सहज सुचलं म्हणून....
सुसंकृत आणि सुशिक्षीत झालेली उपवर कन्या दान करायची वेळ समीप येते त्यावेळी मनात असंख्य विचार थैमान घालायला लागतात.
मुलगी झाली हो पासून तर लग्न ठरलं हो पर्यंतचा हा प्रवास एखाद्या सिनेमातल्या खेळासारखा डोळ्यापुढे सरकत जातो.
बालपण, शैक्षणिक प्रगती,मित्र मैत्रिणी, समाजातील वावर आणि घरातील संस्कार याच्या बळावर ती सुसंस्कृत आणि सुशिक्षित होते. आणि विवाह घटिका समीप येते, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आगळा वेगळा विवाह सोहळा संपन्न होतो. धर्मानुष्ठान असलेले कन्यादान हा विधी भावपूर्ण वातावरणात पार पडतो.
का करायचे कन्यादान? जगरहाटी आहे म्हणून ?
जनक राजाला दशरथ राजा म्हणतो "राजा तू किती भाग्यवान आहेस, आज तुझ्या दारात मी एक याचक म्हणून आलो आहे तुझ्या मुलीचे दान मागायला". किती मोठेपणा हा मनाचा. खरचं भाग्यवान आहेत का मुलीचे आईबाप? होय. पूर्वजांच्या पुण्याईने, जन्मजन्मांतरीचे पुण्य असले की कन्यारत्न प्राप्त होत.
स्त्री ही शक्ती आहे आणि शिवशक्ती चे मिलन होतं म्हणून जगरहाटी सुरू आहे. स्त्री ही सृजनशील आहे,नवनिर्माती आहे. तिला लाभलेले हे सृजनत्व निसर्गदत्त आहे स्त्रीला निसर्गाने प्रचंड शक्ती बहाल केली आहे. सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित कन्या दान केली असता 28 यज्ञ केल्याचे पुण्य मिळतं असं म्हणतात. मुलगी ही 42 कुळांचा उद्धार करते असेही पुराण कथांमधून वाचले आहे. असे असले तरी कोणत्याही फळाची आशा न करता जगाच्या कल्याणा मनावर मैलाचा दगड ठेवून सालंकृत कन्यादान करायचं, चालत आलेली परंपरा म्हणून नव्हे तर स्त्रीशक्ती ही विश्वनिर्माती आहे म्हणून.
रसिका
28.02.2019
No comments:
Post a Comment