*विषय - ही प्रीत बावरी*
आज सकाळी नेहमीप्रमाणेच झपझप पावलं उचलत फिरत होते. जाता जाता बाजूने मोबाईल वर गाणे ऐकू आले....
इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राज़दार
जितने के आस्मान पर तारे हैं बेशुमार
अलवार मनाच्या हळुवार भावना जपत जागलेली प्रीत सुखाच्या हिंदोळ्यावर झुलते आहे असे वाटावे इतके उत्कट प्रेम. मनापासून दिलेली कबुली. पूर्वी नजरेने दिली जायची.
आज संपूर्ण जग प्रेम दिवस साजरा करते आहे. असं एक दिवसात साजरे होणारे आहे प्रेम? ही निरंतर वेदकाळापासून चालत आलेली मंत्रमुग्ध भावना आहे.
मला नटसम्राट मधील प्रसंग आठवतो. "अहो किती दिवसापासून तुम्हाला सांगायचे राहिले, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बरं!" आणि त्यावर "इश्य" काहीतरीच काय ते काय सांगायची गोष्ट आहे का?"
तात्पर्य असे की ही सहज सगळ्यांच्या नकळत घडणारी गोष्ट किंवा कबुली.नजरेतून देहबोलीतून प्रीत फुलत राहते म्हणून ही प्रीत बावरी.
दिवसभर सगळ्यांचं करता करता संध्याकाळी घरी येतांना आणलेला गजरा लपून तिच्या केसात माळताच प्रीतीगीताचा अनाहत नाद ऐकू येऊ लागतो, मनमयुर थुईथुई नर्तन करायला लागतो.कृतार्थतेचे भाव नयनी दाटून प्रेमाश्रूंनी पापणकाठ ओलावतात. झालेला आनंद त्याला कळावा म्हणून हळूच नयनाच्या कोपऱ्यातून टाकलेला कटाक्ष ही पुरेसा असतो त्याच्यासाठी. या हृदयीचे त्या हृदयी असे पोहचते. हीच मौनाची भाषांतरे. ही आहे प्रीत बावरी.
म्हणजे
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
शब्द रूप आले मुक्या भावनांना
हे शब्दरूप ही अबोल. नयनांचे शब्द नयनांना कळती असा प्रकार. चांदण्यात चालतांना धरला तुझा हात असं नुसतं ऐकल्यावर मनोमन मोहरून येतात गात्र न गात्र.
खरे तर प्रीत या शब्दातच किमया आहे. किती खोलवर अर्थ दडलेला आहे या शब्दात. सागराची खोली कधी मोजता येईल का,नभीच्या चांदण्यांची मोजणी शक्य नाही अगदी तसेच ही प्रीत कशी आहे, कशी दिसते हे शब्दात सांगणे कठीण आहे. जसे अनुभव तसे प्रेम. म्हणून तर तिला बावरी म्हटले आहे न.
*प्री- प्रीयाराधना*
*त- तन्मयतेने किंवा तत्परतेने* *करणे*
म्हणजे तन्मयतेने केलेली प्रियाची आराधना असे म्हणता येईल.
मग ती नल दमयंती यांची प्रीती असो किंवा दुष्यंत शकुंतलेची, श्रीकृष्ण रुक्मिणी असो किंवा अगदी आजच्या पिढीतल्या संस्कारित तरुण तरुणीची असो ही उत्कट तन्मयतेने केलेली प्रीती आहे असे मला वाटते आणि म्हणून च ती प्रीत बावरी आहे.
राधा! कृष्णमय झाली होती. समर्पणाचे प्रतिक. यमुनेच्या तीरावर रास खेळतांना, मुरलीधराच्या बासरीवर पदन्यास करणारी राधा, बावरी होती. तिची प्रीत पण बावरी होती. इथे वासनेला थारा नाही, फक्त फक्त प्रीत आणि प्रीत. आत्म्याचे परमात्म्याशी झालेले मिलन म्हणजे राधा कृष्ण.
मंगेश पाडगावकर म्हणतात
*प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम* *असतं*
*तुमचं आमचं साऱ्यांचं सेम* *असतं*
खरं आहे हे पण आताशा या तरुण मुलामुलींच पाहिलं की मन खंतावतं. प्रेम आंधळं असलं तरी मनापासून करावं, एखाद्याला स्वीकारलं की त्याच्या गुणदोषां सह स्वीकारावे आणि वेदकाळापासून चालत आलेल्या या अलवार भावनेचा आदर करीत जगतांना जाणवू लागतं आयुष्य किती सुंदर आहे.... आणि पुन्हा पुन्हा मनातून अनाहत नाद ऐकू येऊ लागतो....
इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राज़दार
जितने के इस ज़मीन पर झरे हैं बेशुमार
©️रसिका राजीव हिंगे
8600047066
No comments:
Post a Comment