मीरा सकाळपासून अस्वस्थ होती. काही सुचेनासे झाले होते तिला. कशातच लक्ष लागत नव्हते. विचार करून करून डोकं दुखायला लागले होते. संध्याकाळ झाली होती. आज हुताशनी पौर्णिमा असल्यामुळे सकाळी पुरणा वरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य करून ती शाम ची वाट पहात होती. सहा वाजयला आले तरी शाम घरी आला नव्हता. वास्तविक लवकर घरी येतो असे कालच त्याने सांगितले होते. मीराच्या मनात नको ते विचार यायला लागले. मन चिंती ते वैरी न चिंती असे तिला झाले होते. विचारांचे आवर्तनं सुरूच होते. तेवढ्यात शेजारच्या राधाने मीराला आवाज दिला.
"मीरा, चल खाली जाऊ. आता थोड्या वेळातच होळी पेटविण्यात येईल. नैवेद्य घे सोबत."
"चालेल, चल जाऊ या" मीराला वाटले खाली सगळ्या सोबत जरा बरे वाटेल. म्हणून ती निघाली. होळी पेटवली होती. नैवेद्य अर्पण करून दोघी मैत्रिणी बाजूला उभ्या होत्या.जे मिळेल ते, ओलं , सुकं सगळं हा अग्नी स्वतःच्या पोटात सामावून घेत होता. कशालाच त्याने दूर लोटलं नव्हतं. अग्नीचं हे रूप पाहून मीरा स्तब्ध झाली. धडधडणाऱ्या ज्वाळा वरवर जातांना पाहता पाहता तिच्या विचारांच्या ही ज्वाळा अशाच उंच उंच जाऊ लागल्या. आणि त्या ज्वाळांच्या लपेटात तिचं मन हळूच भूतकाळात सरकलं.
शांत सोज्वळ स्वभावाची मीरा एम.बी.ए. फायनान्स मध्ये झाली. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी अन् आता तिचे लग्न करावे असे आईला वाटू लागले. मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मीराला सौंदर्याचे वरदान लाभले होते. कुणाला न दुखवता प्रत्येकाला मदतीचा हात देणारी,कमी बोलणारी मीरा सगळ्यांच्या मनात भरत होती. तिच्या या गुणांमुळेच पाटणकर यांनी आपल्या शाम साठी मीराला पसंत केले. एम.सी.ए.चे पदव्युत्तर शिक्षण घेतलेला शाम आय. टी.कंपनीत नोकरीला होता. साधा पण सावळा शाम मीराला भावला. तिच्याही नकळत तिने लग्नाला होकार भरला. थाटामाटात लग्न सोहळा पार पडला.
माहेरच्या संस्काराची शिदोरी घेऊन सुसंकृत मीराने पाटणकरांच्या घरात मोत्याची रास उधळत प्रवेश केला. चार खोल्यांचा फ्लॅट, हॉलमध्ये ऐसपैस सोफा, दोन्ही बेडरूम आणि स्वयंपाक घर सुसज्ज फर्निचर असलेले असे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबतील इन मीन चार सदस्य असलेले घर. घरदार छान असले तरी तिला तिथे रुळायला वेळ लागला. शाम चे बाबा वासुदेवराव जरा कडक शिस्तीचे होते. मिलिटरी मध्ये असल्यामुळे असेल कदाचित पण खूपच शिस्तीचे होते. मीराला फार भीती वाटायची. मिलिटरीच्या शिस्तीत वागायची, राहण्याची तिला सवय नव्हती. वासुदेवराव तसे प्रेमळ होते पण शिस्त म्हणजे शिस्त हा त्यांचा खाक्या होता. त्यामुळे कधी कधी मीराला फार त्रासदायक वाटायचे. देवकी म्हणजे सासूबाई खूपच प्रेमळ आणि मीरा ला जीव लावत होत्या. त्यांना मुलगी नव्हती म्हणूनही मीराचे त्यांना खूप कौतुक होते. नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसे सुरवातीचे फुलपाखरी दिवस भुर्रकन निघून गेले. आता खऱ्या अर्थाने दोघांचा संसार सुरू झाला. मीराची नोकरी, शामला सकाळी लवकर जावे लागायचे. दोघांचे डबे तयार करणे, चहा, न्याहरी सगळे करतांना मीरा दमून जायची. सोबत सासूबाई असायच्या पण तिला घरी एवढी कामाची सवय नव्हती. सगळेच आई करून देत होती त्यामुळे आयतेच सगळे तयार असायचे. शाम तसा मदत करत नव्हता कारण मुलांनी काम का करायचे असे वासुदेव राव म्हणायचे. थोडक्यात काय तर घरातील पुरुष म्हणजे गुंडा पुरुष देव.
