापणकाठी किती रोखुनी धरशील अता ll2ll
अवडंबर हे संसाराचे किती माजले जागोजागी
ओळखले तू ब्रह्म सावळे मग सांग कसे आम्ही अभागी
जाणूनी घे ईश्वर माया श्रीगुरु चरणी हो शरणागता
अश्रू येती पापणकाठी किती रोखुनी धरशील अता ll3ll
बंधन कैसे तुजला आले लावू नकोस बोल कोणता
अश्रू येती पापणकाठी किती रोखुनी धरशील अता
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment