गंध बावरा उनाड वारा मुजोर झाला जरा थांब ना
बहरुन आली सांज केशरी अबोल झाली प्रीत साजणा llधृll
सहवास तुझा हवाहवासा स्पर्श मोहवी तनामनाला
बघ तो रविकर मीलना आतुर सांज मोहरे क्षणाक्षणाला
केशरिया हा गालावरचा कसा सावरू अता सांग ना
बहरुन आली सांज केशरी अबोल झाली प्रीत साजणा ll1ll
या नयनांची भाषा बोले परी आकळे गुज ह्रदयीचे
शब्दांचा तो नाद अनाहत गूढ उकलतो तुझ्या मनीचे
सूरांचाही भाव वेगळा उमलूनी ये नवा तराणा
बहरुन आली सांज केशरी अबोल झाली प्रीत साजणा ll2ll
कनक केशरी सांज लाजरी उतरुन आली अवनी वरती
दिसे वाटुली घन सावळ्याची लगबग चाले क्षितिजावरती
ऐसी झाली सावळ बाधा मृदुंग वाजे धा धा धिं ना
बहरुन आली सांज केशरी अबोल झाली प्रीत साजणा ll3ll
गंध बावरा उनाड वारा मुजोर झाला जरा थांब ना
बहरुन आली सांज केशरी अबोल झाली प्रीत साजणा
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment