Sunday, 10 May 2020

कालिंदी


गूढ गहन अंधारात ब्राम्ह मुहूर्तावर साधनेसाठी पद्मासन घातलं की जगाचं भान विसरून साधनेचा परमोच्च बिंदू गाठणाऱ्या कालिंदीची जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेली  ही भावरम्य कहाणी आहे.
पुण्यासारख्या शहरात भिक्षुकाच्या घरी जन्मलेली विशाल अथांग डोळ्यांची कालिंदी अतिशय सुंदर होती. आईबाप आणि मोठ्या बहिणी व भाऊ सगळेच अहंकारी. कुजकट स्वभावाची रक्ताची नाती होती. आपल्या  प्रारब्धानुसार आपणास कुठे जन्म मिळेल हे ठरलेलं असत.यामध्ये ही सगळ्यात वेगळी. लहानापासून सगळंच शिकण्याची आवड असलेली कालिंदी वडिलांच्या अनुपस्थितीत छान प्रवचन सुद्धा करायची. मिळालेल्या मानव जन्माचे सार्थक करून घ्यावे हेच उद्दीष्ट असावे कालिंदीचे असे वाटते.
धाडसी,विक्षिप्त, अध्यात्माची आवड असणाऱ्या स्वामी नावाच्या वल्ली ची आणि कालिंदीची भेट होते. शिक्षण,नोकरी नाही, चित्र काढणे,गाणे, मिळेल ते काम करून जीवन जगणारा स्वामी कालिंदीला आवडू लागतो.
आणि सगळ्यांचा विरोध पत्करून भावनाप्रधान पण धाडसी स्वामी आणि शांत,निश्चल, संयमी कालिंदी चा विवाह होतो. यावेळेस घरात उठलेले वादळ, पोलीस तक्रार हे सगळंच खूप छान लेखकाने रंगविले आहे. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन संसार सुरू होतो. सर्वसाधारण बेरोजगारीचा जसा संसार असतो तसाच यांचा ही सुरू असतो. दारिद्र घरात ठाण मांडून बसलेलं. कारण कुठेच जीवनाला स्थिरता नाही. वारं जणू.  थोडं कुठे स्थिर होऊ लागलं की मध्येच स्वामी पळायचा अध्यात्माच्या वेडात. कसलेच भान नसायचे. दोन मुलं झालीत पण लगेचच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी सिगरेट च्या धुराच्या वलयात स्वामी दुःख विसरायचा. दुसरा मुलगा गेल्यावर स्वामींचे वक्तव्य वाचतांना त्यांची अध्यात्माची उंची किती खोल आहे हे जाणवते.
मन चंचल पण स्थिर असलेल्या कालिंदीची साधना, नामस्मरण चालूच असत. स्वामी हा जन्मापासूनच साधनेतला माणूस. कालिंदी त्याला त्याची आदिशक्ती वाटायची. संसाराचा गाडा ओढायला फार कष्ट करावे लागत होते, त्यात स्वामीचे आजारपण तरीही सगळं करून कालिंदीची साधना सुरूच असते.
पुढे एक मुलगी आणि दोन मुलं अशी तिची संसारवेल बहरते. कालिंदी च घरातील कर्ती असते जणू. कारण केव्हाही स्वामी कधी सहा महिने तर कधी चार दोन महिने साधनेसाठी हिमालयात किंवा कुठेही अरण्यात निघून  जायचा. मुलांच्या वाटेला कधी यायचाच नाही.मुलांना घडवितांना कालिंदी साधनेच्या एकेक पायऱ्या चढत होती.अन्यायाच्या, अत्याचाराच्या विरोधात प्रतिकार करणारी कालिंदी वाचतांना अक्षरशः आपल्यातही अशी शक्ती यावी असं वाटायला लागतं.  प्रचंड ताकद, धाडस कालिंदी मध्ये होतं. तिच्या साधनेचं तेज असावं कदाचित.
प्रेस मध्ये बनावट छपाईचा आरोप स्वामी वर येतो. श्री भाऊसाहेब काळे पोलीस अधिकारी स्वामीचे निर्दोषत्व सिद्ध करतात. केवळ सद्गुरू शंकर महाराजांची कृपा. यावेळी स्वामीला शारीरिक त्रास खूप होतो  मानसिक त्रास होणे शक्य नाही कारण या गोष्टी मनावर घेतल्याचं नाहीत कधी. स्वामींची साधना आणि वैराग्य उजळून निघत होत.
दोघेही जिथे जात तिथे माणसं जोडत असत. स्वामी भोवती साधनेवर त्याचे बोलणे ऐकायला लोक जमा होत. त्याला गुरू मानणारे बरेच होते पण तो सगळ्यांना श्री शंकर महाराजांना शरण जाण्यास सांगत असे. सद्गुरु श्री शंकर महाराजांनी स्वामीला भारत भ्रमण करण्याचा दिलेला आदेश म्हणून स्वामी पुन्हा घराबाहेर. याकाळात त्याला समाधी अवस्थेत पुढे घडणाऱ्या घटनेचा दृष्टांत, महाराजांनी घरी जाण्याची दिलेली अनुमती हे सगळं खूप अलौकिक आहे. वाचतांना क्षणभर विश्वास ठेवावा की नाही असाही विचार मनात येऊन जातो. कालिंदीला जंगलाचा चांगला अभ्यास होता. कितीही विषारी साप असले तरी ती सहज पकडू शकत होती.
स्वामीचे कधी हिमालयात तर कधी घरात असे करत यांचा उनपावसाचा संसार सुरू असतो. सांसारिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर कालिंदी वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचे ठरवते. स्वामीसह सद्गुरू शंकर महाराजांच्या परवानगीने लांब कृष्णेच्या काठी स्वामी आणि कालिंदी जाऊन राहतात. तिथल्या शांत वातावरणात दोघेही आपापल्या साधनेत  मस्त असतात.   पण सुनेला  कळतं की हे दोघेही कुठे आहे आणि ती त्यांना घरी घेऊन येते.  स्वामी पुन्हा निघून जातो. चार दोन महिन्यात परत आल्यावर सद्गुरूंनी संन्यास घेण्याची आज्ञा दिल्याचे सांगतो. आपल्याला संन्यास घे सांगणारे  सद्गुरू शंकर महाराज समर्थ आहेत कालिंदीला  सांभाळायला. कालिंदीचा सगळा भार आपल्या सद्गुरुवर सोपवून स्वामी कालिंदीला साष्टांग नमस्कार करून  कायमचा सोडून निघून जातो.
 वानप्रस्थाश्रमामुळे बिघडलेली  कालिंदीची प्रकृती दोन वर्षात सुधारली.  दरम्यान स्वामीला कोणीच पाहिले नाही.
स्वामीकडून काहीच खबर मिळाली नाही .आता आपणही  एकटं, कायमचं घर सोडायचे असे कालिंदी ठरवते. यावेळी खूप लांब कोणाला कळणार नाही अशा ठिकाणी जायचे ठरविते. स्वामीच्या साधनेच्या आड आपण येऊ नये म्हणून जाणून त्याला दूर ठेवणारी कालिंदी स्वामींच्या भेटीसाठी हळवी होते. आसक्ती नाही पण एकदा तरी पाहता यावे यासाठी. स्वामी म्हणजे एक विचित्र चीज आहे
घर सोडायचे हे नक्की करिते. कधीही कोणाला त्रास न देणारी कालिंदी आताही कोणाचीच झोप मोड होणार नाही याची दक्षता घेत पहाटेच्या अंधुक अंधारात झपाझप पावलं टाकीत निघाली. कुठे जायचं माहीत नाही. सद्गुरू नेतील तिकडे जायचं. एका सद्गुरू वाचून मनात काहीच नव्हतं.
तरीही मनात स्वामीला भेटण्याची ओढ होती. प्रेमाला नेहमी मनाची ओढ असते तशीच स्वामी च्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या कालिंदीच्या डोळ्यात क्षणभर अश्रू दाटून येतात. स्वामींच्या आठवणीत किती चालून आली याच भानही तिला रहात नाही. मध्ये कोणी भेटले तरी जास्त वेळ त्यांच्या बरोबर न राहता स्वतः मार्ग काढत चालत होती. नर्मदेच्या काठावर एका छोट्या गावात कालिंदी  आली.
