माझी शाळा* ®️
शाळा असावी शाळेसारखी
शाळा असावी शाळेसारखी नकोत नुसत्त्या इमारती
इथे असावे शिक्षक सगळे सांदिपनी समती
नकोच नुसती टक्केवारी अन विद्यार्थ्याची श्रीमंती
इथे असावा समभाव कॄष्णासंगे सुदामाही घडती
ह्या शाळेतून विद्यार्थि घडावे घेंण्यास उंच भरारी
आकाशास गवसणी घालून किर्ती ज़ावी दिगंतरी
नकोत नुसते परिक्षार्थी विद्यार्थिच इथे घडावे
सुधाकराच्या शीतल प्रकाशी असेच नित्य घंडावे
रसिका राजीव हिंगे
आजचा माझी शाळा विषय वाचला आणि लगेच वरील मी केलेली कविता आठवली. मी ज्या शाळेत नोकरी करते त्या शाळेत विद्यार्थ्यांशी बोलतांना सुचलेली कविता आहे.
शाळा! फुलपाखराचे पंख ल्यालेली, संस्काराचे भांडार असलेली माझी शाळा. स्वप्नाचे दुसरे रूप म्हणजे शाळा. आज जेव्हा मी माझेच,माझ्या आयुष्याचे सिंहावलोकन करते तेव्हा प्रकर्षाने जाणवत काय नि किती दिलं शाळेने. कलागुणांना प्रोत्साहन इथेच मिळते, तुमच्यातील सुप्त गुण इथेच हुडकले जातात.
मला आठवतं मी आठवीत असतांना सहामाही परीक्षेत मराठीच्या पेपरमध्ये माझा निबंध वाचून मॅडमनी माझे नाव विचारले होते. खूप आनंद झाला होता. "निबंध छान लिहिलास, खूप वाचत जा छान लिहशील" असे जेव्हा त्या म्हणाल्या तेव्हा मूठभर मास चढले हो अंगावर.
शाळेत मी कधी खेळ खेळले नाही की कधी कुठे स्पर्धेत नव्हते तरीही माझी शाळा मूकपणे माझ्यावर करायचे ते संस्कार करतच होती. आज आश्चर्य वाटतं की किती मागे होती मी. दुसऱ्या बेंचवर असली तरीही.
शाळेतली एकसुरातील प्रार्थना, कवायत,राष्ट्रीय उत्सव साजरे करण्यातील मजा, एकसारखे दिसणारे युनिफॉर्म घातलेले विद्यार्थी,सगळं कसं शिस्तबद्ध असायचं. शिक्षक रागावले, छड्या मारल्या तरी पालक कधी शाळेत येऊन शिक्षकांशी भांडले नाहीत आजच्यासारखे.
न्यू ईरा हायस्कुल अकोला म्हणजे अकोल्यातील आमच्या काळातील टॉप मोस्ट शाळा. दरवर्षी शाळेतून मेरिट ठरलेले. अशा शाळेच्या भरभराटीच्या काळात मी शाळेची विद्यार्थिनी होते याचा मला अभिमान आहे.
अशीच शाळा प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनात जगावी,अनुभवावी असे मला वाटतं....
©️रसिका राजीव हिंगे
*

अगदीं खरं
ReplyDeleteव्वा भारीच👌👌💐