Tuesday, 2 April 2024

श्रीगुरु रामदत्त बावन्नी

 



श्रीगुरु रामदत्त बावन्नी


जय जय सद्गुरू रामदत्ता

त्रिगुणात्मका भक्तत्राता ||1||

सगुण रूपी चतुर्थावतारी

रामदत्ता तूच नरहरी ||2||

कार्तिक त्रिपुर पुनवेसी

पांगारी क्षेत्री जन्मा येसी||3|| अवतरसी 

सरस्वती नारायण नंदना

तूच तारक भक्तजना ||4||

जन्मजन्मांतरीची पुण्याई

कुलकर्णी कुलोत्पन्न होई||5||

नृसिंह सरस्वती जागृत करीती

गुरुपरंपरेची देती प्रचिती ||6||

साक्षात दर्शने उपदेशती 

त्रिरात्री तुज बोध करिती||7||

अपूर्ण कार्य पूर्ण कराया

स्वामी सांगती श्रीगुरुराया ||8||

न्यावे भवपारी सद्भक्तांना

जे जे येतील तव चरणा||9||

गुरुचरिताचे करीसी पारायणा 

अव्याहतपणे तू नारायणा||10||

सप्तदिनाचा भक्ती महोत्सव 

श्रीदत्त जन्माचा असे उत्सव ll11ll 

भवसागर हा तरून जाया 

चरणी तुझिया ये आश्रया ll12ll 

प्रपंच अवघा मिथ्या जरी

जन सुखाची आस धरी ll13ll 

पांडे यांचा गाणग ग्रामीचा

नवस पूर्णत्वास नेई साचा ll14ll

चंदन पादुका स्विकारूनी

कृतार्थ केले तया जीवनी ll15ll 

पायी खडावा कटी पितांबर

अंगावरती शाल भरजर ll16ll 

ऐसे यावे सद्गुरू भोजना

गोखल्यांची तू पुरवी कामना ll17ll

वांझ महिषी दोहविली जैसी 

सगुण नरहरी अवतारासी ll18ll

तैसे आणिले त्वरित जलासी 

ग्रीष्मातल्या शुष्क नळासी ll19ll

अहंपणाने कुटाळ येती 

नित्य जयाची दांभिक वृत्तीll20ll

क्षणात दिधली तया प्रचिती

प्रत्यक्ष आम्ही संन्यासी यती ll21ll 

दामले यांच्या मनीची आस

पुरविली जाऊनी इंद्रपुरास ll22ll 

यावे कन्येस आशिष द्याया

दत्त स्वरुपा तू गुरुराया ll23ll 

प्रपंचाची शिकवण द्यावया

गृहस्थाश्रम स्विकारी सदया ll24ll

दुःखी जीव अगणित परी

रक्षियेले या भवसागरी ll25ll

असुर शक्ती त्या सहस्रार

कथियेले ते किती प्रकारll26ll

सावध करुनी भक्तांना

रक्षियले त्वा दयाघनाll27ll

दत्तोपासक श्रीकांतास

छळी पिशाच्च रात्रंदिस ll28ll

त्रिकालज्ञ तू त्रयमूर्ती

पुनीत करे देसी विभूती ll29ll

गुरुकृपेविण नाही ज्ञान

हेचि त्रिवार सत्य जाण ll30ll 

मधुकर दत्तात्रय कुलकर्णी

पुत्र तयांचा रक्षी धावुनी ll 31ll 

आधीव्याधी क्लेश भीती

कोणा आकळेना कर्मगती ll32ll 

अविरत भ्रमण भुवरती

 स्थिर जेथे स्थान महती ll 33ll

 दत्तकृपा सदन तीर्थ झाले

 भक्त जनांचे भाग्य उदेले ll34ll 

 देसी फळ पूर्व सुकृताचे 

 गत जन्मीच्या कन्येस साचे ll35ll 

 सगुण रूपाचा वियोग होता

 हृदयी स्थिरावले निर्गुण त्राता ll36ll 

दत्तात्रेय पुत्र नारायणासी

दत्तोपासनेची आवड मानसीll37ll

तपाचरणासी निघून जाता

तूच रक्षिले श्रीसद्गुरुनाथाll38ll

अतृप्त आत्म्यास मुक्ती देसी

कृतार्थ केले त्वा भगिनीसीll39ll

श्रीकांत अत्र सांगे कथा

स्वानुभवाची गुप्त गाथा ll40ll 

केला नामयज्ञ सव्वा कोटीचा

अर्थ कळाया नामस्मरणाचाll41ll

यज्ञी प्रगटले श्रीपाद यती 

तव संकल्पाची ही महती ll42ll

सगुण साकार मानव रुप

तूच निर्गुण ब्रह्मस्वरूप ll43ll

सांगसी देह हा आहे अनित्य

सत्कर्म सदाचार हेच सत्य ll44ll

तीर्थक्षेत्रीचा महिमा सांगसी

घेऊनी जासी सवे भक्तांसी ll45ll

निजभक्तास देसी प्रचिती

कृपाप्रसादे येई अनुभूती ll46ll

श्रध्दा भक्ती नि भावबळे 

चरणी येता दुःख पळे ll47ll 

जे जे येती तव दरबारी

सुखरूप होती या संसारी ll48ll

तेच लिहीते लेखणी नाथा 

जे कथियेले तू गुरुनाथा ll49ll

अधिक न्युन झाले दयाळा 

क्षमा करावी मजसी कृपाळा ll50ll

नित्य असावी ध्यानी मनी

सद्गुरू रामदत्त बावन्नी ll51ll

श्रीगुरु रामा दत्त दिगंबरा

करा करा हो जयजयकारा ll52ll 



अवधूत चिंतन श्रीगुरुदेव 


































No comments:

Post a Comment