कालिंदी या गावात येते आणि या गावाचा कायापालट करते. रात्री साधना, दिवसभर नामस्मरण, एकवेळच दुपारी जेवण बाकी काही नाही.  सुरवातीला भाषेची अडचण आली तरी हळूहळू कालिंदी या आदिवासी गावात रमू लागली. स्वतः काटकसरीचा संसार केल्याने तेथील बायकांना रोजगार कसा उपलब्ध करावा याचे ज्ञान देत होती.
मोठया मुलाच्या अरण्य अभ्यासामुळे तिलाही अरण्याची माहिती होती. या पार्श्वभूमीवर तिने बरेच बदल गावात घडवून आणले. याचबरोबर सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या कृपेने नामस्मरण आणि साधना उत्तरोत्तर वाढत जाते. या क्षेत्रातील एकेक पायरी ती वरवर चढतच जाते. जे जे आपणासी ठावे ते इतरांना सांगावे या न्यायाने स्वतः बरोबर इतर ही साधक घडविते. तिच्या कुटीमध्ये सातत्यानं सुगंध दरवळायचा. सुगंध आहे म्हणजे सद्गुरूंचे अस्तित्व आपल्याजवळ आहे. कालिंदीच्या कुटीत लोकांना वेगवेगळे अनुभव यायचे.
कुठूनतरी असाच हिंडत आलेला तरुण ज्याला साधनेची आवड असलेला.  सगळं गाव कालिंदीला नानी म्हणायचे आणि हा गुरू नानी म्हणू लागला.  हा शिल्पकार दगडातून मूर्ती घडविणारा. दिवसभर छिन्नी हातोडी घेऊन मूर्ती साकारणारा ह्या शिल्पकारास मधून सिगरेट,चहा,कांद्याची भजी लागायची. संध्याकाळी गुरू नानी सोबत नामस्मरण, साधना करायचा.
कालिंदी जवळ असलेल्या श्री शंकर महाराजांचा फोटो पाहून शिल्पकार महाराजांची मूर्ती घडविण्यासाठी शिळा घेऊन येतो. मूर्ती घडविण्यास सुरुवात केल्यावर त्याच्यातील सात्विक भाव, त्याची साधना, मूर्ती पूर्णत्वास येत असतांना शिल्पकारास आलेले अनुभव, वाचतांना अक्षरशः अंगावर शहारे येतात. एक टाकी सगळं वाचावं असं वाटत. कुठलीतरी अनामिक ओढ खिळवून ठेवते.
कालिंदीने आयुर्वेदिक  वनस्पतींचे इतके मोठे जंगल विकसित  केले असते की त्यासाठी सगळी औषधे बनवून बाहेर विक्रीस पाठवले जातात. गावाला रोजगार मिळतो.
शिल्पकारासाठी कालिंदीच्या हृदयात मातृत्वाचा एक हळवा कोपरा होता. शिल्पकारास कालिंदीने साधनेची संथा दिली. श्री शंकर महाराजांच्या शिल्पा समोर च स्वामी आणि कालिंदीचे शिल्प शिल्पकार साकारतो. या दोघांचीही साधना पराकोटीला पोहचली आहे.  एकदा तरी स्वामी भेटावा असं कालिंदीला मनापासून वाटत असतं. सद्गुरू शंकर महाराजांवर सगळं सोपवून  कालिंदी  संन्यास न घेता संन्यस्त जीवन जगते. तिच्या साधनेच्या परमोच्च क्षणाचे वर्णन करतांना लेखकाच्या भाषेला,प्रतिभेला अशी  काही मखमली झालर आली आहे की वाचतांना  स्वतः आपण तो क्षण अनुभवतो आहे की काय असे वाटतं. कारण लेखक पण याच अवस्थेतून गेलेले असावेत.
जग जसं चालावं तसच चालत असतं! सगळं 'छान आहे' म्हणावं,अधिक सुंदर; अधिक छान व्हावं यासाठी प्रयत्न करावे,सगळं सुंदर होईल, हो, फक्त भगवंताचं अधिष्ठान असावं!

रसिका

No comments:

Post a Comment