Sunday, 10 May 2020

सहज सुचलं म्हणून..आई







     आई! ब्रह्माड साठवलं आहे या दोन अक्षरात. माझी आई खूप वेगळी होती. प्रत्येकाची आई स्वतःसाठी वेगळीच असते ना! साधी, संस्कारक्षम,सालस रूप लाभलेली. जगातलं व्यवहाराने वागणं तिला कधीच जमलंच नाही. शब्दांचं भांडार तर इतकं होत की  काहीवेळेस असे वाटे की ही कुठून आणते एवढे शब्द, म्हणी तर इतक्या पाठ होत्या की माझ्या भावजयीला त्याच अप्रूप वाटलं आणि चक्क तिने त्यावर लेख लिहिला तेव्हा कळलं आईचे शब्दभांडार कारण भावजय पण मराठी ची जाणकार शिक्षिका. तिला यातलं सौंदर्य कळलं. कधी कुणाचा दुस्वास नाही की कुणाशी स्पर्धा नाही. नेहमी म्हणायची "त्याचं चांगलं होऊ दे त्याच्यापाठी माझं चांगलं होऊ दे" कोंड्याचा मांडा करून संसार करणारी आई कधी हट्ट नाही की कोणाची बरोबरी नाही. मुलांना चांगले संस्कार दिले त्याचे फळ तिला मिळाले. आम्ही सगळी बहीण भावंड आपापल्या घरी सुखात आहोत. चालता बोलता ज्ञानकोश,संस्कार कोश म्हणजे माझी आई. आज mothers day च्या निमित्ताने सारखी डोळ्यासमोर येते आहे. सकाळपासून बरेच छान छान msg वाचले आणि तिची उणीव जास्त जाणवायला लागली.

माझी आई

आई माझी गोरीपान
दिसे सुंदर गव्हाळ
नाक तिचे चाफेकळी
रूप असे ग सोज्वळ

माय माझी आठवता
ऊर भरून येई ग
अश्रू नयनी दाटले
बांध कसा घालू ग

नसे व्यवहार ठावे
स्वार्था सवे परमार्थ
होते जगणे साधेच
झाले जीवन कृतार्थ

बाळघुटी संस्कारांची
तुच दिली उगाळून
सांग ना ग आई मला
कसे फेडू तुझे ऋण

नसे कशाचीच भीती
जगतांना आता मला
तुझ्या संस्कारांची ठेव
देते पुढच्या पिढीला

राहू दे ऋणात देवा
नको याची उतराई
वसा चालविण्या तुझा
मज बळ दे ग आई

रसिका

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. रसिका तुझ्या शब्दात आई डोळ्यासमोर उभी राहिली

    ReplyDelete
  3. छान कविता 'आई'

    ReplyDelete