सुखाचे क्षण भराभर निघून जातात. संसारात सुख दुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतोच. एकाच ठिकाणी चार डोकी आली की विचार वेगळे, मतं वेगळी असे होणारच. मतं वेगळी असली तरी मतभेद नसावेत ही आईची शिकवण मीरा कटाक्षाने पाळत होती. कधीही कुणाला उलटून बोलणे नाही की उद्धटासारखे वागणे नाही. पण काही गोष्ठी अशा असतात की कितीही नाही म्हंटले तरी कधीतरी अतिरेक होतो अन् मनावरचा ताबा सुटतो. मीरा चे पण असेच झाले. पुरुषांनी काहीच करायचे नाही अन् स्त्रियांनी घरदार सगळेच सांभाळायचे हे काही तिला पटत नव्हते. शाम नोकरी करतो तर मी पण करतेच आहे की नोकरी असा तिचा सरळ हिशोब होता. पण वासुदेवरावांना हे काही पटत नव्हते. देवकी ने पण खूप समजावून सांगितले तरी ते आपले मत बदलायला तयार नव्हते. व्हायचे तेच झाले.
आज मीरा ऑफिस मधून उशीरा घरी आली. ऑफिस मध्ये मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळे घरी येण्यास तिला वेळ झाला. शाम घरी आला होता. वासुदेव रावांचा रागाचा पारा चढत चालला होता. शाम आणि देवकीला पुढच्या महाभारताची कल्पना आली होतीच. चिंता करत होते. मीरा घरी आली अन् दारात च वासुदेव राव उभे होते. मीरा घाबरली,पण निश्चयाने तिने घरात पाऊल टाकले अन् वीज कडकडावी तसे वासुदेव राव कडाडले.
"तिथेच थांब. ही काय वेळ आहे का घरात येण्याची? किती वाजलेत पाहिले का? घरातली काही जबाबदारी असते हे विसरलात का सूनबाई तुम्ही? हे घर आहे धर्मशाळा नाही. शाम केव्हाचा आलेला. त्याची जेवायची वेळ झाली. केव्हा स्वयंपाक करणार, जेवणं केव्हा. काही ताळतंत्रच नाही वागण्याला." एका दमात वासुदेवराव तावातावाने बोलून गेले. काहीही विचार न करता. त्यांचा संताप देवकी ने अनुभवला होता. ती उगाचच आत घरात थरथरत होती. आज मीरा पण चिडली. तिचाही मनावरचा ताबा सुटला.
"बाबा मी या घरात तुमची सून आणि शामची सहचारिणी म्हणून आले आहे, मोलकरीण नाही. मला पण काही भावना आहेत, माझेही बाहेर मित्र मैत्रिणी आहेत. ते जसे मला वेळ देतात तसा मला पण वेळ द्यावा लागतो."
"असे इथे चालणार नाही."
"का? मी माणूस नाही. पुरुषांनी घरात काही केलं तर काय फरक पडणार आहे. जसे पुरुष कमवतात तसेच स्त्रिया ही कमवतातच न! नुसतच म्हणायचे का संसार दोघांचा आहे, सगळचं दोघांनी करावे."
शाम मध्येच बोलला,"मीरा तू शांत हो आणि बाबांना सॉरी म्हण आणि थांबव हे सगळे. उगाच शब्दांनी शब्द वाढत जातो आहे."
