"का एवढे फोटो टाकते आहेस इंस्टाग्राम वर?. फेसबुक वर तेच. सगळीकडे मित्र मैत्रिणी सारखेच आहेत तरी दहा ठिकाणी अपलोड करत राहते. कोण केव्हा आणि कसा उपयोग करेल काही सांगता येतं का? इतकं सगळं ऐकता तरी तसेच वागता ग. काय म्हणावे तुम्हाला." असे आणि या प्रकारचे थोड्या फार फरकाने आई मुलीला आणि मुलाला पण सतत सावध करत असते. कारण या tech savvy असणाऱ्यांना एक प्रकारची धुंदी असते की काय, मला किती येतं आणि मी अजून काय करू शकतो याकडेच यांचा जास्त ओढा असतो. पालक म्हणून जबाबदारी वाढते ती इथेच.
प्रत्येक पिढीत मागच्या पेक्षा जास्त चतुरस्त्र पिढी आहेच पण परिस्थिती साधारण तीच आहे. आमच्या वेळी असे नव्हते असे ऐकावे लागतेच. आज जग इतकं पुढे गेले आहे, तंत्रज्ञानानं फार उंच भरारी घेतली आहे. सोशल मीडिया म्हणजे आपण त्याला समाज माध्यम म्हणू शकतो असे बरेच उपलब्ध झाले आहेत. ए आय सारखे एका क्लिक वर हवी ती माहिती देणारे प्लॅटफॉर्म तयार झाले आहेत. दूरदर्शन जरी जास्त पाहिले तरी आई रागवायची ही आमची परिस्थिती. पण आता तसे नाही. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पद्धती मुळे मोबाईल नावाचा ब्रह्म राक्षस लहान लहान चिमण्या बाळांच्या तालावर नाचू लागला. काळाची गरज म्हणून आपण त्याला मान्य केले तरी तो त्याचे गुण दाखवणारच. शिवाय इंस्टाग्राम, फेसबुक, नेटफ्लिक्स, हॉट स्टार, अमेझॉन हे पण आहेतच दिमतीला. तरुणाई तर अक्षरशः या सगळ्या गोष्टीच्या इतकी आहारी गेली आहे की, स्वतः च्या प्रत्येक इव्हेंट चे फोटो वेगवेगळ्या पोज मध्ये अपलोड करत असतात. सुरवातीलाच जर या सगळ्या वर नियंत्रण ठेवता आले तर कुठेतरी याला मर्यादा पडतील. हीच पालकांची खूप मोठी जबाबदारी वाढली आहे.
स्वतः चे पोर सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्याची जबाबदारी पालकांची आहेच पण आज पालकत्व विखुरले आहे. करीयर हवे म्हणून किंवा गरज आहे म्हणून नोकरी करण्यासाठी आई वडील दोघेही घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे आजी आजोबा ही नाती घरातून संपुष्टात येते कारण प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही.याला कारणे वेगवेगळी असली तरी हा पण एक भाग आहेच. पालक आणि पाल्य संवाद होत नाही म्हणण्यापेक्षा वेळ मिळतच नाही. आपला पाल्य सोशल मीडियावर किती वेळ असतो, तो काय पाहतो, काय वाचतो, याची मजल कुठपर्यंत गेली आहे यावर पालकाचे नियंत्रण असणे ही काळाची गरज आहे आज. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक आहे. पण मर्यादा ओलांडली की सगळचं संपतं. सीतेने मर्यादा ओलांडली तिला त्याचे परिणाम भोगावे लागले.
सायबर गुन्हे इतके वाढले आहेत की कुठलीही साईट हॅक होते आहे, कोणाचाही फोटो वापरून त्याला ब्लॅक मेल करण्याचे तर प्रमाण फारच वाढले आहे. पालक म्हणून जबाबदारी येते की माझा पाल्य यात कुठे अडकला आहे का याची वेळच येऊ नये. यासाठी उत्तम माध्यम म्हणजे संवाद. आपल्या पाल्याला क्वालिटी टाइम दिलाच पाहिजे. माती ओली आहे तोपर्यंतच त्याला हवा तो आकार देता येतो, सुरवातीपासून काय चांगले, काय वाईट म्हणण्यापेक्षा कशाची मर्यादा किती वाढवावी याचे भान पाल्याला करून देणे गरजेचे आहे. स्वतः पालकाने सोशल मीडियाचा स्क्रीन टाइम मर्यादेत ठेवला पाहिजे तरच आणि तरच पाल्य हा आदर्श होईल. त्याला त्याचे स्वतः चे साधक बाधक विचार करण्याची क्षमता लाभेल. मानव हा अनुकरणशील आहे. मुलं घरातलं पाहूनच शिकतात. वेगळं असं फार सांगावे लागत नाही. तेव्हा पालकांना आता अष्टावधानी असावे लागेल. डिजीटल युगात जगण्याचे जे फायदे आहेत त्याचा उपयोग जर आयुष्यात व्हावा आणि आयुष्य सुखासीन व्हावे असे वाटत असेल तर पालकांनी स्वतः वर नियंत्रण ठेवून मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादेत ठेवला तर सायबर या विषयाशी मैत्री होऊ शकेल आणि स्वतः चा उत्कर्ष ही होईल....
©️®️रसिका राजीव हिंगे
#सायबर
# पालक
# डिजीटल
# स्क्रीन टाइम
No comments:
Post a Comment