Friday, 20 February 2026

अंदमान

 



अंदमान ......


     काही गोष्टी ठरवाव्या लागतात तर काही न ठरवता घडून जातात. पण ज्या वारंवार ठरवून सुद्धा लवकर घडत नाही किंवा पूर्ण होत नाहीत त्यासाठी पुण्याचा ठेवा किंवा पुण्याचे संचित, गाठोडे असावे लागते हे अगदी १००%खरे आहे याचा प्रत्यय मला घेता आला. सुमारे दहा वर्षापूवी ठरलेली अंदमान यात्रा आता २०डिसेंबर २०२५ मध्ये करता यावी म्हणजे जेव्हा त्यासाठी माझा पुण्य संचय झाला असावा तेव्हाच हे घडून आले. नाहीतर वंदनीय सावरकर  यांची पावन चरणकमले ज्या भूमीला लागलीत तेथली विभूती झालेली माती भाळी लावण्याचे भाग्य लाभले नसते.

     सावरकर शब्द उच्चारला तरी सारा देह अभिमानाने फुलून येतो. देहाकडून देवाकडे जातांना, मध्ये देश लागतो..! याचे भान असलेले मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावरकर. असे फक्त सांगितले नाही तर तसे ते जगले, अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा एक आयाम, आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला.  

     पोर्टब्लेयर नव्हे श्री विजया पुरम मधील सेल्युलर जेल मध्ये जेव्हा पाय ठेवला तेव्हा असंख्य भावनांचा कल्लोळ मनात माजला होता. काय आणि किती पाहू, किती साठवू अन् आठवू असे झाले होते. तेथील प्रदर्शन पाहताना, वाचताना केव्हा डोळ्यातून पाणी वाहायला लागले कळले नाही. कसे राहिले असतील सावरकर इथे. बॅरिस्टर झालेले तात्या जेव्हा कैद्याचे कपडे अंगावर चढवत असतील तेव्हा त्याच्या मनात किती कालवाकालव झाली असेल, कोणते विचार आले असतील. याच बंदिवानाच्या कपड्यात आपले प्रेत काढले जाईल कदाचित बाहेर. देशप्रेम इतके पराकोटीचे होते की त्यासाठी काहीही सहन करायला तयार होते. पन्नास वर्षीची काळया पाण्याची शिक्षा झाली तेव्हा ते मुंबईतील डोंगरीच्या कारागृहात होते. सक्त मजुरी ची शिक्षा. आयुष्यच एक काथ्याकुट आहे असे समजून दिलेली शिक्षा आनंदाने स्वीकारली. कोणत्याही दुःखाचा एकदा स्वीकार केला की त्याचा त्रास होत नाही. आता दुःख तरी कसे म्हणावे! देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीही म्हणजे अगदी काहीही करायला तयार असणारे हे वेडे देशभक्त यांना दुःख म्हणजे देश पारतंत्र भोगतो आहे. सेल्युलर जेलचा जेलर बारी याचे कारण नसताना केवळ राग चीड यातून उद्भवलेल्या संतापाने मारलेले चाबकाचे फटके कसे सहन केले असतील याला एकच कारण देहासक्ती नव्हतीच. देह क्षणभंगुर आहे आणि माझा देश कल्पन्तापर्यंत आहे हीच भावना फक्त. देशाच्या प्रेमापुढे स्वतःच्या देहाचा, यातनांचा कधीच विचार केला नाही. बारी यातना देण्यात माहीर होता तर सावरकर म्हणजे सहनशीलतेची पराकाष्ठा. पराकाष्ठाच म्हणावी लागेल नाहीतर इतक्या कष्टमय यातना होत असताना कमला सारखे महाकाव्य कसे स्फुरले असते. पंचमहाभूतांचा देह शेवटी पंचमहाभूता मध्येच मिसळून जाणार आहे आणि आत्मा अमर राहील या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी सेल्युलर जेलमधील अकरा वर्षे काढली होती. दांडगी हिंमत आणि कुणाचेच भय नसलेले सावरकर हे वेगळेच रसायन होते हे अजूनही समजत नाही म्हणजे ज्यांना समजत नाही त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. 

     सावरकरांच्या कोठडीत गेल्यावर आधी चप्पल काढू पायातील की त्यांना दंडवत घालू असे झाले होते. डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहत होत्या, भिंतीकडे लक्ष गेले इथेच कमला लिहिली. वेडे मन त्या भीतीवर अक्षरे शोधू लागले. नाहीच शब्दबद्ध करता येत त्यावेळच्या मनातल्या भावना. एकच विचार होता मनात तात्यांची कोठडी पहायला मिळाली, तिथे नतमस्तक होता आले. हीच ती पुण्याई जी मला त्यांच्या चरणांची धूळ विभूती म्हणून भाळी मिरवता आली. स्वातंत्रवीर सावरकरांना त्रिवार मुजरा करूनच पाय अक्षरशः बाहेर ओढले. 


रसिका राजीव हिंगे 

     

No comments:

Post a Comment