"अरे पण हे किती दिवस सहन करायचे? बाबांना मला दुखवायचे नाही. पण त्यांचे विचार, परंपरा का माझ्यावर लादल्या जात आहेत? हे बघ शाम हे मला मान्य नाही." असे म्हणून ती रागातच आत गेली. तिला रडू आवरत नव्हते. असे कोणते आभाळ कोसळले मी उशीरा घरी आले तर. तिला कळत नव्हते. उलट सुलट विचार ती करत होती. अन् तिचेच तिला जाणवले. मी कधीही न बोलणारी का बोलली इतके? कसा ताबा सुटला मनावरचा? जे झाले ते चांगले झाले नाही. पण आता पुढे काय? बाबा तर बोलतही नाहीत माझ्याशी. शाम पण मनातून दुखावला गेला आहे मी बाबांचा अपमान केला म्हणून. काय करू.
देवकी ने वासुदेव रावांना खूप समजावले, "असे काय तुम्ही बोलता? ती नवीन आहे अजून तिला थोडा वेळ द्यावा लागेल या घराच्या परंपरा अंगवळणी पडायला. मी नोकरी करून तुमचे सगळे ऐकले म्हणजे मीरा ने पण तसेच वागावे हा अट्टाहास का? काळ बदलला आहे. बदल होतच राहतील. तुमचे वडील जसे वागले तसे तुम्ही तरी आहात का? आधी हा विचार करा मग बोला. एक जमेची बाजू आहे की मीरा इतर मुलीसारखी उद्ध्ट नाही. आज खरच तिचा तोल गेला खरा पण सारखे सारखे बोलले की असे होणारच होते. तेव्हा आता थोडा तिला वेळ द्या. एवढं माझं ऐका."
वासुदेवराव मनातून दुखावले गेले होते तरी आत कुठेतरी त्यांनाही याची जाणीव झाली की मी इतकी टोकाची भूमिका घ्यायला नको होते. तिला नीट सांगितले असते तरी तिने ऐकले असते. राग कधीच बरा नव्हे याचा प्रत्यय त्यांना वारंवार येत होता तरीही आज तेच झाले जे व्हायला नको होते. मीरा शी बोलायला हवे. शाम ला पण सांगावे लागेल की तू थोडे तरी घरात लक्ष दे. देवकी म्हणते तेच खरे, बदल होतात आणि ते स्वीकारावे पण म्हणजे माणसांची. साखळी वाढत जाईल.
"अगं मीरा, चल घरी! कुठे हरवलीस?" राधाच्या आवाजाने मीरा भानावर आली. खरच किती किती चुकले माझे. मी मोठ्याचा अपमान करायला नकोच होता. आज शामचे बाबा म्हणजे माझेच बाबा नाही का? मी माझ्या बाबांना बोलले असते का अशी. इतका अहंकार कुठून आला माझ्यामध्ये? बरे तर बरे बाबा पुन्हा काही बोलले नाहीत. माझ्या बद्दल त्यांच्या मनात कटुता मी निर्माण केली. शिस्तीचा बडगा असला तरी ते प्रेमळ आहेत. जीव लावतात मला. कदाचित माझ्यावरचा माये मुळे ही ते मला रागावले असतील असा विचार का नाही आला माझ्या मनात. तिचे डोके सुन्न झाले. शांत होत असलेल्या होळीच्या,अग्नीच्या ज्वाळा कडे तिचे लक्ष गेले. मनोमन तिने होलिका मातेस नमस्कार केला अन् प्रार्थना केली,"हे माते, माझ्या मनातला अहंकार तू भस्म करून टाक, माझ्या मनांगणात जे अविचाराचे तण उगवले आहे ते सगळे जाळून नव्याने सद्विचारांचा अंकुर येऊ दे." आता तिचे मन शांतावले. घरी गेल्याबरोबर बाबांची क्षमा मागायची अन् नव्याने पुन्हा चैत्रवती होऊन अंकुरायचे हे मनाशी ठरवतच मीरा निघाली नव्या वसंतोत्सवाचे स्वागत करायला....तिच्या संसाराचा वसंत फुलवायला.......
©️®️रसिका राजीव हिंगे
# होळी
#. रागाच्या कथा
# अविचाराचे तण
No comments:
Post a Comment